Classical music and Guru-disciple tradition will last forever | शास्त्रीय संगीत आणि गुरू-शिष्य परंपरा सदैव टिकून राहणार

- मयूर देवकर / निकिता जेहुरकर 

औरंगाबाद : ‘शास्त्रीय संगीताचे अस्तित्व आणि महत्त्व पूर्वपार चालत आलेले असून, यापुढेही ते कायम राहणार. मन आणि बुद्धीला थेट भिडणार्‍या सुरांची जादू काळानुरूप काही कमी होणार नाही. संूपर्ण भारतीय संगीताचा आधारभूत पाया असणारे शास्त्रीय संगीत शाबूत आहे आणि तो तसाच टिकून राहील’ असा सकारात्मक आशावाद प्रसिद्ध शास्त्रीय गायिका डॉ. वैशाली देशमुख यांच्या बोलण्यातून जाणवला.  ‘लोकमत’ कॉफी टेबल उपक्रमात बुधवारी त्यांनी लोकमतच्या संपादकीय सहकार्‍यांशी संवाद साधला. या चर्चेत त्यांची जडणघडण, किशोरीताई आणि वीणाताई यांच्याकडून स्वराची दीक्षा घेण्याचे अनुभव, काही महिन्यांत विशारद करून दाखविणार्‍या ‘क्लासेस’चे फुटलेले पेव आणि गुरू-शिष्य परंपरेचे निर्विवाद महत्त्व आदींविषयी त्या मनमोकळेपणाने बोलल्या. 
 

अकोला ते पुणे
डॉ. वैशाली देशमुख यांचे गाव तसे कोल्हापूर. त्यांचे बालपण अकोल्यात गेले आणि जन्म झाला गंधर्वनगरी इंदोरमध्ये! घरात त्यांच्यापूर्वी कोणी शास्त्रीय संगीताचे रीतसर प्रशिक्षण जरी घेतलेले नसले तरी वडिलांना गाण्याची प्रचंड आवड होती. त्यांच्या आजी भजन गात असत. आजीचे भाऊ आणि त्यांच्या मुलांनाही गायनाची आवड होती. त्यामुळे त्यांच्यावर संगीताचे संस्कार बिंबवले जाणे स्वाभाविक होते. वडिलांच्या प्रोत्साहनातून मग त्यांच्या आईने त्यांना अकोल्यातच गायनाचा क्लास लावला.

दहावीतच त्या विशारद झाल्या. ‘विशारद झाले म्हणजे गाणे आले असे नाही. तेव्हा कोठे संगीतातील ‘सा’ कळू लागला’ असे त्या सांगतात. संगीत विषय घेऊन त्यांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्या म्हणतात, ‘मला पदवी मिळाली, सुवर्णपदकही मिळाले; पण मी गायिका झाले असे वाटत नव्हते. आपल्याला अजूनही गाणं कळत नाही, ही खंत होती. त्यासाठी मला पुण्याला जायचे होते. म्हणून मी १९९७ साली पीएच.डी. करण्यासाठी पुण्यात दाखल झाले; परंतु त्याकाळी पुण्यात पीएच.डी.साठी संगीत विषय नव्हता. मी निराश झाले.’

