औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ‘सर्वपित्री’ नंतर बदलण्याची शक्यता 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 11:30 AM2018-10-01T11:30:55+5:302018-10-01T11:33:02+5:30

सर्वपित्री अमावास्येनंतर पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू

Aurangabad district's Guardian Minister will be replaced after 'sarvpipreeti' | औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ‘सर्वपित्री’ नंतर बदलण्याची शक्यता 

औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री ‘सर्वपित्री’ नंतर बदलण्याची शक्यता 

googlenewsNext

औरंगाबाद : जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याच्या हालचालींना मुंबईस्तरावर वेग आला आहे. सर्वपित्री अमावास्येनंतर पालकमंत्री बदलण्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, राज्यमंत्री दादा भुसे आणि अर्जुन खोतकर यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे. खोतकर यांच्या नावाला विरोध होत असला तरी त्यांच्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी येणार असल्याचे बोलले जात आहे.

विद्यमान पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या आमदारकीचा कार्यकाळ ७ जुलै रोजी संपला. त्यामुळे त्यांना सहा महिन्यांपर्यंतच त्या पदावर राहणे शक्य आहे. अतिरिक्त सहा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ जानेवारी २०१९ मध्ये संपण्यापूर्वीच त्यांच्या जागेवर भुसे किंवा खोतकर यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. ८ जानेवारी २०१५ रोजी रामदास कदम यांनी पालकमंत्री म्हणून जबाबदारी घेतली. त्यानंतर १५ जानेवारी २०१८ रोजी कदम यांना पदावरून हटविण्यात आले. खा. चंद्रकांत खैरे आणि कदम यांच्यातील राजकीय सुंदोपसुंदीमुळे कदमांकडून औरंगाबादचे पालकमंत्री पद काढून घेण्यात आले. त्यांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांची वर्णी लावण्यात आली. 

अलीकडच्या ९ महिन्यांत डॉ. सावंत यांना जिल्ह्यात ठसा उमटविणारे काम करता आले नाही. ९ महिन्यांत कचरा समस्या, बीड बायपास, समांतर जलवाहिनी, प्राधिकरण विकासकामांबाबत त्यांना काहीही करता आले नाही. जिल्हा नियोजन बैठक आणि इतर सरकारी कार्यक्रमांपुरतेच ते शहरात आले. तसेच खा. खैरे आणि सावंत यांच्यात कदम यांनी मंजूर केलेल्या नियोजन समितीच्या कामांमध्ये कपात करण्यावरून वाद झाल्याची चर्चा मध्यंतरी होती. त्यातच सावंत यांचा विधान परिषद सदस्य पदाचा कार्यकाळ संपला. त्यामुळे त्यांनीही बैठकीपुरतीच पालकमंत्री पदाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. दरम्यान गेल्या आठवड्यात जिल्हा नियोजन विभागाने मुंबईला विकासकामांचा सगळा दस्तावेज घेऊन डॉ. सावंत यांच्याकडे एका बैठकीला हजेरी लावली. कदाचित संभाव्य बदलांमुळेच डॉ. सावंत यांनी त्या बैठकीचे आयोजन केले असावे.

खोतकरांना स्थानिक नेत्यांचा विरोध
राज्यमंत्री खोतकर किंवा दादा भुसे यांच्यापैकी एकावर पालकमंत्री पदाची जबाबदारी येण्याची शक्यता आहे. खोतकर यांच्या नावाची चर्चा मध्यंतरी सुरू झाली होती; परंतु त्यांच्या नावालादेखील स्थानिक सेना नेत्यांचा विरोध आहे. जालना लोकसभा मतदारसंघातून खोतकर यांना शिवसेनेने मैदानात उतरविण्याचा विचार पक्का केला असेल तर खोतकर पालकमंत्री होणे शक्य आहे, पक्षातील मतभेदांचा विचार झाला तर भुसे यांच्याकडे पदाची जबाबदारी देण्याबाबत विचार होईल, अशी चर्चा आहे. 

Web Title: Aurangabad district's Guardian Minister will be replaced after 'sarvpipreeti'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.