‘उज्ज्वला’ योजनेतील गॅस रिफिलिंगसाठी नागरिकांच्या चकरा; मजूर, कामगार कुटुंबियांची होतेय अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 07:13 PM2018-06-16T19:13:43+5:302018-06-16T19:15:34+5:30

गॅस उपलब्ध नसल्याची उत्तरे एजन्सीसकडून मिळू लागल्याने या गॅस कनेक्शनचे सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांच्या चकरा सुरू आहेत. 

Citizens tensed over Gas Refillation of 'Ujjwala' Scheme; Labor, workers' families are facing inconvenience | ‘उज्ज्वला’ योजनेतील गॅस रिफिलिंगसाठी नागरिकांच्या चकरा; मजूर, कामगार कुटुंबियांची होतेय अडवणूक

‘उज्ज्वला’ योजनेतील गॅस रिफिलिंगसाठी नागरिकांच्या चकरा; मजूर, कामगार कुटुंबियांची होतेय अडवणूक

googlenewsNext

- साहेबराव हिवराळे  

औरंगाबाद : गोरगरिबांच्या घरीदेखील गॅस असावा म्हणून उज्ज्वला योजनेंतर्गत अनेकांना मोफत गॅस देण्यात आला. मात्र, आॅनलाईनची सुविधा नसल्याने तसेच गॅस उपलब्ध नसल्याची उत्तरे एजन्सीसकडून मिळू लागल्याने या गॅस कनेक्शनचे सिलिंडर घेण्यासाठी नागरिकांच्या चकरा सुरू आहेत. 

दारिद्ररेषेखालील नागरिकांना आधार कार्ड व कागदपत्रांच्या आधारे शासनाकडून गॅस कनेक्शन देण्यात आले. गॅस घरी आला म्हणून सामान्य मजूर आणि कष्टकऱ्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, आता हा गॅस घेऊन अडचण झाल्याचे सामान्य नागरिकांना वाटत आहे. 
ज्या एजन्सीकडून गॅस कनेक्शन घेतले आहे, त्या एजन्सीतून गॅस आणण्यासाठी रिक्षाने ये-जा करावी लागते. यामध्ये गरिबांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. अनेक जण गॅस संपला म्हणून कार्ड घेऊन जातात. आॅनलाईन नोंद नसल्याने त्यांना सिलिंडर मिळत नाही. यामुळे रिकामे सिलिंडर घेऊन परत यावे लागते.

पुन्हा आठवडाभर मजुरी करून सुटीच्या दिवशी गॅस आणण्यासाठी नागरिक धाव घेत असल्याचे चित्र आहे. उज्ज्वला योजनेंतर्गत दिवाळीला मिळालेल्या गॅसधारकांपैकी ५० टक्के लाभार्थ्यांचे सध्या तिसरे रिफिलिंग चालू आहे. घरपोच गॅस मिळत नाही आणि ठराविक मोबाईलवरून रिफिलिंगसाठी नोंदणी होते. अनेक लाभार्थ्यांना काही तांत्रिक अडचणींमुळे रिफिलिंग करता आलेले नाही. त्यामुळे गॅस कनेक्शन मिळाल्याचा आनंद असला तरी सिलिंडर मिळत नसल्याने गरिबांची अडवणूक होत असल्याची भावना या योजनेतील गॅसधारकांनी व्यक्त केली.  

लाभधारकांची गैरसोय टाळा
मोलमजुरी करणाऱ्यांना सिलिंडर वेळेवर आणि घरपोच मिळत नाही, अनुदानही त्यांच्या खात्यात आले नाही. पुरवठा विभागाने त्याकडे लक्ष देऊन अनुदान पोहोच करावे, अशी मागणी अखिल महाराष्ट्र बांधकाम संघटनेचे सलीम शहा यांनी केली आहे. 

गॅसचे अनुदान द्या
कधी मनातही वाटले नव्हते की आपणदेखील गॅस वापरू; परंतु मोफत गॅस कनेक्शन मिळाले त्याचा आनंद आहे. सध्या तिसरी रिफिलिंग आहे. अद्यापही त्याचे अनुदान खात्यावर जमा झाले नसल्याचे मंदाबाई साखरे, रफिया बेग, मुमताज सय्यद, शशीकलाबाई साबळे आदींनी सांगितले.

गॅससाठी किती फेऱ्या
मोबाईलवरून गॅसची बुकिंग करा तरच गॅस मिळेल, असे गॅस एजन्सीवाले सांगतात. रिक्षाने दोनदा १५ किलोमीटर जाऊन आलो. गॅस मिळाला नाही. गॅसची रिफिलिंग इतरांप्रमाणे घर पोहोच मिळावी, अशी मागणी मीनाबाई दुधाने यांनी केली.
 

Web Title: Citizens tensed over Gas Refillation of 'Ujjwala' Scheme; Labor, workers' families are facing inconvenience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.