वीणातार्इंची ‘सूर’ माया
वीणाताई सहस्त्रबुद्धे यांचे गाणे त्यांना खूप आवडत असे. ‘त्या नाहीच म्हणतील असा विचार ठेवूनच मी त्यांच्याकडे गेले होते. त्या ‘हो’ म्हणाल्या तो क्षण आयुष्यभर मी कधी विसरू शकत नाही’, अशा शब्दांत त्यांचा आनंद आजही दिसला. गुरू-शिष्य परंपरेच्या माध्यमातून त्यांचा गानप्रवास सुरू झाला. वीणातार्इंकडून त्यांनी ‘ग्वाल्हेर घराण्या’ची तालीम घेतली. त्या म्हणतात, ‘पहिले सात महिने तर त्यांनी मला केवळ त्यांचा रियाज ऐकण्यासाठी बाजूला बसविले. संगीत शिकण्याच्या माझ्या दृढनिश्चयाची त्या परीक्षा घेत असाव्यात.’ अखेर सात महिन्यांनंतर त्यांनी वैशाली यांना प्रत्यक्ष शिकवायला सुरुवात केली. पहिले अडीच वर्षे त्यांनी ‘अहिर भैरव’ राग गाऊन घेतला. वैशाली यांनी आपल्या गुणग्राहक वृत्तीने एक-एक मोलाची गोष्ट आपल्या कंठात साठवली. खर्‍या गाण्याशी त्यांची ओळख वीणातार्इंनीच घडवून आणली.

किशोरीतार्इंचे ‘स्वर’ छत्र
दरम्यानच्या काळात त्यांनी नागपूर विद्यापीठातून ‘किराणा घराण्याचे भारतीय संगीतामधील योगदान’ या विषयात पीएच.डी. पूर्ण केली. त्यांचे लग्न झाले. जळगाव आणि मालेगाव येथे संगीत अध्यापक म्हणून कामही केले. नंतर औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान-विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या; परंतु गायकीतील आणखी गहन मर्म जाणून घेण्याची तृष्णा काही शमली नव्हती. नंतरच्या काळा वीणातार्इंची तब्येत फार ढासळली. त्यांच्या दु:खद निधनानंतर वैशाली यांनी गानविदुषी किशोरीताई अमोणकर यांच्याकडे गाणे शिकायला सुरुवात केली. किशोरीताई सहजासहजी गाणे शिकवायला तयार होत नाहीत. त्यांच्याच शब्दांत सांगायचे तर वैशाली यांच्या नशिबातच त्यांच्याकडे शिकणे लिहिलेले होते.

शनिवारी रात्री औरंगाबादहून निघायचे, रविवारी किशोरीतार्इंकडे प्रशिक्षण घ्यायचे आणि रात्री परत औरंगाबादकडे रवाना होऊन सोमवारी सकाळी महाविद्यालयात तासाला हजर व्हायचे, असे चक्र सुमारे अडीच-तीन वर्षे सुरू राहिले. ‘किशोरीतार्इंनी मला भरभरून आशीर्वाद दिले. संगीत आणि जीवनाकडे पाहण्याची प्रगल्भ दृष्टी दिली. सुरांशी कशी मैत्री करायची, त्यांना कसे कुरवाळायचे, आपलेसे करायचे हे शिकविले. थोड्याच काळात आमच्यामध्ये जिव्हाळ्याचे नाते तयार झाले.’ असे सांगताना त्या आठवणीत रमून जातात. 

गुरू-शिष्य परंपरा 
आजच्या स्पर्धेच्या आणि व्यस्त जगामध्ये कलेसाठी वर्षानुवर्षे वेळ देणे शक्य नाही. नव्या पिढीमध्ये संगीताप्रती जे समर्पण हवे तेदेखील दिसून येत नाही. तरीदेखील सध्या संगीत क्लासेसचे जे पेव फुटले आहे, त्यामुळे गुरू-शिष्य परंपरेला पर्याय निर्माण झाला आहे, असे मानण्यास डॉ. वैशाली नकार देतात. ‘शास्त्रीय संगीत शिकायचे तर ते गुरूच्या सान्निध्यात, त्यांच्यासमोर प्रत्यक्षात बसूनच शिकणे महत्त्वाचे असते. परंतु पूर्वीप्रमाणे आता शिष्यांना घरी ठेवणे अवघड झाले आहे.

