कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी जोरात; रडार आयुक्तालयात बसविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2019 05:32 PM2019-07-23T17:32:19+5:302019-07-23T17:36:32+5:30

रडार पाचव्या मजल्यावर बसविल्यानंतर ढगांची छायाचित्रे घेणार

Artificial rainfall experiment preparation on high; Radar will be installed in the Divisional Commissioner's Office Aurangabad | कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी जोरात; रडार आयुक्तालयात बसविणार

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची तयारी जोरात; रडार आयुक्तालयात बसविणार

googlenewsNext
ठळक मुद्दे पुन्हा औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र म्हणून निवडले आहे. या आधी २४ जुलै २०१५ रोजी रडार येथे बसविण्यात आले होते.दोन वर्षांनी ते सोलापूरला हलविण्यात आले.

औरंगाबाद : शासनाने राज्यात क्लाऊड सिडिंगद्वारा पर्जन्यवृद्धीसाठी प्रयोग करण्याचे निश्चित केले आहे. आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून कृत्रिम पावसाच्या प्रयोगाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यासाठी ‘सी बॅण्ड डॉप्लर रडार’ विभागीय आयुक्तालयाच्या पाचव्या मजल्यावर बसविण्यात येणार आहे. 

रडार बसविण्यासाठी लागणारा लोखंडी अँगलचा सांगाडा सोमवारी आयुक्तालयात दाखल झाला. के्रनच्या साह्याने दीड टन वजनाचे लोखंडी अँगल इमारतीवर बसविण्यात येतील. २४ जुलै २०१५ रोजी रडार येथे बसविण्यात आले होते. त्यानंतर दोन वर्षांनी ते सोलापूरला हलविण्यात आले. तेथील प्रयोगात समाधानकारक यश न आल्यामुळे यावर्षी पुन्हा औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र म्हणून निवडले आहे. कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे विमान लॅण्ड व टेकआॅफसाठी लागणाऱ्या परवानग्या चिकलठाणा विमानतळ प्राधिकरणाने दिल्या आहेत.
राज्यातील सहा प्रशासकीय विभाग येथून नियंत्रित होऊ शकतात. त्यामुळे औरंगाबाद मध्यवर्ती केंद्र म्हणून निवडले आहे. रडारची क्षमता ४०० कि़मी.पर्यंत असते. औरंगाबाद हे केंद्र निवडण्यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे येथून मुंबई, पुणे, अकोला, जळगाव-धुळे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा आणि पूर्ण मराठवाड्यातील परिसरातील दुष्काळग्रस्त भाग ४०० ते ४५० कि़मी.च्या आसपास आहे. 

असा पडतो कृत्रिम पाऊस 
‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडार व पावसासाठी वापरण्यात येणारे सोडियम अ‍ॅण्ड सिल्व्हर आयोडाईडचे ‘एरोसोल्स’, ढगांची गर्दी तपासून त्या दिशेने ‘एरोसोल्स’(नळकांड्या) सोडण्यात येतात. ‘सी बॅण्ड डॉप्लर’ या रडारच्या साह्याने ढंगाचे स्कॅनिंग केले जाते. त्या स्कॅनिंग इमेजमध्ये (फोटो) किती पाणी आहे. पडण्याची क्षमता कशी आहे. किती किलोमीटरच्या रेंजमध्ये ते पाणी पडेल, याचा अंदाज लावण्यात येतो. त्यानुसार विमानाच्या साह्याने नळकांड्या ढगात सोडण्यात येतात आणि ते ढग दाटून येऊन त्या भागात पावसाच्या सरी होऊन बरसतात. जगभरामध्ये तीन ते चार देशांमध्ये या महागड्या तंत्राने पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो.

रडार स्वित्झर्लंड येथून येणार 
कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी सी बॅण्ड डॉप्लर रडार स्वित्झर्लंड येथून येणार आहे.  प्रयोगासाठी तीन कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. यापैकी ख्याती वेदर मॉडिफिकेशन कंपनीची निविदा अंतिम झाली आहे. यावर्षीही १०० तासांसाठी प्रयोग होणार आहे. आयुक्तालयातील नियंत्रण कक्षात इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ट्रॉपिकल मेट्रॉलॉजीचे (आयआयटीएम) शास्त्रज्ञ, पाऊस किती पडला याच्या नोंदी घेण्यासाठी तटस्थ लेखापरीक्षणाच्या अनुषंगाने स्वतंत्र अधिकारी नेमला जाणार आहे. 

स्फोटक परवानगी कुठून घेणार 
प्रयोगासाठी विमानाद्वारे हायग्रोस्कोपिक आणि ग्लासिओजेनिक फ्लेअर्सचा वापर करण्यात येणार आहे. सदर पदार्थ हे प्रतिबंधित आहेत. त्याला विस्फोटक नियम, २००८ च्या तरतुदीनुसार विस्फोट साठवणूक परवाना (एल-ई-५) घेणे आवश्यक आहे. ४सदर परवाना प्राप्त करण्यासाठी तसेच त्यासाठी अनुषंगिक सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण केली की नाही, याबाबत प्रशासनाकडे कुठलीही माहिती नाही. ४तसेच विभागीय आणि जिल्हा प्रशासनाकडे याबाबतची कुठलीही माहिती अद्याप आलेली नाही. रडार इकडे आणि विमान सोलापुरातून उड्डाण घेणार काय? याबाबत अजून काहीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. 

‘सी बॅण्ड डॉप्लर’ रडारवर खेळ 
‘सी बॅण्ड डॉप्लर’ या रडारचा नेटवर्क एरिया २५० कि़मी.पर्यंतच्या ढगांपर्यंत आहे. त्यापुढे ४०० कि़मी.पर्यंत हे रडार ढगांतील पाण्याचा शोध घेण्याची क्षमता ठेवते. रडार विभागीय आयुक्तालयात बसविणार म्हणजे नियंत्रण कक्षदेखील येथेच असेल. रडार बसविल्यानंतर त्यातून ढगांचे छायाचित्रण केले जाईल. ४स्केल रिफ्रेकशन्सनुसार ढगांची दिशा कळते. त्या डाटाचे स्कॅनिंग करून त्याचे छायाचित्र हवामान खाते, एमआरसॅक विभागाला पाठविले जाईल. तेथील तज्ज्ञांनी ग्रीन सिग्नल दिल्यावर विमानातील पायलट, रडार तज्ज्ञ यांच्या मदतीने ढगांमध्ये सोडियमच्या नळकांड्या सोडण्यात येतात. 

काय म्हणतात या तंत्रज्ञानाला
क्लाऊड सिडिंग टेक्नॉलॉजी असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे. रेन शेडिंग एरियामध्ये सोडियमच्या नळकांड्या विमानाच्या साह्याने हवेत सोडण्यात येतात. ढगांच्या गर्दीत सोडियमचा धूर ढगात हालचल निर्माण करतो. ढग हलके होऊन त्याच भागात बरसतात.

Web Title: Artificial rainfall experiment preparation on high; Radar will be installed in the Divisional Commissioner's Office Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.