औरंगाबाद लोकसभेसाठी नवीन चेहरा द्या; आमदार जाधव यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:13 PM2018-04-19T13:13:49+5:302018-04-19T13:14:36+5:30

औरंगाबाद लोकसभेसाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.

Aurangabad to give new face to Lok Sabha; Letter to MLA Jadhav's Uddhav Thackeray | औरंगाबाद लोकसभेसाठी नवीन चेहरा द्या; आमदार जाधव यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र

औरंगाबाद लोकसभेसाठी नवीन चेहरा द्या; आमदार जाधव यांचे उद्धव ठाकरे यांना पत्र

googlenewsNext
ठळक मुद्देमागील काही वर्षांपासून खैरे आणि जाधव यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत.

औरंगाबाद : औरंगाबाद लोकसभेसाठी नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी कन्नडचे आ. हर्षवर्धन जाधव यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. सर्वसामान्य जनतेत खा. खैरे यांच्याबाबतीत प्रचंड असंतोष आहे. शहरातील कचरा प्रकरण, पाणीपुरवठ्याची समस्या खैरे मनपाच्या केंद्रस्थळी असताना सोडवू शकले नाहीत. शिवाय त्यांच्या मतदारसंघात त्यांनी विकासनिधीत गैरव्यवहार केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केले आहे, असेही आ. जाधव यांनी पत्रात म्हटले आहे.

मागील काही वर्षांपासून खैरे आणि जाधव यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद आहेत. पक्षप्रमुख ठाकरे यांच्या मध्यस्थीने ते मतभेद मिटविण्याचा प्रयत्न मध्यंतरी झाला; परंतु जिल्हा नियोजन समितीच्या निधीत झालेल्या कपातीमुळे पुन्हा आ.जाधव यांनी खा. खैरे हे विकासकामांच्या आड येत असल्याचा आरोप केला आहे.

१९ व २० एप्रिल रोजी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही पदाधिकाऱ्यांची औरंगाबादेत बैठक घेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आ. जाधव यांनी औरंगाबाद लोकसभेच्या उमेदवारीवरून वाचा फोडली आहे. त्यावर पक्षप्रमुख ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे ‘इच्छुक नवीन चेहऱ्यां’चे लक्ष लागले आहे. दरम्यान खा. खैरे पक्षप्रमुख आपल्याऐवजी आ. जाधव यांच्याबाबतीत निर्णय घेतील, असे बोलत आहेत. जाधव यांचा बोलविता धनी अन्य कुणीतरी असल्याचे त्यांचे मत आहे. जाधव हे वारंवार खा. खैरे यांना लक्ष्य करीत असल्यामुळे या दोघांच्या वादावर पक्षप्रमुख काय तोडगा काढतात ते लवकरच कळेल. 

आ. जाधव यांनी पत्रात म्हटले आहे, कन्नड-सोयगाव मतदारसंघात कृउबा, नगरपालिका, पंचायत समिती, जि.प.मध्ये मला एकही उमेदवारी दिली नाही, त्यामुळे विकास आघाडी स्थापन करावी लागली. आघाडीची मते आणि शिवसेनेला मिळालेली मते यातून सर्व काही स्पष्ट होते. जि.प.निवडणुकीत माझ्या पत्नीच्या विरोधात प्रचार केला. आता त्यांच्यासाठी मी लोकसभेत मतदान मागायला कसे जाऊ हा मोठा प्रश्न आहे. खैरे शिवसेना नेते आहेत, त्यामुळे त्यांना राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर पाठवावे. मात्र, त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नये. उमेदवारी दिल्यास धोका होऊ शकतो, असा सल्लाही त्यांनी पक्षप्रमुखांना दिला आहे. 

शिवसेनेचे नुकसान खैरेंमुळेच
जिल्ह्यात शिवसेनेचे नुकसान खैरेंमुळेच होत आहे. वैजापूर निवडणुकीत देखील साठ्या-लोट्याचे राजकारण त्यांनी केले. शहर अनेक समस्यांनी ग्रासले असताना त्यांना त्यावर उपाय काढता आला नाहीत. सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याशी औरंगाबाद मनपा खेळ करीत आहे. समस्येने उग्ररूप धारण केलेले आहे. खा. खैरे केंद्रस्थानी असताना त्यांना मागील २० वर्षांत शहरासाठी काहीही करता आलेले नाही, असे आरोप आ. जाधव यांनी पत्रात केले आहेत.

Web Title: Aurangabad to give new face to Lok Sabha; Letter to MLA Jadhav's Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.