Aishwarya dies in truck accident; The incident at Savagi Bypass | भरधाव आयशर ट्रक व कारच्या अपघातात बिल्डर जागीच ठार; सावंगी बायपास येथील घटना

औरंगाबाद : सिमेंट पाईपची वाहतूक करणार्‍या भरधाव आयशर कंटेनर आणि कारमध्ये समोरासमोर झालेल्या धडकेत कारचालक बिल्डर जागीच ठार झाला. हा भीषण अपघात सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास सावंगी- केम्ब्रिज शाळा बायपासवर झाला. 

फहीम खान रशिदखान(३६,रा.लतीफनगर, देवळाई)असे मृताचे नाव आहे. फहीमखान यांचे एम.के. कन्स्ट्रक्शन नावाची बांधकाम कंपनी आहे. सोमवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ते घरातून कारने (एमएच-२०बीजी २०२०) हर्सूल सावंगी येथील त्यांच्या साईटवर जाऊ लागले. केम्ब्रिज शाळा चौकातून ते सावंगी बायपासने जात जात असताना समोरून आलेल्या आयशर ट्रकने (एमएच-०६एक्यू ६३०३) त्यांना जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही वाहनांच्या समोरच्या भागाचा चक्काचूर झाला. कारचालक फहीमखान हे गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.

अपघाताच्या आवाजाने परिसरातील लोक मदतीला धावले. यानंतर प्रत्यक्षदर्शींनी तातडीने फहीमखान यांना कारमधून बाहेर काढून घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता, अपघात विभागातील डॉक्टरांनी फहीमखान यांना तपासून मृत घोषित केले. या अपघाताची माहिती मिळताच फुलंब्री पोलीस ठाण्याचे जमादार जे.बी. मुरमे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून प्रेत शवविच्छेदनगृहात हलविले. फुलंब्री ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली.