आयकर बुडव्यांच्या मालमत्तेचा लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 01:15 AM2018-06-20T01:15:12+5:302018-06-20T01:17:29+5:30

वर्षानुवर्षे आयकर बुडविणाऱ्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. यातूनच शहरातील एका व्यक्तीच्या तीन स्थावर मालमत्ता विकून ५० लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे.

Auction of property of income tax dues | आयकर बुडव्यांच्या मालमत्तेचा लिलाव

आयकर बुडव्यांच्या मालमत्तेचा लिलाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : वर्षानुवर्षे आयकर बुडविणाऱ्यांच्या मालमत्तेचा लिलाव करण्यास आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. यातूनच शहरातील एका व्यक्तीच्या तीन स्थावर मालमत्ता विकून ५० लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या इतिहासातील ही दुसरी घटना ठरली आहे. मागील वर्षी जालन्यात अशाच प्रकारे मालमत्तांचा लिलाव करण्यात आला होता.
अनेक जण असे आहेत की, ते पात्र असूनही अनेक वर्षांपासून आयकर भरत नाही, अशा कर बुडव्यांच्या विरोधात आयकर विभागाने आपले लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील दिवंगत व्यक्ती मोहंमद अब्दुल साजिद अब्दुल सत्तार यांनी १० वर्षांपूर्वी आयकर भरला नव्हता. वडिलांनी हयातीत आयकर भरला नाही, तर त्यांच्या पश्चात त्यांच्या मुलांना तो भरावा लागतो. यानुसार साजेद यांच्या शहरातील तीन स्थावर मालमत्तेवर टाच आणून जाहीर लिलाव करण्यात आला. त्याद्वारे ५० लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली. उल्लेखनीय म्हणजे, या प्रकरणी लिलाव होण्याआधी व लिलाव झाल्यानंतर असे दोन वेळेस या प्रकरणी साजेद यांच्या मुलांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती; पण न्यायालयाने आयकर विभागाच्या बाजूने निकाल दिला.
मागील वर्षी जालना येथे कर बुडविणारे प्रकाश मोतीलाल कटारिया यांच्या मालमत्तेचा जाहीर लिलाव करून ४१ लाखांचा कर वसूल करण्यात आला होता. संपूर्ण मराठवाडा, खान्देश हे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिक विभागात औरंगाबादने कडक कारवाईत आघाडी घेतली आहे. कर बुडव्यांचा मालमत्तांचा लिलाव करण्याच्या दोन्ही कारवाई शहरातील आयकर विभागाने केली आहे. अशा कारवाईमुळे प्रामाणिक करदात्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण होण्यास नक्कीस मदत होईल, असे आयकर सूत्रांनी सांगितले. करवसुली अधिकारी म्हणून युवराज नाईक, मनीषकुमार सोनी, मनोज करलगीकर, डी. के. सोनवणे, अंकुर गुप्ता, आयकर निरीक्षक एल. जी. गरुड, कपिलकुमार, व्ही. एस. बेंगाळ, रिकेश अडवाणी आणि सहायक लक्ष्मण काळे यांनी लिलाव प्रक्रिया पार पाडली.

Web Title: Auction of property of income tax dues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.