दुर्दम्य इच्छाशक्ती ! ९० टक्के दिव्यांग अथर्व गोपाळला व्हायचंय जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 01:36 PM2019-06-04T13:36:00+5:302019-06-04T13:38:32+5:30

दहावीत ९० टक्के तर बारावीत मिळवले ८५.६९ टक्के गुण

In Aurabagabad, 90 percent divyanga Atharva Gopal wants to be IAS | दुर्दम्य इच्छाशक्ती ! ९० टक्के दिव्यांग अथर्व गोपाळला व्हायचंय जिल्हाधिकारी

दुर्दम्य इच्छाशक्ती ! ९० टक्के दिव्यांग अथर्व गोपाळला व्हायचंय जिल्हाधिकारी

googlenewsNext
ठळक मुद्देस्वत:च्या क्षमतेवर गुण घेतल्याचा विशेष अभिमानयूपीएससीची तयारी सुरू

औरंगाबाद : दुर्दम्य इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी असेल तर कोणत्याही गोष्टीवर सहज विजय मिळवू शकतो, असे म्हटले जाते. ९० टक्के दिव्यांग असलेल्या अथर्व भास्कर गोपाळ या विद्यार्थ्याने दिव्यांगत्वावर मात करीत स्वअभ्यासातून बारावीच्या कला शाखेच्या परीक्षेत तब्बल ८५.६९ टक्के गुण मिळविले आहेत. दहावीलाही त्याने ९०.४० टक्के गुण मिळविले होते. अथर्वला जिल्हाधिकारी बनायचे असून, त्यासाठी यूपीएससी परीक्षेची तयारीही तो करीत आहे.

शहरातील न्यू हायस्कूलचा विद्यार्थी असलेला अथर्व तीन वर्षांचा असतानाच २००४ साली अतितापेमुळे दिव्यांगत्व आले. तेव्हापासून तो अंथरुणालाच खिळलेला आहे. त्याचे आई-वडील दोघेही जि.प. शाळेत शिक्षक आहेत. एक भाऊ अभियांत्रिकीचे शिक्षण घेतो. घरात दिवसभर बसून राहावे लागते. उभे राहता येत नाही. खुर्चीवर बसायचे असेल तर उचलून ठेवावे लागते. सतत काळजी घ्यावी लागते. शिक्षक असलेल्या आई-वडिलांनी अथर्वला इतर मुलांप्रमाणे कोणतीही गोष्ट पाहिली नाही, शिकवली नाही किंवा अनुभवली नाही, असे वाटू नये म्हणून प्रचंड मेहनत घेतली. 

अथर्व चौथीला असताना त्याने नवोदयची परीक्षा देत प्रथम क्रमांक मिळवला होता. मात्र, दिव्यांग असल्यामुळे त्याला तेथे प्रवेश घेता आला नाही. तरीही त्याने खाजगी शाळेत शिक्षण सुरू ठेवले. त्याला शाळेत केवळ परीक्षेपुरतेच जाता येत होते. त्यामुळे सर्व अभ्यास हा घरीच करावा लागे. आई-वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे दिवसभर घराबाहेर असत. संध्याकाळी तेच अभ्यास करून घेत. त्यातून अथर्वने स्वअभ्यासाची सवय लावून घेतली. गणित, इंग्रजी, इतिहास, भूगोल, विज्ञान या विषयांना तोंडपाठ केले. दहावीच्या परीक्षेला मदतीसाठी लेखनिक घेतला. त्यात ९०.४० टक्के मिळवले. या आत्मविश्वासामुळे अथर्वने पुढील शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. विज्ञान शाखेला जायचे होते. मात्र, महाविद्यालयात प्रात्यक्षिक असते, त्यामुळे कला शाखेत प्रवेश घेतला. 

बारावीच्या परीक्षेतही लेखनिकाच्या मदतीने परीक्षा दिली. यात त्याला ८५.६९ टक्के एवढे गुण मिळाले आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षेत घेतलेल्या टक्केवारीचा अभिमान असून, स्वत:च्या क्षमतेवर गुण घेतल्याचा विशेष अभिमान वाटतो, असेही तो 
सांगतो. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी बनायचे आहे. त्यासाठीची तयारी दोन वर्षांपासून सुरू आहे. त्यातही निश्चितच यश मिळणार, असेही तो सांगतो.

महापुरुषांच्या चरित्रग्रंथांचे वाचन
अथर्वने केवळ परीक्षेचा अभ्यासच केलेला नाही, तर त्याने महापुरुषांच्या चरित्रग्रंथांचे वाचन केले आहे. यात शिवाजी महाराजांपासून ते महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आदींचा समावेश आहे. याशिवाय इतरही सामाजिक परिवर्तन करणारे लढे, स्वातंत्र्यसंग्रामाचा लढाही अथर्वला मुखोद्गत असल्याचे त्याचे वडील भास्कर गोपाळ यांनी सांगितले. क्रिकेट, फुटबॉल, संगीताचीही आवड असल्याचे अथर्वने सांगितले.

ऐतिहासिक किल्ले अन् पर्यटन स्थळांना भेटी
अथर्व ९० टक्के दिव्यांग असल्यामुळे वर्षभर तो घरातच असतो. त्याला बाहेरील जग माहीत व्हावे यासाठी गोपाळ दाम्पत्य शाळांना सुट्या लागल्या की, अथर्वला घेऊन ऐतिहासिक किल्ले, पर्यटन स्थळांना भेटी देतात. आजपर्यंत त्यांनी अथर्वला घेऊन रायगड, शिवनेरी, विशालगड, पन्हाळा, भंडारदरा, माळशेज, ओझर, सिंदखेडराजा, दौलताबाद, वणी, सापूतारा अशा ठिकाणांना भेटी दिल्या आहेत. या भेटीमुळे अथर्वला अधिक जिद्दीने दिव्यांगत्वावर मात करण्याची प्रेरणा मिळते, असेही भास्कर गोपाळ यांनी सांगितले.

Web Title: In Aurabagabad, 90 percent divyanga Atharva Gopal wants to be IAS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.