संपूर्ण औरंगाबाद जिल्हा चिंब; बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 12:45 AM2018-08-17T00:45:38+5:302018-08-17T00:45:59+5:30

जिल्ह्यात जवळपास दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजा मेहेरबान झाला. यामुळे माना टाकणाऱ्या पिकांना तूर्तास दिलासा मिळाला असून, या पावसामुळे बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. गुरुवारी फुलंब्री, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, सोयगाव, खुलताबाद, कन्नडसह औरंगाबाद तालुक्यात पावसाने दिवसभर कधी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना पाणी वाहिले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले.

Complete Aurangabad District Chimb; Baliharja has dried | संपूर्ण औरंगाबाद जिल्हा चिंब; बळीराजा सुखावला

संपूर्ण औरंगाबाद जिल्हा चिंब; बळीराजा सुखावला

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्यात जवळपास दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर वरुणराजा मेहेरबान झाला. यामुळे माना टाकणाऱ्या पिकांना तूर्तास दिलासा मिळाला असून, या पावसामुळे बळीराजाने समाधान व्यक्त केले आहे. गुरुवारी फुलंब्री, सिल्लोड, गंगापूर, वैजापूर, सोयगाव, खुलताबाद, कन्नडसह औरंगाबाद तालुक्यात पावसाने दिवसभर कधी रिमझिम तर काही ठिकाणी जोरदार हजेरी लावल्याने नदी, नाल्यांना पाणी वाहिले. जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याचे दिसून आले. रात्री उशिरा कन्नड तालुक्यातील चिकलठाण येथे गांधारी नदीला तर वासडीजवळील अंजना नदीला मोठा पूर आला होता.
वैजापूरमध्ये रिमझिम
वैजापूर : मागील दोन महिन्यांपासून पावसाने तालुक्यात पाठ फिरवली होती. मात्र, गुरुवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे पिकांना दिलासा मिळाला आहे.
गुरुवारी पहाटेपासून वैजापूर शहर आणि परिसरासह शिऊर, खंडाळा, महालगाव, लाडगाव, लासूरगाव, गारज, नागमठाण, लोणी खुर्द, बोरसर मंडळात सर्व दूर पावसाने रिमझिम हजेरी लावली आहे. त्यामुळे खरीप पिकांना आधार मिळाला असून पिके तरतील अशी अपेक्षा आहे. बुधवारी रात्रीतून तालुक्यात सरासरी ६.९० मि.मी.पाऊस झाला आहे. तालुक्यातील सर्वच मंडळात भीज पावसाने हजेरी लावली आहे.
तालुक्यात सरासरी ६.९० मि.मी. पाऊस झाला असून, वैजापूरमध्ये १.०० मि.मी. पावसाची नोंद झाली, तर शिऊर २४.००, खंडाळा १०.००, महालगाव २.००, लाडगाव ०.००, लासूरगाव ११.००, गारज ५.००, नागमठाण ०.००, लोणी खुर्द १४.००, बोरसर २.०० मि.मी. पावसाची नोंद झाली. गुरुवारी दिवसभर झालेल्या पावसाने खंडाळा येथील आठवडी बाजारात भाजी विक्रेत्यांसह ग्रामीण भागातून आलेले नागरिक, महिलांची तारांबळ उडाली. यावेळी भाजीपाला विक्रेत्यांनी भाजीपाला कवडीमोल भावाने विक्री करून गावी जाणे पसंत केले. यामुळे अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले.
फुलंब्रीत दमदार
फुलंब्री : तालुक्यात गुरुवारी (दि.१६) दिवसभर संततधार पाऊस झाला. २० दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकºयांच्या चेहºयावर हास्य दिसून आले.
गुरुवारी सकाळी ६ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. दुपारी काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा पावसाने जोर धरला. तालुक्यात २२ दिवसांपासून पाऊस गायब झाला होता. यामुळे मका पिकाला पाणी देण्याची वेळ आली होती, तर डोंगराळ भागातील व हलक्या जमिनीतील मका पिके वाया गेली; पण काळ्या जमिनीतील तग धरून असलेली मका जाण्याच्या मार्गावर असताना पाऊस पडला. यामुळे मकाला तूर्त जीवदान मिळाले.
