राजकारणासाठी काहीही; ग्रामपंचायत निवडणुकीत स्वत:चेच अपत्य नाकारणाऱ्यावर फौजदारीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 11:21 AM2018-07-07T11:21:52+5:302018-07-07T11:36:42+5:30

ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी स्वत:ची मुलगी भावाची असल्याचे दर्शविणाऱ्याला  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी अपात्र ठरविले.

Anything for politics; Criminal order on Gram Panchayat member who rejecting his own offense in elections | राजकारणासाठी काहीही; ग्रामपंचायत निवडणुकीत स्वत:चेच अपत्य नाकारणाऱ्यावर फौजदारीचे आदेश

राजकारणासाठी काहीही; ग्रामपंचायत निवडणुकीत स्वत:चेच अपत्य नाकारणाऱ्यावर फौजदारीचे आदेश

ठळक मुद्देखंडपीठाने त्याला साह्य करणारा त्याचा भाऊ या दोघांना पाच लाख रुपये दंड ठोठावला. तसेच या दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे आदेशही दिले.

औरंगाबाद : ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी स्वत:ची मुलगी भावाची असल्याचे दर्शविणाऱ्याला  मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे यांनी ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी अपात्र ठरविले. खंडपीठाने त्याला साह्य करणारा त्याचा भाऊ या दोघांना पाच लाख रुपये दंड ठोठावला. तसेच या दोघांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याचे आदेशही दिले. 

दंडाच्या पाच लाख रुपयांपैकी एक लाख रुपये औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयाला, एक लाख रुपये घाटी रुग्णालयातील गरीब रुग्णांकरिता आणि तीन लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचे आदेशात म्हटले आहे. ३१ आॅगस्टपर्यंत दंडाची रक्कम न भरल्यास  स्वत:हून अवमानाची कारवाई सुरू करण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांनी जमीन महसूल अधिनियमान्वये वसुलीची कारवाई करावी, असे निर्देश देण्यात आले. तीन अपत्यांमुळे अपात्रतेपासून वाचण्याकरिता राजकारणी विविध युक्ती वापरताना  दिसतात. याला आळा बसावा, असा निकाल शुक्रवारी औरंगाबाद खंडपीठाने दिला. 

सुनावणीदरम्यान खंडपीठाने याचिकेतील आक्षेपानुसार अपत्याचे खोटे प्रमाणपत्र दाखल करून आपली मुलगी भावाची असल्याचे सांगितल्याप्रकरणी भावाची मुलगी बुशरा हिची डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले होते. अ‍ॅड. ठोंबरे यांनी मुनाफने आपली मुलगी सायमा उर्फ महेविश ही भाऊ मिनाजची मुलगी असल्याचे दाखविले आहे. मिनाजला स्वत:ला  बुशरा नावाची मुलगी असून, दोघींच्या जन्मात केवळ ३९ दिवसांचे अंतर असल्याचे खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.  यावर खंडपीठाने सायमा उर्फ महेवीश आणि मिनाजचीही डीएनए चाचणी करण्याचे आदेश दिले.  

सुनावनीत मुनाफचा भाऊ मिनाज  याने डीएनए चाचणीचा आदेश मागे घ्यावा अशी विनंती केली. आपल्याला बुशरा ही एकच मुलगी असून, सायमा कुणाची मुलगी आहे हे आपल्याला माहिती नसल्याचे नमूद केले. सुनावणीत मुनाफने सायमा ही आपलीच मुलगी असल्याचे मान्य केले. शासनातर्फे अ‍ॅड. सुभाष तांबे यांनी, असे प्रकार सातत्याने घडत असल्याने खंडपीठाने याची गंभीर दाखल घेऊन, जास्तीत जास्त कठोर शासन करण्याची विनंती केली. याचिकाकत्यातर्फे अ‍ॅड. सिध्देश ठोंबरे यांनी काम पाहिले. 

काय आहे प्रकरण?
पैठण तालुक्यातील पिंपळवाडी पिराची ग्रामपंचायतीची निवडणूक २०१५-१६ मध्ये मुनाफ सुभेदार शेख यांनी लढविली होती. मुनाफ यांनी निवडणुकीत बिलाल इसाक शेख यांना पराभूत केले. मुनाफने निवडणुकीपूर्वी अपत्यांसंबंधी सादर करावयाच्या शपथपत्रात दोन मुले असल्याचे नमूद केले होते. मुनाफच्या या शपथपत्रावर पराभूत उमेदवार बिलाल यांनी आक्षेप घेत अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे मुनाफच्या अपात्रतेसंबंधी अर्ज सादर केला. मुनाफला चार अपत्ये असल्याचा आक्षेप घेत त्याचे विवरणही सादर केले होते. मुनाफला तिसरे अपत्य २२ मार्च २००४ तर चौथे ३० आॅगस्ट २००६ रोजी झालेले आहे, असे त्यात म्हटले होते. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून मुनाफला ग्रामपंचायत सदस्य म्हणून अपात्र घोषित केले. या विरुद्ध मुनाफने अप्पर विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल केले असता त्यांनी त्याचे सदस्यत्व बहाल केले. याला बिलालने खंडपीठात आव्हान दिले होते. 

Web Title: Anything for politics; Criminal order on Gram Panchayat member who rejecting his own offense in elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.