साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन आता ऑक्टोबरमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 04:39 PM2019-07-01T16:39:30+5:302019-07-01T16:42:07+5:30

यावर्षीचा महामंडळाचा वर्धापन दिन हैदराबाद येथे १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे.

The anniversary of the Sahitya Mahamandal is now in October | साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन आता ऑक्टोबरमध्ये

साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन आता ऑक्टोबरमध्ये

googlenewsNext
ठळक मुद्देमहामंडळाचा स्थापना दिवस ३ ऑक्टोबर १९६१ आहे.संमेलनाच्या स्थळनिश्चितीसाठी समिती स्थापन

औरंगाबाद : साहित्य महामंडळाचा वर्धापन दिन दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. त्यात स्थापनेनुसार बदल करून तो आता ऑक्टोबर महिन्यात घेण्यात यावा, असा महत्त्वपूर्ण निर्णय अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील म्हणाले की, महामंडळाचा स्थापना दिवस ३ ऑक्टोबर १९६१ आहे. त्यामुळे यापुढे फेब्रुवारीमध्ये होणारा वर्धापन दिन ऑक्टोबरमध्ये घ्यावा, असे ठरले. त्यानुसार यावर्षीचा महामंडळाचा वर्धापन दिन हैदराबाद येथे १९ व २० ऑक्टोबर २०१९ रोजी घेण्यात येणार आहे. मराठी भाषा शिक्षण कायद्याबरोबरच मराठी भाषेच्या अस्तित्वाशी निगडित असलेल्या मराठी शाळा सुरू ठेवण्याचा आणि नवीन शाळांना मान्यता देण्याच्या प्रश्नांविषयीही विचार करण्यात आला आणि हे प्रश्न महामंडळाने शासनासमोर मांडावेत, असा निर्णय बैठकीत झाला.

हैदराबादचे मराठी महाविद्यालय बंद करण्यात यावे, असे तेलंगणा सरकारने महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाला कळवले आहे. हा प्रश्न अल्पसंख्याकांच्या भाषेच्या मूलभूत हक्काचा असून, वकिलाच्या साहाय्याने हे प्रकरण न्यायालयात न्यावे आणि त्यासाठी निधी साहित्य महामंडळ उपलब्ध करून देईल, असा निर्णय झाला. महामंडळाचे वार्षिक अक्षरयात्राच्या संपादक मंडळाची नियुक्तीही यावेळी करण्यात आली. डॉ. दादा गोरे हे संपादक म्हणून काम पाहतील, तर सल्लागार मंडळात सुनीता राजे पवार (पुणे), डॉ. गजानन नारे (अकोला), डॉ. उज्ज्वला मेहेंदळे (मुंबई) आणि डॉ. रामचंद्र काळुंखे (औरंगाबाद) यांचा समावेश आहे. यावेळी डॉ. काळुंखे यांनी २०१९-२० चा अर्थसंकल्प मांडला आणि तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यावेळी अध्यक्ष ठाले पाटील यांच्यासह डॉ. गोरे, डॉ. विद्या देवधर, डॉ. काळुंखे, विलास मानेकर, डॉ. गजानन नारे आदींची उपस्थिती होती.

संमेलनाच्या स्थळनिश्चितीसाठी समिती स्थापन
साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सात जणांची समिती गठित करण्यात आली. या समितीत उपाध्यक्ष डॉ. विद्या देवधर, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांच्यासह विदर्भ साहित्य संघाचे डॉ. प्रदीप दाते, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रकाश पायगुडे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे. संमेलनासाठी आलेल्या चार निमंत्रणांमधून उस्मानाबाद आणि नाशिक या दोन ठिकाणी ही समिती भेट देईल आणि अहवाल महामंडळाकडे सादर करील. त्यानुसार पुढील बैठकीत साहित्य संमेलनाच्या स्थळाविषयी विचार होईल, असेही या बैठकीत ठरले.

Web Title: The anniversary of the Sahitya Mahamandal is now in October

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.