औरंगाबादमध्ये पालेभाज्यांचे भाव मातीमोल; अतिरिक्त उत्पादनाचा शेतकर्‍यांना फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 04:56 PM2018-02-08T16:56:49+5:302018-02-08T16:57:19+5:30

‘मेथीची गड्डी घ्या, पालकाची गड्डी घ्या, कांद्याची पात घ्या, १ रुपया गड्डी, असे ओरडून शेतकरी, विक्रेते जाधववाडीत बुधवारी पालेभाज्या विकत होते. मातीमोल भावात विकून शिल्लक राहिलेल्या भाज्यांवर नंतर म्हशी, गायींनी मनसोक्त ताव मारला. एवढेच नव्हे तर नाशिकहून आलेली पत्ताकोबी, फुलकोबी, टोमॅटोचे दर एवढे खाली आले की, २ ते ५ रुपये प्रतिकिलोने विकावे लागले. तर दुपारनंतर अडत दुकानात फळभाज्यांचे ढीगच्या ढीग पडले होते.  

In Aurangabad, vegetable hits lower price; farmers suffers due to additional production | औरंगाबादमध्ये पालेभाज्यांचे भाव मातीमोल; अतिरिक्त उत्पादनाचा शेतकर्‍यांना फटका 

औरंगाबादमध्ये पालेभाज्यांचे भाव मातीमोल; अतिरिक्त उत्पादनाचा शेतकर्‍यांना फटका 

googlenewsNext

औरंगाबाद : ‘मेथीची गड्डी घ्या, पालकाची गड्डी घ्या, कांद्याची पात घ्या, १ रुपया गड्डी, असे ओरडून शेतकरी, विक्रेते जाधववाडीत बुधवारी पालेभाज्या विकत होते. मातीमोल भावात विकून शिल्लक राहिलेल्या भाज्यांवर नंतर म्हशी, गायींनी मनसोक्त ताव मारला. एवढेच नव्हे तर नाशिकहून आलेली पत्ताकोबी, फुलकोबी, टोमॅटोचे दर एवढे खाली आले की, २ ते ५ रुपये प्रतिकिलोने विकावे लागले. तर दुपारनंतर अडत दुकानात फळभाज्यांचे ढीगच्या ढीग पडले होते.  

पोषक वातावरणामुळे पालेभाज्यांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. यामुळे मातीमोल भावात पालेभाज्या विकाव्या लागत आहेत. जाधववाडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडत बाजारात आज सर्व पालेभाज्या व फळभाज्या दुपारनंतर शिल्लक राहिल्या होत्या. १० रुपयांना १० मेथीच्या गड्ड्या, त्याच भावात पालक व कांद्याची पात विकल्या जात होती.  दुपारी १२ वाजेनंतर तर शेतकर्‍यांनी शिल्लक मेथी, पालक जागेवरच टाकून घरचा रस्ता धरला. तर विक्रेते ओरडून ओरडून ग्राहकांना आपल्याकडील पालेभाज्या विकत होते. शेतकर्‍यांनी फेकून दिलेल्या शेकडो गड्ड्या मेथी, पालकाच्या गड्ड्यांवर नंतर म्हशी व गायींनी मनसोक्त ताव मारला.

नाशिकहून सुमारे १५ टन पत्ताकोबी व  २० टन फुलकोबी  बाजारात आली होती. मागणी कमी आवक जास्त झाल्याने पत्ताकोबी २ ते ३ रुपये तर फुलकोबी ४ ते ५ रुपये किलोने विकल्या जात होती. तरीही अनेक क्विंटल माल विक्रीविना अडत्यांच्या दुकानातच पडून होता. टोमॅटोचे कॅरेटच्या कॅरेट दुकानासमोर ठेवण्यात आले होते. ४ ते ५ रुपये किलो भावाने टोमॅटो विकल्या जात नव्हते. वांगे १५ किलोचे कॅरेट १०० रुपयाला मिळत होते. अशी दैन्यावस्था अडत बाजारात बघावयास मिळाली. 

शेतकर्‍याचा खिसा रिकामाच 
मांडकी येथून माझ्या व अन्य शेतकर्‍यांच्या शेतातील मेथी व पालक जाधववाडीत विक्रीला आणला होता. पण येथे १० रुपयाला १० गड्ड्या विकाव्या लागल्या. तरीही माझ्याकडे २०० गड्ड्या शिल्लक राहिल्या. अखेर भाज्या फेकून द्याव्या लागल्या. भाज्यांची काढणी व वाहतूक खर्चही निघाला नाही. 
-सुभाष डाक, शेतकरी, मांडकी

८० टन बटाटे बाजारात 
इंदोर व गुजरात येथून ७० ते ८० टन बटाटे जाधववाडीत विक्रीला आले. इंदोरचा बटाटा ८ ते १० रुपये किलो तर गुजरातचा बटाटा ५ ते ७ रुपये किलोने विक्री करण्यात आला. इंदोरचा बटाटा वेफर्ससाठी उपयोगात येत असल्याने वेफर्स उद्योगांनी बटाटा खरेदी केला. तरी पण अनेक क्विंटल माल विक्रीविना पडून राहिला. 
-मुजीब शेठ जम्मू शेठ, अडत व्यापारी

लसूणही १० ते २० रुपये किलो 
नवीन लसणाची आवक सुरू झाल्याने जुन्या लसणाचे भाव गडगडले. मध्यप्रदेशातून जाधववाडीत मोठ्या प्रमाणात जुन्या हायब्रीड लसणाची आवक झाली. आज १ हजार ते २ हजार रुपये प्रतिक्विंटलने लसूण विक्री झाला. १० ते २० रुपये किलोने लसूण मिळत होता. 
-इलियास बागवान, अडत व्यापारी

Web Title: In Aurangabad, vegetable hits lower price; farmers suffers due to additional production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.