Aurangabad's Rohsanget to Kuradpura road will soon be resolved; Mayor made a provision of one crore | औरंगाबादमधील रोशनगेट ते किराडपुरा रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार; महापौरांनी केली एक कोटीची तरतूद
औरंगाबादमधील रोशनगेट ते किराडपुरा रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार; महापौरांनी केली एक कोटीची तरतूद

ठळक मुद्देकिराडपुरा राम मंदिरापासून रोशनगेटपर्यंतच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी इब्राहिम पटेल यांना दिले होते. महापौरांनी सुचविलेल्या अत्यावश्यक कामामधून मनपा प्रशासनाने १ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे

औरंगाबाद : रोशनगेट ते आझाद चौकपर्यंतचा रस्ता गुळगुळीत व्हावा यासाठी मागील काही वर्षांपासून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेने तब्बल दोन कोटी रुपये खर्च करून राम मंदिर किराडपुर्‍यापर्यंत सिमेंट रस्ता तयार केला आहे. उर्वरित रस्त्यासाठी महापौर नंदकुमार घोडेले यांनी १ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून दिली आहे. त्यामुळे रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. १५ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत अंदाजपत्रकाला मान्यता देण्यासाठी प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

काँग्रेसचे माजी नगरसेवक इब्राहिम भय्या पटेल यांनी रस्त्याच्या प्रश्नासाठी अनेकदा महापालिकेकडे पाठपुरावा केला. सर्वप्रथम त्यांनी मनपा आयुक्त डी.एम. मुगळीकर यांना किराडपुरा भागात आणून रस्त्याची परिस्थिती दाखवून दिली. मनपा आयुक्तांनी जातीने लक्ष देऊन या भागातील रस्त्यासाठी दोन कोटींची आर्थिक तरतूद करून दिली. या निधीतून आझाद चौक ते किराडपुरा राम मंदिरापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले. काम मध्येच बंद पडल्याने महापौर नंदकुमार घोडेले, सभागृहनेता विकास जैन यांनी भेट दिली. त्यांनी त्वरित रखडलेल्या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. मागील महिन्यात काम पूर्ण झाले. सिमेंट रस्त्यामुळे रहेमानिया कॉलनी, अल्तमश कॉलनी, किराडपुरा आदी भागातील नागरिकांत आनंदाची लाट पसरली आहे. 

किराडपुरा राम मंदिरापासून रोशनगेटपर्यंतच्या रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महापौर नंदकुमार घोडेले यांनी इब्राहिम पटेल यांना दिले होते. महापौरांनी सुचविलेल्या अत्यावश्यक कामामधून मनपा प्रशासनाने १ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. राम मंदिर ते पटेल हॉटेलपर्यंत सिमेंट रस्ता या निधीतून तयार करण्यात येणार आहे. या अंदाजपत्रकास मान्यता मिळावी म्हणून मनपा प्रशासनाने १५ फेब्रुवारीच्या सर्वसाधारण सभेत प्रस्ताव ठेवला आहे. सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर लवकरच निविदा काढून उर्वरित रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.


Web Title: Aurangabad's Rohsanget to Kuradpura road will soon be resolved; Mayor made a provision of one crore
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.