दुष्काळाने बरेलीची मिरची, हैदराबादची भेंडी औरंगाबादच्या बाजारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 08:10 PM2019-04-26T20:10:47+5:302019-04-26T20:12:05+5:30

उत्पादनावर परिणाम, धान्यापाठोपाठ, भाज्यांची परपेठेवर मदार 

Bareli's pepper chillies, Hyderabad's bhendi in Aurangabad market due to drought | दुष्काळाने बरेलीची मिरची, हैदराबादची भेंडी औरंगाबादच्या बाजारात

दुष्काळाने बरेलीची मिरची, हैदराबादची भेंडी औरंगाबादच्या बाजारात

googlenewsNext

औरंगाबाद : उत्तर प्रदेशातील बरेलीची हिरवी मिरची, मध्यप्रदेशातील खांडव्याहून कोथिंबीर, हैदराबादची भेंडी व नाशिकमधून पालेभाज्या जाधववाडीतील अडत बाजारात आणण्यात येत आहेत. दुष्काळाने जिल्ह्यातील भाज्यांच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. शहरवासीयांची मागणी पूर्ण करण्यासाठी धान्यापाठोपाठ भाज्याही परपेठेतून आणल्या जात आहेत. 

जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळाची दाहकता वाढत आहे. याआधीही जिल्ह्यात दुष्काळ पडला होता; पण पालेभाज्या उगविण्यासाठी विहिरीत पाणी असत; पण आता विहिरींनी तळ गाठला आहे. गावागावांमध्ये टँकरने पाणी पुरविले जात आहे. साहजिकच फळभाज्या व पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.  जाधववाडीत उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ व पालेभाज्यांच्या अडत बाजारात परराज्यातून, परजिल्ह्यातून भाज्या आणल्या जात आहेत. येथील अडत व्यापारी राज्य, परराज्यातील अडत व्यापाऱ्यांच्या सतत मोबाईलवर संपर्कात आहेत.

जेथून भाज्या मिळतील तेथून आणून शहरवासीयांची गरज पूर्ण केली जात आहे. जिल्ह्यात हिरव्या मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते की, येथून दिल्लीपर्यंत मिरच्या विक्रीसाठी पाठविल्या जात. मात्र, दुष्काळाने परराज्यातून हिरवी मिरची आणण्यास भाग पडत आहे. बरेली, रायपूर व नागपूर या भागांतून दररोज ५० ते ६० टन हिरव्या मिरच्या येत आहेत. होलसेलमध्ये ३० मार्चला १५ ते २० रुपये किलोने विक्री झालेली मिरची आज ४० ते ४५ रुपये किलोने विकली जात होती. किरकोळ विक्रीत तर ५० ते ६० रुपये किलोपर्यंत हिरवी मिरची मिळत आहे, तर ढोबळी मिरची मालेगावहून आणली जात आहे. 

पहिल्यांदाच हैदराबादहून भेंडीची आवक होत आहे. शहरात भेंडीचा खप मोठ्या प्रमाणात आहे. दररोज ३० ते ४० क्विंटलपेक्षा अधिक भेंडी लागते. शहराच्या आसपासच्या पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात कोथिंबीर येत असे. आता खांडवा येथून ती येत आहे. भाजीमंडईत कोथिंबिरीची गड्डी १५ ते २० रुपयांपर्यंत खरेदी करावी लागत आहे.  काकडी, पत्ताकोबी, सिमला मिरची, मेथी, पालक आदी भाज्या नाशिक, नगर जिल्ह्यांतून पुरवल्या जात आहेत. फक्त सध्या आपल्या जिल्ह्यात कांदा मोठ्या प्रमाणात आहे, तसेच उन्हाळी कांदाही बाजारात येणार आहे. यामुळे कांदा २५० ते ८५० रुपये प्रतिक्विंटलने विकत आहे. शहराच्या चोहोबाजूंच्या ५० कि.मी. परिसरातून लिंबाची आवक होत असते. आता ते अकोल्याहून आणले जात आहे. मागील महिन्यात ३० ते ४० रुपये किलो विक्री होणारा लिंबाचा भाव आता ८० रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 

वडापावमध्ये गुजरातचा बटाटा 
इंदूर व आग्रा हे बटाट्याचे गढ मानले जातात. शहरातही येथील बटाटा विक्रीसाठी येत असतो. मात्र, मध्यप्रदेश व उत्तर प्रदेशाला मागे टाकून गुजरात राज्यात मोठ्या प्रमाणात बटाट्याचे उत्पादन झाले आहे. पहिल्यांदा शहरात गुजरातमधून मोठ्या प्रमाणात बटाटा येऊ लागला आहे. उत्तर प्रदेश व गुजरात मिळून दररोज २० ट्रक (४०० टन) बटाटा येत आहे. गुजरातचा बटाटा ७०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल, तर उत्तर प्रदेशातील बटाटा ९०० ते १,१०० रुपये प्रतिक्विंटल विकला जात आहे. वडापावमध्ये गुजरातचा बटाटा वापरला जात आहे, तसेच वेफर्ससाठीही बटाट्याला मागणी आहे. जाधववाडीतून नाशिकपर्यंत बटाट्याचा ट्रक पाठविले जात आहे. -मुजीबशेठ, बटाट्याचे अडत व्यापारी

परपेठेतून आवक; महागाई आटोक्यात 
औरंगाबाद जिल्ह्यात फळभाज्या, पालेभाज्यांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. जर परपेठेतून भाज्या शहरात आणल्या नसत्या, तर पालेभाज्यांचे भाव २५ रुपयांपेक्षा अधिक, तर फळभाज्यांचा भाव १०० ते १५० रुपयांपर्यंत गेला असता. मात्र, परपेठेतून माल आणला जात असल्याने महागाई आटोक्यात आहे. 
-इलियास बागवान, फळभाज्यांचे अडत व्यापारी

Web Title: Bareli's pepper chillies, Hyderabad's bhendi in Aurangabad market due to drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.