coloured and torned rupees received from ATM | एटीएममधून निघाल्या ५०० रुपयाच्या फाटक्या व रंग लागलेल्या नोटा

औरंगाबाद : सातारा परिसर येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएममधून ५०० रुपयाच्या फाटक्या व रंग लागलेल्या नोटा ग्राहकास मिळाल्या. याबाबत त्यांनी बँकेला संपर्क केला असता बँकेने एजन्सीकडे बोट दाखवले तर एजन्सी ने मुख्य शाखेत जाण्याचा सल्ला दिला.

या बाबत अधिक माहिती अशी कि, प्रा. राहुल पंडित यांना कामानिमित्त काही रक्कमेची आवश्यकता होती. यासाठी ते सातारा परिसर येथील महाराष्ट्र बँकेच्या एटीएम मध्ये गेले. मशीनमधून १० हजार रुपयाची रक्कम काढण्याची सर्व प्रक्रिया त्यांनी पार पाडताच त्यांना ५०० रुपयाच्या नोटा त्यामधून मिळाल्या. त्या मोजत असताना त्यांना त्यातील बहुसंख्य नोटांना काळा रंग लागलेला तर काही नोटा फाटलेल्या आढळून आल्या.  

बँक व एजेन्सीने केली टोलवाटोलवी
पंडित यांनी सर्व नोटा तपासून पाहताच त्यातील ४ नोटांची कोपरे दोन्ही बाजूने फाटलेले दिसले, १० नोटांना काळ्या रंगाची शाई लागली होती. ३ नोटा चिटकवलेल्या होत्या तर काही नोटांवर पेनाने लिहिलेले आढळले. या बाबत त्यांनी तेथील महाराष्ट्र बँकेशी संपर्क साधला असता कॅशिअर व सहाय्यक व्यवस्थापकाने आमचा याच्याशी संबंध नाही म्हणत हातवर केले व एटीएममध्ये पैसे भरणा-या एजन्सीचा मोबाईल क्रमांक देऊन त्यांना संपर्क साधण्यास सांगितले. यानंतर पंडित यांनी एजन्सीशीच्या कर्मचा-यांशी संपर्क संपर्क केला असता त्यांनी आमचे काम केवळ पैसे भरण्याचे आहे तुम्ही मुख्य शाखेशी संपर्क करा असे सांगितले.

बँक व्यवस्थापकाने मागितली माफी 

पंडित हे मुख्य शाखेत गेले असता त्यांना एटीएम जेथे आहे त्या शाखेतच जाण्याचे सांगण्यात आले. येथे पंडित यांनी मुख्य व्यवस्थापकाशी संपर्क करून त्यांना सर्व माहिती दिली असता त्यांनी नोटा बदलून दिल्या. तसेचत्यांच्या कर्माचा-यांनी दिलेल्या चुकीच्या माहितीबद्दल माफीही मागितली. मात्र,बँकेत भरताना अशा नोटा बाद ठरवण्यात येतात तर एटीएममध्ये अशा नोटा कशा हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो.

याचा तपास व्हावा
मला खूप महत्वाचे काम असल्याने मी रक्कम काढण्यास तेथे गेलो होतो. अशा नोटा मिळाल्याने हातात पैसे असून देखील त्याची  किंमत नसल्याने हतबल झाल्या सारख वाटत होते. मला झालेल्या मानसिक त्रासास जबाबदार कोण ? तसेच या नोटा एटीएम मध्ये कशा येतात याचा तपास व्हावा.

- राहुल पंडित

मुख्य शाखेशी संपर्क करा 
आमचे काम फक्त मशीनमध्ये नोटा लोड करण्याचे आहे. आम्हाला महाराष्ट्र बँकेच्या मुख्य शाखेतून या नोटा मिळतात व आम्ही त्या नंतर विविध एटीएममध्ये लोड करतो. यामुळे याबाबत तेथेच संपर्क साधावा. 
- सचिन, एजन्सी कर्मचारी