शिष्य आणि गुरू दोहोंकडे तेवढा वेळ नाही. शिकणार्‍या मुलांमध्येदेखील स्वरांमध्ये पूर्ण बुडून जाण्याची वृत्ती नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूंविषयी श्रद्धा नाही. संगीतामध्ये श्रद्धा असावी लागते. तरच गुरूच्या आशीर्वादाने गळ्यात सरस्वती उतरते,’ असे त्या म्हणतात. थोड्याबहुत प्रमाणात का होईना; परंतु गुरू-शिष्य परंपरा टिकून आहे आणि ती टिकून राहणार, असा त्यांना विश्वास आहे. कारण तालमीतूनच खरा गायक तयार होतो.

संगीत क्लासेसचा सुळसुळाट
सध्या सुगम संगीत शिकविण्याचे जे क्लासेस चालवले जातात त्याविषयी डॉ. वैशाली देशमुख चिंता व्यक्त करताना म्हणतात की, आमच्या गुरूंनी अडीच-अडीच वर्षे आमच्यकडून एकच राग गिरवून घेतला. तेव्हा कुठे तो आपलासा होतो. जेथे वर्षानुवर्षे रियाज करूनही ‘सा’ येत नाही, तेथे या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना दर आठवड्याला नवीन राग शिकविला जातो. म्हणजे रागांचे मर्म राहिले बाजूला आणि केवळ नावच तोंडी येते. किती महिन्यात गाणे येईल असे विचारले जाते. अशाने शास्त्रीय संगीताचा पाया कसा मजबूत होणार? सुगम संगीत तर एक मोठे आव्हान असते. तीन-चार मिनिटांमध्ये भावनांचा अर्क त्यामध्ये उतरावयाचा असतो.

त्यामुळे जर सुगम संगीताचे प्रशिक्षण देताना मूलभूत शास्त्रीय संगीताची तयारी करून घेतली जात नसेल तर काय उपयोग?, असा सवाल त्या उपस्थित करतात. क्लासेस हा व्यवसाय असल्याने त्यांच्याकडून शास्त्रीय संगीताची शुद्धता कायम राखण्याची अपेक्षा नाही ठेवली जाऊ शकत. मात्र, याच वेळी अशा क्लासेसचा एक फायदा त्या सांगतात. ‘क्लासेसमधून पट्टीचे गायक तयार होणे जरी अवघड असले तरी कानसेन तयार होण्यास जरूर हातभार लागतो. संगीताची मूलभूत ओळख झाल्यावर त्याचा स्वरानंद घेणारे रसिक निर्माण होणेही गरजेचे आहे.’
 

घराणा आणि रियाज
डॉ. वैशाली देशमुख यांनी संगीतातील घराणे म्हणजे काय, ख्यालाच्याच प्रकाराचे महत्त्व, ठुमरी, बंदिशी, तानपुर्‍याचे महत्त्व, हार्मोनियमचा वाढता वापर, रागांची निर्मिती, वादी-संवादी, उपशास्त्रीय संगीत, अलंकार आणि रियाजाचे महत्त्व, रसिकांचे प्रकार, अशा विविध विषयांवर प्रकाश टाकला. ‘संगीताचे घराणे म्हणजे गायनाची एक विशिष्ट पद्धती. त्यांची स्वत:ची एक खास शैली आणि वैशिष्ट्ये असतात. घराणा गायिकांमागे एक विशिष्ट विचार असतो. त्यामुळे गायकांनी कोणत्या घराण्याची निवड करावी हे त्याच्या स्वभावावर अवलंबून असते.

प्रत्येक घराण्याचा स्वभाव वेगळा असतो. ताना, पलटे, वादी, संवादी ही व्याकरणाची चौकट पाळली जाणे महत्त्वाचे असते, असे त्या म्हणाल्या. कलावंतांकडून संगीताविषयक संशोधनपर लिखाण होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शेवटी त्या म्हणाल्या की, गायकीतील कलाविष्काराचे सौंदर्शशास्त्र समजून घेऊन जास्तीत जास्त रियाज करण्यावर विद्यार्थ्यांनी भर दिला पाहिजे. रियाजातूनच सुरांशी मैत्री जुळते.