गुन्ह्यांचे शतक गाठणारा कल्ल्या सुधारतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 04:13 PM2018-10-16T16:13:24+5:302018-10-16T16:19:57+5:30

गुन्ह्यांचे शतक गाठणारा कुख्यात कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान याने आता गुन्हेगारी मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला.

Aurangabad's Criminal Kallya Correcting himself | गुन्ह्यांचे शतक गाठणारा कल्ल्या सुधारतोय

गुन्ह्यांचे शतक गाठणारा कल्ल्या सुधारतोय

googlenewsNext
ठळक मुद्देउस्मानपुरा ठाण्यात करतोय पोलीस सांगेल ती कामेपश्चात्ताप झाल्याचे म्हणत सहा महिन्यांपासून बदलला दिनक्रम

- बापू सोळुंके 

औरंगाबाद : शहरात आणि अन्य विविध ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांचे शतक गाठणारा कुख्यात कल्ल्या ऊर्फ कलीम खान शब्बीर खान याने आता गुन्हेगारी मार्ग सोडण्याचा निर्णय घेतला. सहा महिन्यांपासून तो आणि कुख्यात मुरीद खान उस्मानपुरा पोलीस ठाण्याची स्वच्छता आणि अधिकारी, कर्मचारी सांगतील ती कामे करीत असतात. 

विविध प्रकारचे गुन्हे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणााऱ्या वाल्याला त्यांची चूक कळाली आणि नंतर गुन्हेगारी सोडून दिल्याने त्यांचा वाल्मीकी ऋषी झाला, असे म्हटले जाते. आजही हजारो गुन्हेगारांना कालांतराने त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल पश्चात्ताप होतो आणि नंतर गुन्हेगारी विश्वाला ते कायमचा निरोप देतात. अशाच प्रकारे औरंगाबाद पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार कुख्यात कल्ल्या  ऊर्फ कलीम खान शब्बीर खान (रा. छोटा मुरलीधरनगर) याचे मनपरिवर्तन करण्यात पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके या अधिकाऱ्याला यश आले. 

कल्ल्याविरोधात वाटमारी, दरोड्याचा प्रयत्न, चोऱ्या, घरफोड्या, हाणामारी, सरकारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, न्यायाधीशांवर चप्पल फेकणे, मोबाईल चोरी करणे, दहशत निर्माण करणे, वाहनचोरी आदी प्रकारचे सुमारे शंभरहून अधिक गुन्हे त्याने केले. चौथीनंतर त्याने शाळा सोडली आणि तो गुन्हेगारी विश्वाकडे वळला. अल्पवयीन असताना सुरुवातीला भंगार चोरीसारखे गुन्हे तो करायचा. सज्ञान झाल्यानंतर त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हे करण्यास सुरुवात केली. त्याने आणि त्याच्या गँगने विशेषत: मारहाण करून लुटणे, घरफोड्या करणे आदी प्रकारचे सर्वाधिक गुन्हे केलेले आहेत. अत्यंत चपळ आणि मजबूत शरीरयष्टीमुळे तो सहजरीत्या पोलिसांच्या हाती लागत नव्हता. 

गतवर्षी मात्र उस्मानपुरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक कल्याण शेळके आणि कर्मचाऱ्यांनी त्याला परभणी येथील रेल्वेस्टेशन परिसरातून झटापट करून पकडून आणले होते. घरफोडीच्या विविध गुन्ह्यांत त्याला महिनाभर विविध ठाण्यांच्या पोलीस कोठडीत राहावे लागले. त्यानंतर सुमारे चार ते पाच महिने तो हर्सूल कारागृहात होता. न्यायालयाने त्याला विविध गुन्ह्यांत सशर्त जामीन मंजूर केला. उस्मानपुरा पोलीस बोलावतील तेव्हा त्यांच्यासमोर हजर राहणे आणि सकाळ आणि सायंकाळी ठाण्याला हजेरी देणे त्याला बंधनकारक केले. 

उपनिरीक्षक शेळके यांनी केले मनपरिवर्तन
कल्ल्या आणि मुरीद खान उस्मानपुरा ठाण्यांतर्गत हिस्ट्रीशिटर गुन्हेगार म्हणून त्यांची नोंद आहे. दोघांनाही न्यायालयाने उस्मानपुरा ठाण्यात हजेरी लावण्यास सांगितले. कोणत्याही गुन्ह्यात पोलीस आपल्याला उचलतात आणि आत टाकतात, असा त्याचा समज होता. .
मात्र, त्याचा हा समज पोलीस निरीक्षक प्रल्हाद घोडके आणि पोलीस उपनिरीक्षक कल्याण शेळके यांनी दूर केला. तू जर एकही गुन्हा केला नाही, तर पोलीस तुला अटक करणार नाही, असा विश्वास त्यांनी त्याला दिला. तुझी मुले शाळेत जात आहेत, त्यांना आता तुझी गरज आहे, असे असताना तू गुन्हेगारी सोड अन्यथा तुला आयुष्यभर जेलमध्ये राहावे लागेल, अशा प्रकारे त्याची समजूत काढली. शेळके  यांचे म्हणणे त्याला पटले आणि मागील चार ते पाच महिन्यांपासून कल्ल्या  आणि मुरीद खान रोज सकाळी उस्मानपुरा ठाण्यात येतात. दिवसभर ठाण्यातील स्वच्छता करणे, पाणी आणणे आणि अधिकारी, कर्मचारी सांगतील ती कामे करतात.

यापुढे एकही गुन्हा करणार नाही
आजपर्यंत मी केलेल्या गुन्ह्यांपैकी १७ केसमध्ये मी शिक्षा भोगली, तर १३ गुन्ह्यांत न्यायालयाने निर्दोष सोडले. शिवाय ३७ ते ३८ केसेस विविध कोर्टांत सुरू आहेत. यापुढे आता एकही गुन्हा न करण्याचा निर्णय घेतला. आता हमाली काम असो अथवा कोणतेही चांगले काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्याचा निर्णय घेतल्याचे त्याने सदर प्रतिनिधीला सांगितले.

Web Title: Aurangabad's Criminal Kallya Correcting himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.