औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानक होणार ‘स्मार्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 05:13 PM2019-06-10T17:13:15+5:302019-06-10T17:21:09+5:30

२८ प्लॅटफार्म, चित्रपटगृह, खुले उपाहारगृह इत्याची आधुनिक सुविधांचा समावेश 

Aurangabad's central bus stop soon became 'smart' | औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानक होणार ‘स्मार्ट’

औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानक होणार ‘स्मार्ट’

googlenewsNext
ठळक मुद्देजुनी इमारत पाडून होणार उभारणी मध्यवर्ती बसस्थानक येत्या दीड वर्षात स्मार्ट होणार

- प्रशांत तेलवाडकर 

औरंगाबाद : पर्यटनाची राजधानी, मराठवाड्याची राजधानी, आॅटोमोबाईल इंडस्ट्रीच्या हबपाठोपाठ आता शिक्षणाची आळंदी होत असलेल्या औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानक येत्या दीड वर्षात स्मार्ट होत आहे. जुनी इमारत पाडून नवीन मॉडर्न इमारत उभी राहणार आहे. २८ प्लॅटफार्मपासून ते खुले उपाहारगृह, चित्रपटगृहापर्यंत सर्व सोयी-सुविधा त्यात असणार आहेत. प्रत्येक शहरवासीयाला अभिमान वाटावा, असे बसस्थानक निर्माण होणार आहे. 

राज्यातील बहुतांश बसस्थानके जुनी झाली आहेत. यातील काही बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यातील एक औरंगाबादमधील मध्यवर्ती बसस्थानक होय. या बसस्थानकाची इमारत मोडकळीस आली आहे. ही इमारत पाडून नवीन इमारत बांधण्यात येणार आहे. ४.६ एकर जागेवर नवीन मध्यवर्ती बसस्थानक उभारले जाणार आहे. वास्तुविशारदाने दिलेला नवीन नकाशा व प्राथमिक अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आता सविस्तर अंदाजपत्रकाचे कामही अंतिम टप्प्यात येऊन पोहोचले आहे. अद्ययावत बसस्थानकाची नवीन इमारत इंग्रजी ‘वाय’ या आकारातील असणार आहे. बसस्थानकाचे प्रवेशद्वार पूर्वेस राहील. ते प्रशस्त व देखणे असेल. ऐतिहासिक शहराची ओळख जपत या प्रवेशगृहाच्या दक्षिण व उत्तर बाजूला येथील बीबी का मकबरा, पाणचक्की, शहरातील दरवाजे, देवगिरी किल्ला, जागतिक वारसा असलेले वेरूळ व अजिंठा लेणी याचे सर्वांना दर्शन होईल. फायबर म्युरलमध्ये या प्रतिकृती बनविण्यात येणार आहेत. येथून आत गेल्यावर भव्य ‘क्रश हॉल’ असेल. त्यात येणाऱ्या व जाणाऱ्या प्रवाशांची वर्दळ असेल. पुढे उजव्या व डाव्या बाजूस जेनेरिक मेडिकल स्टोअर्स असतील. याशिवाय तिकीट आरक्षण कार्यालय, वाहतूक नियंत्रण कार्यालय, पार्सल रूम, महिलांसाठी हिरकणी कक्षही आहेत. तसेच शिवशाही, शिवनेरीमध्ये बसणाऱ्या प्रवाशांसाठी वातानुकूलित कक्ष असतील.  सध्याच्या बसस्थानकात १७ प्लॅटफार्म आहेत. मात्र, नवीन बसस्थानकात २८ प्लॅटफार्म असतील. प्रथम दोन्ही बाजंूस प्रत्येकी ८-८ प्लॅटफार्म, त्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच पुढील बाजूस प्रत्येकी ६-६ प्लॅटफार्म व त्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असतील.   मध्यभागी मुख्य नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) असेल. येथून सर्व २८ प्लॅटफार्म दिसू शकतात, अशी रचना या कक्षाची करण्यात आली आहे. आसपास १२ छोटी दुकाने उभारण्यात येणार आहेत, तसेच विनावाहक गाड्यांच्या तिकिटासाठी ४ स्वतंत्र खिडक्यांची व्यवस्था असेल.  हे सर्व प्लॅटफार्म छताने अच्छादित असतील. या मॉडर्न मध्यवर्ती बसस्थानकाच्या प्रस्तावित इमारतीसाठी १८ कोटी २९ लाखांची मंजुरी राज्य शासनाने दिली आहे. 

दोन ठिकाणी वाहनतळे 
बसस्थानकात येणाऱ्या प्रवाशांसाठी दोन ठिकाणी सुमारे सव्वा एकर जागेवर वाहनतळे करण्यात येतील. आप्तेष्टांना बसमध्ये बसवून त्वरित निघून जाणाऱ्या वाहनधारकांच्या दुचाकी व चारचाकीसाठी बसस्थानकाच्या समोरील बाजूस वाहतळ असेल. 
वाहन उभे करून गावाला जायचे आहे, अशांसाठी बसस्थानकाच्या उत्तरेस (जिथे निवासस्थाने होती) वाहनतळ असेल. त्याच ठिकाणी समोरील बाजूस रिक्षास्टँडसाठी जागा ठेवण्यात आली आहे. बसस्थानकामधून उत्तर बाजूस वाहनतळामध्ये वाहन घेण्यासाठी प्रवाशांना जाण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात येणार आहे. 

पाणी फेरभरण
संपूर्ण बसस्थानकाचे पाणी फेरभरण करण्यात येणार आहे. अंडरग्राऊंड वॉटर टँक करण्यात येईल. पावसाळ्यात जमा झालेल्या पाण्यावरच वर्षभर बसस्थानकात पाणी पुरविले जाणार आहे. याशिवाय बसस्थानकाला ग्रीन बिल्डिंगची संकल्पना येथे राबविण्यात येईल. 

पहिला मजला
पहिल्या मजल्यावर उत्तर दिशेला १०० ते १२० आसनक्षमतेचे चित्रपटगृह संकल्पीत आहे, तर दक्षिण बाजूस वाहक व चालकांना राहण्यासाठी प्रशस्त हॉल, अकाऊंट कार्यालय असेल. तसेच वाहक-चालकांच्या  खुली व्यायामशाळा,  इनडोअर गेम्स, तसेच पहिल्यावर खुले उपहारगृह असेल, अशी माहिती वास्तुविशारद करणसिंह ठाकूर यांनी दिली. 

२५ वर्षांनंतरही अद्ययावत वाटेल असे असेल बसस्थानक
भविष्यातील स्मार्ट सिटी व लोकसंख्या वाढीचा विचार करून मध्यवर्ती बसस्थानकाचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. बसस्थानकावर नव्हे तर विमानतळावर आल्यासारखे प्रत्येकाला वाटेल व औरंगाबादकरांना अभिमान वाटेल, असे बसस्थानक उभारण्यात येईल. पुढील २५ वर्षांनंतरही अद्ययावत वाटेल, असे बसस्थानक राहील. 
- अजय ठाकूर, आर्किटेक्ट

Web Title: Aurangabad's central bus stop soon became 'smart'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.