औरंगाबादचा पाईप घोटाळा; दोषी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:10 AM2018-01-21T00:10:58+5:302018-01-21T00:11:30+5:30

समांतर जलवाहिनीच्या कंपनीने विविध वॉर्डांमध्ये जलवाहिन्या टाकण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या पाईपची खरेदी केली होती. यातील तब्बल १२ कोटी रुपयांचे पाईप गायब असल्याची बाब समोर आल्यानंतर ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला होता. मनपा प्रशासनाने पाईप घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नेमली. मागील दीड महिन्यात समितीचा अहवालच प्राप्त झालेला नाही.

Aurangabad Pipe scam; Who is the culprit? | औरंगाबादचा पाईप घोटाळा; दोषी कोण?

औरंगाबादचा पाईप घोटाळा; दोषी कोण?

googlenewsNext
ठळक मुद्देदीड महिना उलटला : १२ कोटींची फिकीर ना प्रशासनाला, ना पदाधिका-यांना

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : समांतर जलवाहिनीच्या कंपनीने विविध वॉर्डांमध्ये जलवाहिन्या टाकण्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या पाईपची खरेदी केली होती. यातील तब्बल १२ कोटी रुपयांचे पाईप गायब असल्याची बाब समोर आल्यानंतर ‘लोकमत’ने यावर प्रकाश टाकला होता. मनपा प्रशासनाने पाईप घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती नेमली. मागील दीड महिन्यात समितीचा अहवालच प्राप्त झालेला नाही.
औरंगाबाद युटिलिटी कंपनीने कोट्यवधी रुपयांचे पाईप खरेदी केले. कंपनीच्या सिडको येथील कार्यालयात हे पाईप आल्यावर नगरसेवकांची पाईप घेण्यासाठी झुंबड उडाली होती. रेटारेटी, दादागिरी करून अनेक नगरसेवकांनी आपापल्या वॉर्डांमध्ये हे पाईप नेऊन ठेवले. गरज नसतानाही पाईपचा ढीग लावून ठेवण्यात आला होता. १४ महिन्यांच्या कार्यकाळानंतर मनपाने कंपनीची हकालपट्टी केली. कंपनीने दिलेले पाईप विविध वॉर्डांमध्ये, महापालिकेच्या विविध कार्यालयांमध्ये पडून होते. नंतर हळूहळू पाईपला पाय फुटले. सर्व पाईप एका वर्षात गायब झाले. तब्बल १२ कोटी रुपयांचे हे पाईप गायब झाल्याची बाब समोर आली आहे. ‘लोकमत’ने १ डिसेंबरच्या अंकात याविषयी सविस्तर वृत्तही प्रकाशित केले होते. याची दखल घेऊन महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनास चौकशीचे आदेश दिले होते. मुख्य लेखापरीक्षकांमार्फत चौकशी करण्याचा निर्णय घेतला. चौकशी समितीला मात्र हवी असलेली कागदपत्रे, कोणाला किती पाईप दिले याची माहिती पाणीपुरवठा विभागाकडून उपलब्ध करून देण्यात येत नाही. त्यामुळे चौकशीला विलंब होत असल्याचे समोर येत आहे. चौकशी समितीला अधिकारी, कर्मचारी सहकार्य करीत नसतील, तर दोषींवर दोषारोपपत्र ठेवून अंतिम अहवाल सादर करावा, असे निर्देशही महापौरांनी दिले.
‘त्याच’ व्यासाची कामे
मागील दोन महिन्यांपासून मनपाच्या पाणीपुरवठा विभागाकडून पाईप बदलण्याची कामे मोठ्या प्रमाणात काढण्यात आली आहेत. समांतर जलवाहिनीच्या कंपनीने १००, १५०, २०० मि.मी. व्यासाचे पाईप वाटले होते. याच व्यासाची कामे सध्या मनपाकडे प्रगतिपथावर आहेत.
आत्ताच एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे काढण्याचे औचित्य काय? सेटिंग कोणाची?
महापालिकेने कोट्यवधी रुपयांची विकासकामे काढली आहेत. कंपनीचे गायब झालेले पाईप परत मनपाच्या विकासकामांमध्ये वापरण्याचा घाट काही कंत्राटदार मंडळींनी रचल्याची चर्चाही मनपा वर्तुळात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सेटिंग कोणी लावली, हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

Web Title: Aurangabad Pipe scam; Who is the culprit?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.