Aurangabad Municipal Corporation's Annual Politics | औरंगाबाद मनपा वर्धापनदिनी राजकीय कोपरखळ्या

ठळक मुद्देनियमबाह्य कामे केल्यानेच तुम्ही नेते झाले...

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : राजकारणात आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर कायद्याच्या चौकटीत कसे काम करता येईल. पोलीस ठाण्यातून आरोपीला सोडवून आणले तरच नागरिक त्याला नेता म्हणतात. हे काम तुम्ही अनेकदा केले आहे, आता मनपातील नवीन राजकारण्यांना कायद्याच्या चौकटीत काम करण्याचा सल्ला अजिबात देऊ नका, अशी राजकीय कोपरखळी माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांनी शिवसेनेचे महानगरप्रमुख तथा माजी महापौर प्रदीप जैस्वाल यांना मारली.

निमित्त होते, महापालिकेच्या वर्धापन दिनाचे. वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सिद्धार्थ उद्यानात सर्व माजी महापौरांचा सत्कार समारंभ गुरुवारी दुपारी आयोजित केला होता. २० पैकी १२ माजी महापौर या कार्यक्रमास उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्त नवल किशोर राम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना माजी महापौर ओबेरॉय यांनी चौफेर फटकेबाजी केली. माजी महापौर प्रदीप जैस्वाल यांच्या भाषणाचा धागा पकडत ते म्हणाले की, प्रदीपजी तुम्ही म्हणता सर्वांना कायद्याच्या चौकटीत काम करा... कसे करणार? तुम्ही स्वत: अनेकदा कायद्याच्या विरोधात काम केलेले आहे. त्यामुळेच तर तुम्ही नेते झालात, अशी कोरखळी मारताच उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला.

एका घरात दोन महापौर ही किमया फक्त घोडेलेच करू शकतात. दररोज सकाळी घरातून निघताना तोंडात साखर घालून निघायचे, जनसंपर्कही दांडगा आहे. संधी मिळाली तर अजिबात सोडू नका, असा सल्लाही त्यांनी घोडेले यांना दिला. मध्य मतदारसंघात योग जुळवून आणा... संधी पुन्हा पुन्हा येत नाही. माझे बघा संपूर्ण आयुष्य गेले; पण आयुष्यात मी नेहमी म्हणायचो की, ‘अब की बार मैच’ आपले घोडे दामटायचेच असते. यावर एकच हास्याचे फवारे उडाले. या घोषणेवर मी अनेक निवडणुकाही जिंकल्या आहेत. बापू घडामोडे यांच्याकडे बघत पक्षी कसे कोरून काढतात तसे काम यांनी केले.

महापौर नंदकुमार घोडेले यांनी आपल्या प्रास्ताविकात माजी महापौरांच्या कार्याचा थोडक्यात गौरव केला. विकास जैन आणि गजानन बारवाल यांच्याकडे कटाक्ष करीत हे दोन जण माजी महापौर असूनही सतत सत्तेत असतात. व्यासपीठावर चार माजी महिला महापौर उपस्थित होत्या. सर्व माजी महापौर भगिनी असा शब्दप्रयोग घोडेले यांनी केला. त्यावर सभागृहाच्या भुवया उंचावल्या. दुस-याच क्षणी त्यांनी दुरुस्ती करीत एक माझी सुविद्य पत्नीही आहे, असा उल्लेख केला.

माजी महापौर अशोक सायन्ना यादव यांनीही मनमोहनसिंग ओबेरॉय यांच्यासमोर पुतळा उभारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर हजरजवाबी ओबेरॉय व्यासपीठावरून अजून मी आहे, असे सांगताच एकच हास्याचे फवारे उडाले.
घोडेले यांनी खरोखर मध्यमध्ये नशीब अजमावून बघावे. खा. खैरे यांना तुम्ही सांभाळून घ्या... प्रदीपजींना मी सांभाळून घेतो... असेही त्यांनी नमूद केले. माजी महापौर सुदाम मामा सोनवणे, बापू घडमोडे, मनपाचे प्रभारी आयुक्त नवल किशोर राम यांनीही मार्गदर्शन केले. शेवटी आभार उपमहापौर विजय औताडे यांनी मानले. स्वच्छतेचे काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांचा सत्कारही करण्यात आला.

बापूची ‘ऐनवेळी’ एन्ट्री
कार्यक्रमास उपस्थित ११ माजी महापौरांचा सत्कार झाल्यानंतर ऐनवेळी बापू घडमोडे यांनी कार्यक्रमस्थळी एन्ट्री मारली. उपस्थितांमध्ये बापूंची ऐनवळी एन्ट्री यावर कुजबुज सुरू झाली.

१२ माजी महापौरांचा सत्कार
मनपाचे पहिले महापौर शांताराम काळे, प्रदीप जैस्वाल, मनमोहनसिंग ओबेरॉय, अशोक सायन्ना, सुनंदा कोल्हे, गजानन बारवाल, शीलाताई गुंजाळे, सुदाम मामा सोनवणे, विकास जैन, रुक्मिणीबाई शिंदे, अनिता घोडेले, बापू घडमोडे यांची उपस्थिती होती.