वामन हरी पेठे ज्वेलर्समधील सोने घोटाळा : अंकुर राणेची रवानगी हर्सूल कारागृहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 12:15 AM2019-07-11T00:15:23+5:302019-07-11T00:16:03+5:30

वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ६५ किलो सोने पळविल्याप्रकरणी अटकेतील व्यवस्थापक अंकुर राणे याला न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडी ठोठावत त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली.

Ankur Rane to leave Hersaul Jail in Waman Hari Pethe Jewelers | वामन हरी पेठे ज्वेलर्समधील सोने घोटाळा : अंकुर राणेची रवानगी हर्सूल कारागृहात

वामन हरी पेठे ज्वेलर्समधील सोने घोटाळा : अंकुर राणेची रवानगी हर्सूल कारागृहात

googlenewsNext

औरंगाबाद : वामन हरी पेठे ज्वेलर्समधील ६५ किलो सोने पळविल्याप्रकरणी अटकेतील व्यवस्थापक अंकुर राणे याला न्यायालयाने बुधवारी न्यायालयीन कोठडी ठोठावत त्याची रवानगी हर्सूल कारागृहात केली. अन्य आरोपी राजेंद्र जैन आणि राजेश ऊर्फ राजू सेठीया यांची विशेष तपास पथकाने समोरासमोर बसवून कसून चौकशी केली. या चौकशीत जैन हा सेठीया यांना सोने विक्री केल्याचे सांगतो तर सेठीया सोने खरेदी केले नसल्याचे सांगत आहे. जैन याने आणखी काही सराफांना सोने विक्री केल्याचा पोलिसांना संशय आहे.
समर्थनगरातील वामन हरी पेठे ज्वेलर्सचा व्यवस्थापक अंकुर राणे याच्याशी हातमिळवणी करून दोन वर्षात ६५ किलो सोन्याचे दागिने पळविल्याप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंद आहे. या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाच्या कोठडीत असलेला आरोपी अंकुर राणे, राजेंद्र जैन आणि राजेश सेठीया यांची कसून चौकशी सुरू आहे. राणेच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. राणेकडून काहीही जप्त करावयाचे नसल्याचे पोलिसांनी सांगितल्याने न्यायालयाने त्याची रवानगी हर्सूल जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत केली. राजेंद्र जैन आणि राजेश सेठीया यांच्या पोलीस कोठडीची मुदत १२ जुलै रोजी संपणार आहे. दोन्ही आरोपींची विशेष पथकाने बुधवारी समोरासमोर बसवून चौकशी केली. त्यात जैनकडून सोने खरेदी केले नसल्याचे सेठीया सांगत आहे. सोने घेतल्याची कबुली दिल्यास ते द्यावे लागेल, हे माहीत असल्याने सेठीया खोटे बोलत असावा, असा पोलिसांना संशय आहे. शिवाय राजेंद्रकडून खरेदी केलेले सोने वितळणारे काही संशयित कारागीर गायब झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
चौकट
बँकांकडे पाठपुरावा
राजेंद्र जैन आणि त्याच्या कुटुंबाचे तसेच फर्मच्या नावे असलेल्या २५ बँकांमधील ७० खात्यांतील व्यवहाराचे विवरण तातडीने सादर करावे, याकरिता विशेष तपास पथकाने बॅँकांकडे पाठपुरावा सुरू केला. आरोपी कोठडीत असेपर्यंत हे विवरण मिळाल्यास बँकेत आणखी सोने गहाण असेल तर ते जप्त करणे पोलिसांना शक्य होईल.
------------

Web Title: Ankur Rane to leave Hersaul Jail in Waman Hari Pethe Jewelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.