औरंगाबादेत भाडेकरूची माहिती लपविणाऱ्या २१३ घरमालकांवर नोंदविले गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 06:55 PM2018-11-20T18:55:21+5:302018-11-20T18:59:05+5:30

शहरात भाड्याने घर करून राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती पोलिसांना कळवावी, अशी अधिसूचनाच पोलीस आयुक्तांनी जारी केली आहे.

Crime registered against 213 homeowners hiding information about tenants in Aurangabad | औरंगाबादेत भाडेकरूची माहिती लपविणाऱ्या २१३ घरमालकांवर नोंदविले गुन्हे

औरंगाबादेत भाडेकरूची माहिती लपविणाऱ्या २१३ घरमालकांवर नोंदविले गुन्हे

googlenewsNext
ठळक मुद्देदहशतवादविरोधी सेलची कारवाई आयुक्तांच्या अधिसूचनेकडे घरमालकांचे दुर्लक्ष

औरंगाबाद : सिमी या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या लोकांची सतत येथे ऊठबस असल्याचे यापूर्वी अनेकदा समोर आले. या पार्श्वभूमीवर शहरात भाड्याने घर करून राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची माहिती पोलिसांना कळवावी, अशी अधिसूचनाच पोलीस आयुक्तांनी जारी केली आहे. या अधिसूचनेकडे दुर्लक्ष करून भाडेकरूची माहिती लपविणाऱ्या तब्बल २१३ घरमालकांविरोधात पोलीस आयुक्तालयातील दहशतवादविरोधी सेलने गुन्हे नोंदविल्याचे समोर आले. 

याविषयी पोलीस सूत्रांनी सांगितले की, अत्यंत संवेदनशील शहर म्हणून औरंगाबाद शहराची ओळख आहे. जगप्रसिद्ध अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना भेटी देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक येथे येतात. २०१२ मध्ये हिमायतबाग परिसरात दहशतवाद्यांसोबत दहशतवादविरोधी पथकाची चकमक झाली होती. या कारवाईत एक अतिरेकी ठार झाला होता आणि दोन जखमी झाले होते. या कारवाईत पकडलेल्या संशयितांना विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

काही वर्षांपूर्वी सिमी ही प्रतिबंधित दहशतवादी संघटना औरंगाबादेत सक्रिय होती. यामुळे दहशतवादविरोधी पथकासह विविध गुप्तचर संस्था शहरातील प्रत्येक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून असते. पोलीस आयुक्तालयातील दहशतवादविरोधी सेलही त्यासाठी सक्रिय आहे. शहरात उद्योग, व्यवसायाच्या नावाखाली काही समाजकंटकही शहरात राहू शकतात, ही बाब लक्षात घेऊन पोलीस आयुक्तांनी अधिसूचना जारी करून भाडेकरूची माहिती जवळच्या पोलीस ठाण्याला देणे घरमालकांना बंधनकारक केले.

असे असताना भाडेकरूंची माहिती पोलिसांना न देणाऱ्या घरमालकाविरोधात भादंवि कलम १८८ नुसार गुन्हे नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार दहशतवादविरोधी सेलने वर्षभरात तब्बल २१३ घरमालकांवर गुन्हे नोंदविल्याची माहिती समोर आली. शिवाय विविध पोलीस ठाण्यांतील विशेष शाखेतील कर्मचाऱ्यांकडूनही अशा घरमालकांचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई केली जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

घरमालकास होऊ शकतो कारावास
शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिलेल्या आदेशाची अवहेलना करणाऱ्यांविरोधात भादंवि कलम १८८ नुसार गुन्हा नोंदविण्याची तरतूद आहे. यानुसार गुन्हा नोंद झालेल्या घरमालकास एक महिन्याचा साधा कारावास आणि २०० रुपये दंड अथवा केवळ दंडाची शिक्षा होऊ शकते.

Web Title: Crime registered against 213 homeowners hiding information about tenants in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.