लोकमत न्यूज नेटवर्क
किनवट : नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्ष कामाला लागले असून नऊ प्रभागांतील प्रत्येकी दोन याप्रमाणे १८ सदस्य निवडले जाणार आहेत़ तर नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे़
‘क’ वर्गात असलेल्या किनवट नगर परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष आघाडीची सत्ता आहे़ नगर परिषदेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, काँग्रेसचे ४, शिवसेना ४ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे़
नुकत्याच झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीनंतर किनवट नगर परिषदेची निवडणूक होत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे़ २०१२ च्या निवडणुकीत भाजपाला खातेही उघडता आले नाही़ ही परिस्थिती लक्षात घेवून भाजपाने निवडणूक रणनीती आखली आहे़ नगर परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता यावी, यासाठी भाजपाच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत़ निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा व शिवसेना हे पक्ष प्रबळ राहणार आहेत़ राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात आघाडी तसेच भाजपा - सेनेची युती झाल्यास खरी रंगत येणार आहे़
किनवट विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार प्रदीप नाईक हे सलग तिसºयांदा निवडून आले आहेत़ या निवडणुकीत ते लक्ष केंद्रित करणार आहेत़
माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण व आ़ प्रदीप नाईक यांनी आघाडी करून निवडणूक लढवली तर ही नगरपालिका आघाडीच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे़ कारण शिवसेना व भाजपात मधुर संबंध राहिले नसल्याने आघाडीला याचा लाभ मिळणार आहे़ निवडणुकीत माकप, भाकप, भारिप, बसपा, मनसे, एमआयएम, पिरीपा, आरपीआय हे पक्ष तिसरी आघाडी करून रिंगणात उतरतील़ माजी आ़ भीमराव केराम हे या निवडणुकीत काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे़