भारतातील उच्चशिक्षण गंभीर अवस्थेत- अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:54 AM2018-05-16T00:54:52+5:302018-05-16T00:56:18+5:30

जागतिक स्पर्धेच्या तुलनेत भारतातील उच्चशिक्षण मोडकळीस आले आहे. गुणवत्तेचा मोठ्या प्रमाणात आभाव असल्यामुळे बेरोजगारांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यातुलनेत उच्चशिक्षणात बदल होत नाहीत. आता उच्चशिक्षणाची पुनर्रचनाच करावी लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.

Anil Kakodkar is in critical condition in higher education in India | भारतातील उच्चशिक्षण गंभीर अवस्थेत- अनिल काकोडकर

भारतातील उच्चशिक्षण गंभीर अवस्थेत- अनिल काकोडकर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जागतिक स्पर्धेच्या तुलनेत भारतातील उच्चशिक्षण मोडकळीस आले आहे. गुणवत्तेचा मोठ्या प्रमाणात आभाव असल्यामुळे बेरोजगारांची संख्याही वेगाने वाढत आहे. त्यातुलनेत उच्चशिक्षणात बदल होत नाहीत. आता उच्चशिक्षणाची पुनर्रचनाच करावी लागणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५८ वा दीक्षांत सोहळा मंगळवारी (दि.१५) नाट्यगृहात सायंकाळी चार वाजता आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे होते, तर प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य किशोर शितोळे, कुलसचिव डॉ. साधना पांडे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके यांच्यासह अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य व्यासपीठावर उपस्थित होते. दीक्षांत सोहळ्यात मार्गदर्शन करताना डॉ. काकोडकर यांनी उच्चशिक्षणातील दुरवस्था मांडली. देशात उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २४ टक्के एवढे आहे. यात ३ कोटी ४० लाख विद्यार्थ्यांसाठी आवघे १४ लाख शिक्षक अध्यापनाचे कार्य करतात. यातील ९० टक्के विद्यार्थी, शिक्षक हे खाजगी शिक्षण संस्थांतील आहेत. यातही ग्रामीण आणि शहरी भागातील उच्चशिक्षणात मोठी तफावत आहे. ग्रामीण भागात पायाभूत सुविधांची वानवा आढळते. याचा परिणाम देशात ‘क्लासेस’ (शिकवणी) हा उद्योग म्हणून पुढे आला आहे. ४.२ लाख कोटी रुपयांची उलाढाल या उद्योगात होते. त्याचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) तब्बल ४.१ टक्के एवढा मोठा वाटा असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी स्पष्ट केले. त्यातुलनेत उच्चशिक्षणातील गुणवत्ता जागतिक स्पर्धेत अत्यंत खालच्या दर्जाची आहे. उच्चशिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याचे प्रमाण मोठे आहे. देशात तब्बल २५ कोटी तरुणांना रोजगार उपलब्ध नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. हे एकूण भीषण स्वरूप असून, उच्चशिक्षणाची पुनर्रचना करावी लागणार असल्याचेही डॉ. काकोडकर यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि पाहुण्यांचा परिचय डॉ. समाधान इंगळे यांनी करून दिला.
मोजक्याच शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्ता
देशात मोठ्या संख्येने शाळा, महाविद्यालयांची निर्मिती झाली आहे. यातील काहीच शिक्षण संस्थांमध्ये गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळते. बाकी ठिकाणी आनंदीआनंद आहे. अशाच संस्थांमुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील आपुलकीचे नाते कमी होत आहे.
अधुनिक युगात जगाशी स्पर्धा करण्यासाठी शिक्षकांना अधिक प्रभावीपणे काम करीत युवकांना दर्जेदार शिक्षण द्यावे लागणार आहे. यासाठी शिक्षकांनाही प्रशिक्षण दिले पाहिजे, असेही डॉ. काकोडकर यांनी सांगितले.

Web Title: Anil Kakodkar is in critical condition in higher education in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.