A contractor detained near Aurangabad; Be determined to commit suicide | औरंगाबादेत प्रेयसीचा गळा आवळून हत्या करणारा ठेकेदार अटकेत; आत्महत्या केल्याचा रचला होता बनाव 

ठळक मुद्देअनैतिक संबंध असलेल्या महिलेचे दागिने गहाण ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर तिचा गळा दाबून खून केला त्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्येचा बनाव केला शवविच्छेदन अहवालानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांची सविस्तर जबाब नोंदविल्यानंतर आरोपी प्रियकराला पोलिसांनी जेरबंद केले.

औरंगाबाद : अनैतिक संबंध असलेल्या महिलेचे दागिने गहाण ठेवल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर तिचा गळा दाबून खून केल्यानंतर तिने गळफास घेऊन आत्महत्येचा बनाव करणार्‍या ठेकेदाराला एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. शवविच्छेदन अहवालानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर मृताच्या नातेवाईकांची सविस्तर जबाब नोंदविल्यानंतर आरोपी प्रियकराला पोलिसांनी जेरबंद केले.

साहेबराव बाबुराव तायडे (४२,रा.पंचशीलनगर, तोरणा मंगलकार्यालयाच्या मागे, बीडबायपास परिसर) असे आरोपी ठेकेदाराचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको ठाण्याचे निरीक्षक सुरेंद्र माळाळे म्हणाले की, मृत मुन्नाबी सय्यद अकील (३६,रा. एकतानगर, जुना बायपास) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मुन्नाबी ही घटस्फोटित महिला तिच्या मुलगा आणि मुलीसह बीडबायपास परिसरात राहात. ती आरोपीकडे बांधकाम मजूर म्हणून कामाला जात असे. दरम्यान त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. यातून साहेबरावचे मृताच्या घरी सतत येणे-जाणे होते. 

काही दिवसापूर्वी आरोपीने मुन्नाबीचे दागिने घेऊन ते गहाण ठेवले. दरम्यान, मुनाब्बी दागिने सोडून आणण्यासाठी साहेबरावकडे सारखा तगादा लावत असे. ४ डिसेंबर रोजी रात्री त्यांच्यात यावरून जोरदार भांडण झाले. यावेळी साहेबरावने तिचा गळा दाबून तिला मारून टाकले. यानंतर तिने गळफास घेतल्याचा बनाव केला आणि तिला घाटीत दाखल केले. घाटीतील डॉक्टरांनी तिचे शवविच्छेदन केले. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. 

या प्रकरणाचा पोहेकाँ भानुदास खिल्लारे हे अधिक तपास करीत असताना त्यांना घाटी प्रशासनाकडून शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल नुकताच प्राप्त झाला. यात गळादाबल्याने मुन्नाबीची मृत्यू झाल्याचे नमूद करण्यात आले. यानंतर पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांचे आणि शेजार्‍यांचे म्हणने ऐकूण घेतले. अधिक माहिती घेतली असता मृताचा प्रियकर साहेबराव यानेच गहाण दागिने सोडविण्याच्या कारणावरून  गळा दाबून तिला संपविल्याचे समोर आले. यानंतर सहायक पोलीस निरीक्षक राहुल जाधव यांनी तात्काळ आरोपी तायडे याला अटक केली.