बीड बायपासवर निष्पापांचे रक्त महापालिकेमुळे सांडू लागले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 08:01 PM2019-01-21T20:01:32+5:302019-01-21T20:03:20+5:30

रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका मागील तीन वर्षांपासून निव्वळ तांत्रिक नाट्य रचत आहे.

Beed bypass bloodshed took place due to municipal corporation! | बीड बायपासवर निष्पापांचे रक्त महापालिकेमुळे सांडू लागले !

बीड बायपासवर निष्पापांचे रक्त महापालिकेमुळे सांडू लागले !

googlenewsNext
ठळक मुद्देआणखी किती नागरिकांचे बळी हवेतरस्ता रुंदीकरणाकडे दुर्लक्ष

औरंगाबाद :  बीड बायपास रोड मृत्यूचा सापळा बनला आहे. महिन्यातून एक किंवा दोन निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. रस्ता रुंदीकरणासाठी महापालिका मागील तीन वर्षांपासून निव्वळ तांत्रिक नाट्य रचत आहे. गुरुवारी मध्यरात्री १ वाजता एका निष्पाप तरुणाचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पुन्हा एकदा बीड बायपासच्या रुंदीकरणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. 

मागील तीन ते चार वर्षांमध्ये बीड बायपासवर वेगवेगळ्या अपघातांत मरण पावलेल्या नागरिकांची संख्या शंभरहून अधिक आहे. ज्या कुटुंबातील कर्ता पुरुष किंवा महिला अपघातात मरण पावली असेल त्यांच्यावर केवढा मोठा डोंगर कोसळला असेल याची जाणीवही महापालिकेतील कारभाºयांना नाही. निष्ठुर महापालिकेने दोन वर्षांपूर्वी बीड बायपास रस्त्याच्या दोन्ही बाजूने सर्व्हिस रोड करण्याची घोषणा मोठ्या जोमाने केली. मात्र, कृतीमध्ये महापालिका अपयशी ठरली.

बीड बायपासला लागून असलेल्या मालमत्ताधारकांनी खंडपीठात धाव घेतली होती. खंडपीठाने महापालिकेला सर्वांची सुनावणी घेतल्यानंतर निर्णय घ्यावा, असे आदेशित केले होते. यापूर्वीच मालमत्ताधारकांची सुनावणी घेण्यात आली. परंतु तत्कालीन आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली झाल्याने नव्याने सुनावणी घेण्यात आली. ६ आॅगस्ट २०१८ रोजी सुनावणी पूर्ण झाली. दरम्यान, बीड बायपास रोडवर सतत अपघात होत असल्यामुळे संवेदनशील आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी त्वरित बायपासवर सायकलने धाव घेऊन पाहणी केली होती.

येथील अपघात सत्र थांबविण्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी तर पाहणीसह बैठकीचे आयोजनही केले होते. या रस्त्यावर एकही अतिक्रमण दिसणार नाही, अशी घोषणा महापौरांनी केली होती. तत्कालीन पदनिर्देशित अधिकारी अभंग यांनी कारवाईसुद्धा केली होती. मात्र, बीड बायपासला साईड रोड करण्यासाठी प्रलंबित असलेली संचिका आजही प्रशासन प्रमुखांकडे पडून आहे.  

दोन वर्षांपूर्वीच मार्किंग
महापालिकेने बीड बायपास रोडवरील मालमत्तांवर दोन वर्षांपूर्वीच मार्किंगही केली आहे. शहर विकास आराखड्यातील नकाशानुसार महापालिकेने ही कारवाई केली. रुंदीकरण करायचेच नव्हते तर मार्किंगचे नाट्य तरी मनपाने कशासाठी केले, असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. 

बायपासवर नागरिकांचा रास्ता रोको
सर्व्हिस रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, बायपासवर आठवडाभराच्या अंतराने सलग तिसरा बळी गेला आहे. त्यामुळे नागरिकांनी रास्ता रोको करून आंदोलनाचा इशारा दिला. पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे यांनी आंदोलकांसोबत चर्चा करून सार्वजनिक बांधकाम, जागतिक रस्ते विकास प्रकल्प अधिकारी, मनपा इत्यादी यंत्रणेसोबत चर्चा करून त्यावर तोडगा काढता येईल, असे सांगितल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. तात्काळ रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्यात आले.  यावेळी शिष्टमंडळात काँग्रेसचे शेख गुलाब, जुबेर मिर्झा, तरबेजभाई, हासन चाऊस, नवीद खान, शेख इरशू आदींसह नागरिकांचा सहभाग होता.

Web Title: Beed bypass bloodshed took place due to municipal corporation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.