वाढदिवसाचे पैसे रुग्णांच्या मदतीसाठी ; साई मित्र परिवाराच्या माध्यमातून कामगारांचा उल्लेखनीय उपक्रम  

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 04:33 PM2017-12-29T16:33:48+5:302017-12-29T16:35:03+5:30

वाढदिवसावर पैसे खर्च करण्यापेक्षा त्या पैशांतून गोरगरीब रुग्णांना औषधी देण्याचा एक आगळावेगळा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून विविध कंपन्यांतील ५० कामगार राबवीत आहेत. साई मित्र परिवार एवढीच त्यांची ओळख आहे.

Birthday money to help patients; Significant activities of the workers through the Sai Friends family | वाढदिवसाचे पैसे रुग्णांच्या मदतीसाठी ; साई मित्र परिवाराच्या माध्यमातून कामगारांचा उल्लेखनीय उपक्रम  

वाढदिवसाचे पैसे रुग्णांच्या मदतीसाठी ; साई मित्र परिवाराच्या माध्यमातून कामगारांचा उल्लेखनीय उपक्रम  

googlenewsNext

औरंगाबाद : वाढदिवसावर पैसे खर्च करण्यापेक्षा त्या पैशांतून गोरगरीब रुग्णांना औषधी देण्याचा एक आगळावेगळा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून विविध कंपन्यांतील ५० कामगार राबवीत आहेत. साई मित्र परिवार एवढीच त्यांची ओळख आहे. वर्षभरात या कामगारांनी १५ रुग्णांना २७ हजार रुपयांची औषधी देऊन मदतीचा हात दिला आहे.

हे सर्व कामगार सर्वसाधारण कुटुंबातील आहेत. दैनंदिन कामकाज करताना एक सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी साई मित्र परिवाराखाली हे सर्व जण एकत्र आले. सुरुवातीला गोरगरिबांना फळे वाटप, ब्लँकेट वाटप अशी मदत करण्यास सुरुवात केली. घाटी रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालय या ठिकाणी अनेक निराधार आणि गोरगरीब रुग्ण येतात.

शासकीय मदत या रुग्णालयांत मिळते. त्यासोबतच गरजूंना समाजातून मदतीची आवश्यकता असते. यामध्ये औषधींसाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. हीच परिस्थिती लक्षात घेऊन या कामगारांनी गोरगरीब रुग्णांना औषधी आणि वैद्यकीय साहित्य देण्याचा निर्धार केला आणि गेल्या चार वर्षांपासून त्याचा हा उपक्रम अविरतपणे सुरू आहे.

घाटीत अनेकदा रुग्णांना औषधी बाहेरून आणण्यास सांगितले जाते. अशावेळी निराधार, गोरगरीब रुग्णांना ती विकत घेणे अशक्य होते. अशा रुग्णांविषयी खात्री करून वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते आणि साई मित्र परिवार मदतीसाठी धावून येतात. कोणत्याही प्रसिद्धी, फोटो काढणे अशा बाबी टाळून इतर संस्था, व्यक्तींनी गोरगरिबांसाठी पुढाकार घ्यावा, एवढीच या कामगार परिवाराची अपेक्षा आहे.

प्रत्येक महिन्याला ज्यांचा वाढदिवस असेल त्यांच्याकडून त्यावर खर्च होणारी रक्कम एकत्रित केली जाते. याप्रकारे हे कामगार स्वत:सह कुटुंबातील सदस्यांचे वाढदिवसाचे पैसे रुग्णांना औषधी देण्यासाठी वापरत आहेत. कामगारांच्या या उपक्रमामुळे अनेक जण त्यांच्याशी जोडले जात आहेत. 

संस्थांकडून मदत
रुग्णालयातर्फे रुग्णांना मदत केली जाते. त्याबरोबर विविध संस्था वेगवेगळ्या माध्यमातून गरजू, निराधार रुग्णांना मदत करतात. वैद्यकीय सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सदर कामगारांकडून दर महिन्याला मदत केली जाते.
- डॉ. अरविंद गायकवाड, विशेष कार्य अधिकारी, 
शासकीय कर्करोग रुग्णालय  (राज्य कर्करोग संस्था) 

Web Title: Birthday money to help patients; Significant activities of the workers through the Sai Friends family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.