येथील धानोरा, रिधोरा, पीरबावडा, मारसावळी, गेवराई गुंगी, टाकळी कोलते या भागातील मका पिके वाया गेली. मात्र, कपाशी पिकाला पावसाची गरज असताना पाऊस झाल्याने कपाशी तरली आहे. या पावसामुळे पाणी पातळीत वाढ होईल, असे जाणकारांनी सांगितले.
सिल्लोड तालुक्यात भीज पाऊस
सिल्लोड : तालुक्यातील सिल्लोड, भराडी, अंभई, अजिंठा, आमठाणा, गोळेगाव, निल्लोड, बोरगाव बाजार या आठ मंडळात शेतीसाठी उपयोगी, रिमझिम तर कुठे समाधानकारक भीज पाऊस झाला.
येथील ७६ गावांतील शेतकºयांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे, तर ५७ गावांतील पूर्ण पिके सुकली असून, गुरुवारी झालेल्या पावसामुळे सुकलेल्या पिकांना फायदा होण्याची शक्यता नसल्याचे शेतकºयांनी सांगितले.
तालुक्यात काही ठिकाणी भीज पाऊस तर कुठे रिमझिम पाऊस झाला आहे.
भीज पावसामुळे जमिनीखालील पाणीसाठ्यात वाढ होणार आहे. तसेच कपाशी पिकालाही या पावसामुळे फायदा होईल, असे असले तरी अद्यापही येथील शेतकरी आणखी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
पैठणमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस
पैठण : शहर व तालुक्यात बुधवार सायंकाळपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. गेल्या २४ तासांपासून सूर्यदर्शन झाले नसून वातावरणातील गारवा वाढला आहे.
पैठण शहरात दोन दिवसांपासून सतत सुरू असलेल्या पावसामुळे बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. छत्री, रेनकोट या पावसामुळे घराबाहेर आले. पैठण शहरातील सकल भागात कुठे-कुठे आजच्या पावसामुळे पाणी साचले.
महिनाभराच्या खंडानंतर तालुक्यात सर्वदूर पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाला दिलासा मिळाला आहे.
पैठण तालुक्यात रिमझिम पाऊस पडण्यास प्रारंभ झाला. अधूनमधून या पावसाचे हलक्या स्वरूपात रूपांतर होत होते. चितेगाव, दावरवाडी, बालानगर, बिडकीन, ढोरकीन, पिंपळवाडी, आपेगाव, विहामांडवा, जायकवाडी आदी परिसरात पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपात सुरू होता.
गंगापुरात सूर्यदर्शन झालेच नाही
गंगापूर तालुक्यात ठिकठिकाणी गुरुवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावल्यामुळे दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. तब्बल दोन महिन्यांच्या खंडानंतर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजाने समाधान व्यक्त केले.
सकाळी ८ वा. पावसाला सुरुवात झाली. यानंतर दिवसभर रिमझिम कधी जोरदार सरी कोसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पावसाळी वातावरणामुळे ग्रामीण भागातील नागरिक गंगापूर शहरात फिरकलेच नसल्याचे चित्र दिसून आले.
खुलताबादेत पिकांना जीवदान
खुलताबाद : खुलताबाद तालुक्यात दोन महिन्यांनंतर सर्वदूर पाऊस झाल्याने शेतकºयांत आनंदाचे वातावरण पसरले असून पिकांना जीवदान मिळाल्याने दुबार पेरणीचे संकट सध्या तरी टळले आहे.
बुधवारी रात्रीपासून पावसाने तालुक्याच्या सर्व भागात हजेरी लावली व दिवसभरही पावसाची बॅटिंग सुरूच असल्याने पिकांना या पावसाचा फायदा झाला. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शेतकºयांची चिंता काही प्रमाणात मिटली आहे.
तालुक्यातील खुलताबाद, वेरूळ, गल्लेबोरगाव, गदाना, सुलतानपूर, बाजारसावंगी परिसरात दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांअभावी बंद होते, तर बाजारातही ग्राहक नसल्याने व्यापारी बसून होते.

Web Title: Complete Aurangabad District Chimb; Baliharja has dried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.