वैजापूरच्या बांधकामांना कृत्रिम वाळूचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:52 AM2018-02-26T00:52:17+5:302018-02-26T01:05:34+5:30

निविदा प्रक्रियेत वैजापूरची वाळू अडकल्याने शहरासह तालुक्यातील बांधकामांना कृत्रिम वाळूचा आधार मिळाला आहे. तालुक्यातील खंडाळा येथून दररोज शंभरपेक्षा अधिक वाळूचे ट्रक शहरासह जिल्ह्यात जात आहेत. वाळूच्या ठेक्यांसाठी प्रशासनाने ई -टेंडरिंगची प्रक्रिया राबविल्याने वाळू ठेकेदारांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही.

 Artificial sand support for the construction of Vaijapur! | वैजापूरच्या बांधकामांना कृत्रिम वाळूचा आधार!

वैजापूरच्या बांधकामांना कृत्रिम वाळूचा आधार!

googlenewsNext

मोबीन खान ।
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : निविदा प्रक्रियेत वैजापूरची वाळू अडकल्याने शहरासह तालुक्यातील बांधकामांना कृत्रिम वाळूचा आधार मिळाला आहे. तालुक्यातील खंडाळा येथून दररोज शंभरपेक्षा अधिक वाळूचे ट्रक शहरासह जिल्ह्यात जात आहेत. वाळूच्या ठेक्यांसाठी प्रशासनाने ई -टेंडरिंगची प्रक्रिया राबविल्याने वाळू ठेकेदारांनी त्यास प्रतिसाद दिलेला नाही.
तालुक्यात शेकडो वाळू ठेकेदार असूनही अधिकृतरीत्या पैसे भरून टेंडर घेण्यास हे व्यावसायिक धजावत नसल्याची शंका यातून व्यक्त केली जात आहे. परिणामी, वाळूची उचल आणि विक्री ठप्प झाली आहे. त्यामुळे वैजापूर शहर परिसरात बांधकाम क्षेत्राला याचा फटका बसत आहे. अनेक बांधकामे बंद पडण्याचा मार्गावर आहेत. याचा थेट परिणाम या क्षेत्रातील बांधकाम मजुरांवर झाला आहे. मात्र, या समस्येला कृत्रिम वाळूने मोठा आधार पुढे केला आहे.
गेल्या चार वर्षांपासून तालुक्यात वाळू उपसाबंदी आहे. शहर आणि परिसरात मिळून जवळपास सध्या दोन हजार फ्लॅटस, घरकुल व शौचालयांचे बांधकाम सुरू आहे. मात्र वाळू उपलब्ध नसल्यामुळे एकीकडे प्रकल्प उभारणीवर परिणाम झाला आहे, तर दुसरीकडे बांधकाम खर्चात वाढ होत आहे. लहान सहान व्यावसायिकांना तर वाळू उपलब्धतेसाठी धावाधाव करावी लागत आहे. सामान्य माणूस अडचणीत आला असून घरबांधणीसाठी वाळू खरेदी करताना त्यांना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. मागणी जास्त आणि उपलब्धता कमी यामुळे वाळूचा दर आवाक्याबाहेर पोहोचला आहे. एक ट्रक वाळूसाठी (अडीच ते तीन ब्रास) २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळू टंचाई आणि जादा किमतीवेळी बांधकाम खर्च दहा टक्क्यांनी वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तालुक्यात चार वर्षांपासून वाळू उपसाबंदी आहे. वाळूला पर्याय म्हणून तालुक्यातील नागरिकांनी खंडाळ्यातील कृत्रिम वाळू वापराबाबतचे नवीन धोरण स्वीकारले आहे.विशेष म्हणजे (अडीच ते तीन ब्रास) केवळ सहा ते नऊ हजार रुपयात मिळत असल्याने शासकीय विभागाकडून करण्यात येणारे घरकुल, शौचालय, रस्ते, पूल आणि सरकारी इमारतींसाठी आता शंभर टक्के कृत्रिम वाळू वापरली जात आहे.
जिल्ह्यात पहिला प्लांट खंडाळ्यात
औरंगाबाद जिल्ह्यात केवळ वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथेच कृत्रिम वाळूचे दोन प्लांट असल्याचे समजते. त्यामुळे जिल्ह्यातून सुद्धा या कृत्रिम वाळूची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शहरांतील पूल, फ्लायओव्हर्स, काँक्रिट रस्ते, मोठमोठे बिल्डिंग प्रोजेक्ट, रेडिमिक्स फ्लॅट, प्रिस्ट्रेस्ड पाईप्स यांच्या निर्मितीत अनेक ठिकाणी कृत्रिम वाळूचा पर्यायी वापर सुरू झाला आहे.
च्शिवाय या कृत्रिम वाळूच्या वापराने बांधकामाची गुणवत्ता कमी न होता ती वाढते, असे बांधकाम अभियंत्यांचे म्हणणे आहे. कारण नैसर्गिक वाळू गोलाकार असते तर कृत्रिम वाळूचे कण साधारण त्रिकोणाकृती असतात. कोनिकल अँगलमुळे या बांधकामात घट्टपणा येतो. तो चुरा अधिक मजबुतीने चिकटला जातो.
वाळूबंदीने डोळ्यात पाणी
वाळू बंदीने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. रखडलेल्या बांधकामांचा परिणाम बाजारपेठेवरही झाला आहे. अवैध मार्गाने मिळणारी वाळू बारा हजारांवर गेली आहे. स्थानिक ओढे व नदी पात्रातील वाळूचा दर ५ ते ७ हजारांवर पोहोचला आहे. त्याचा परिणाम कृत्रिम वाळूवरही झाला आहे. त्या वाळूचाही दर दोन हजार वरून २२०० ते २५०० रुपये ब्रास झाला आहे. या सर्व वाढलेल्या दरामुळे व वाळू टंचाईमुळे घर बांधणारे हैराण झाले होते.

Web Title:  Artificial sand support for the construction of Vaijapur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.