लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जयभवानीनगर भागातील नाल्यातील अतिक्रमणे काढण्याची मोहीम शुक्रवारीही सुरूच होती. पहिल्या व दुस-या दिवशी महापालिकेने जेसीबीच्या साह्याने १८ इमारती जमीनदोस्त केल्या. तिस-या दिवशी स्वत:हून नागरिकांनी आपली अतिक्रमणे कटर लावून काढण्यास सुरुवात केली. दिवसभरात दोन मोठी अतिक्रमणे काढण्यात आली. मनपाला या भागातील १३८ अतिक्रमणे हटवायची आहेत.
जयभवानीनगर परिसर अल्पावधीत मूलभूत सोयी-सुविधांयुक्त झाला. रस्ते, पाणी, ड्रेनेज, पथदिवे आदी मुबलक सोयी-सुविधा या भागात उपलब्ध झाल्याने जमिनींचा भाव आकाशाला गवसणी घालू लागला. हा संपूर्ण परिसर गुंठेवारीत असेल यावर कोणाचाही विश्वासच बसणार नाही. टुमदार इमारती, गजबजलेली बाजारपेठ या भागाचे आकर्षण केंद्र ठरू लागली. प्लॉटसाठी कुठेच जागाच शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी नाल्यावर मोठमोठ्या इमारती बांधून टाकल्या.
मागील १२ ते १५ वर्षांमध्ये ही अतिक्रमणे झाली. लोकप्रतिनिधींसह मनपा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. मात्र, अलीकडे मोठा पाऊस झाल्यास जयभवानीनगर संपूर्ण पाण्याखाली येऊ लागले. अनेक घरांमध्ये पाणी शिरू लागले. त्यानंतर नाल्यातील अतिक्रमणांची ओरड सुरू झाली. मागील एक वर्षापासून महापालिकेत अतिक्रमणांचा मुद्या गाजत होता. शेवटी मनपा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारत बुधवारपासून पाडापाडी मोहीम सुरू केली. पहिल्या दिवशी नागरिकांनी कडाडून विरोध दर्शविला. नंतर मनपा प्रशासन कारवाईवर ठाम राहत पोलिसांच्या मदतीने कारवाई सुरू केली. त्यामुळे अतिक्रमण करणारे नागरिक बॅकफुटवर आले. पहिल्याच दिवशी मनपाने ४ मोठी अतिक्रमणे काढली. दुसºया दिवशी १४ अतिक्रमणे पाडण्यात आली. तिस-या दिवशी नागरिकांनी स्वत:हून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली. यासाठी भाडेतत्त्वावर कटर आणण्यात आले. जेसीबीने मोठमोठ्या इमारती पाडल्यास मोठे नुकसान होईल, असे मनपातर्फे सांगण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी कटर लावून आपली अतिक्रमणे काढून घेण्यास सुरुवात केली. दिवसभरात दोन मोठी अतिक्रमणे काढण्यात आल्याची माहिती पदनिर्देशित अधिकारी सी. एम. अभंग यांनी दिली. शुक्रवारी स्थायी समितीचे सभापती गजानन बारवाल यांनी अतिक्रमण हटाव मोहिमेची पाहणी केली.
पंधरा दिवस कारवाई चालणार
जयभवानीनगर येथील मुख्य नाल्यावर १३८ मालमत्ताधारकांनी अतिक्रमण केलेले आहे. मनपाला आणखी ११८ इमारती पाडावयाच्या आहेत. किमान १५ दिवस तरी ही कारवाई चालणार आहे. जोपर्यंत संपूर्ण नाला मोकळा होणार नाही, तोपर्यंत मनपाने कारवाई थांबवू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या
आहेत.