दारूच्या पैशासाठी चोरली संस्थान गणपती मंदीरातील दानपेटी, दोन्ही चोरटे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 04:13 PM2018-12-24T16:13:15+5:302018-12-24T16:18:00+5:30

आरोपींची रिक्षाही पोलिसांनी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरातून जप्त केली.

Both the thieves arrested who stole a donation box of a Sansthan Ganpati Mandir, for liquor money | दारूच्या पैशासाठी चोरली संस्थान गणपती मंदीरातील दानपेटी, दोन्ही चोरटे अटकेत

दारूच्या पैशासाठी चोरली संस्थान गणपती मंदीरातील दानपेटी, दोन्ही चोरटे अटकेत

googlenewsNext

औरंगाबाद:  दारूसाठी पैसे नसल्याने राजाबाजार येथील संस्थान गणपती मंदीरातील दानपेटी चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले. गुन्हेशाखा आणि सिटीचौक पोलिसांनी दानपेटी चोरणाऱ्या चोरट्यांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली देत दानपेटीतील पैशापैकी सुमारे पंधरा हजार रूपयांची रोकड पोलिसांच्या स्वाधीन केली. आरोपींची रिक्षाही पोलिसांनी पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरातून रविवारी दुपारी जप्त केली.

पिराजी संजय सोनवणे (वय३०,रा. पडेगाव) आणि इब्राहिम खान आलम खान (वय ३२)असे अटकेतील चोरट्यांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, इब्राहिम खान हा भाड्याने रिक्षा घेऊन चालवितो तर आरोपी पिराजी हा त्याचा मित्र आहे. दोघेही एकाच वसाहतीत राहात असून त्यांना दारूचे व्यसन आहे. शनिवारी रात्री त्यांच्या रिक्षाला भाडे न मिळाल्याने त्यांच्याजवळ पैसे नव्हते. शिवाय दारू पिण्यासाठीही पैसे नसल्याने रात्री ते शहरात आले. संस्थान गणपती मंदीराच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस पहाटे चार वाजेनंतर गायब होतात,हे रिक्षाचालक इब्राहिमखानला माहित होते. यामुळे तो

पिराजीला रिक्षात बसवून तो राजाबाजारात आला. मंदीरापासून काही अंतरावर रिक्षा उभी करून त्याने प्रथम पिराजीला  संस्थान गणपती मंदीराबाहेर पाठविले. त्यावेळी आजूबाजूला कोणीही नसल्याचे पाहुन पिराजीने लगेच इब्राहिमला इशारा केला. त्यानंतर इब्राहिम रिक्षा घेऊन मंदीरासमोर येऊन थांबला. पिराजीने मंदीरात जाऊन दानपेटी उचलून इब्राहिमकडे सोपविली. त्यानंतर दोघांनी मिळून ती दानपेटी रिक्षात ठेवली आणि अवघ्या अर्ध्या मिनिटात दानपेटी चोरून ते रिक्षाने पळून गेले होते. 

या घटनेप्रकरणी रमेश घोडेले यांनी सिटीचौक ठाण्यात तक्रार नोंदविली होती. गुन्हेशाखेचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन सीसीटिव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजची तपासणी करून रिक्षा पडेगाव परिसरातील कासंबरी दर्गा परिसरातून शोधून काढली. मात्र संशयित आरोपी इब्राहिम खान हा त्याच्या घरी न सापडल्याने पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला होता. गुन्हेशाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीनंतर इब्राहिमला पकडले. तर सिटीचौक ठाण्याचे उपनिरीक्षक राजेंद्र बांगर आणि कर्मचाऱ्यांनी आरोपी पिराजीला दारूच्या नशेत असताना वसंतभवनसमोर पकडले. दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत दानपेटीतील रक्कमेपैकी १५ हजार ३१४ रुपये काढून दिले.

Web Title: Both the thieves arrested who stole a donation box of a Sansthan Ganpati Mandir, for liquor money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.