लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वारंवार तक्रार करूनही पालिका दखल घेत नसल्याने येथील एका नागरिकाने थेट ‘पीएमओपीजी’ या पंतप्रधान कार्यालयाच्या नागरी सुविधांसाठी असलेल्या वेबपोर्टलवर अतिक्रमणाबाबत तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत प्राप्त निर्देशानुसार नगरपालिकेने शहरातील सरोजिनी रोडवरील सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे गुरुवारी हटवली.
मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांच्या आदेशाने गुरुवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटविण्यास सुरुवात झाली. अतिक्रमणधारकांनी सुरुवातीला विरोध केला. मात्र, पोलिसांनी त्यांना कारवाईत अडथळा न करण्याच्या सूचना केल्या.
पालिकेच्या पथकाने एक जेसीबी आणि सहा ट्रॅक्टरच्या मदतीने येथील टपºया, पत्र्याचे शेड व अन्य दुकाने हटविली. विजया बँकेसमोरील रस्त्यावर थाटलेली अवैध दुकानेही पालिकेच्या पथकाने काढून टाकली. स्वच्छता विभागप्रमुख माधव जामधडे, स्वच्छता निरीक्षक अशोक लोंढे यांच्यासह १२५ पुरुष व महिला सफाई कामगार, दोन पोलीस निरीक्षक, ६० महिला व पुरुष पोलीस कर्मचा-यांनी कारवाईत सहभाग घेतला.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.