लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड:देशाच्या न्यायव्यवस्थेत अनेक वर्षे खटले चालल्याची उदाहरणे आहेत़ अशा खटल्यातील आरोपी, तक्रारदार यांचे निधन होईपर्यंत अशा खटल्यांचे निकालच लागत नाहीत़ अशाच एका लांबलेल्या खटल्याचा निकाल नुकताच नांदेडच्या अतिरीक्त सत्र न्यायालयाने दिला.विशेष म्हणजे या खटल्यातील एका महिला आरोपीचे मागील वर्षी निधन झाले तर एका आरोपीचीहृदय शस्त्रक्रिया याच वर्षी झाली.या खटल्यातील आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे़
लोहा तालुक्यातील पिंपळदरी येथील बालाजी भाऊराव शिंदे यांची मुलगी गंगासागरबाई हिचा विवाह अर्धापूर तालुक्यातील सांगवी खुर्द येथील कामाजी कल्याणकर यांच्याशी झाला़ ठरलेल्या ६० हजार रुपये हुंड्यापैकी १० हजार रुपये शिल्लक असल्याच्या कारणावरुन पती कामाजी, त्याचा भाऊ शेषराव व त्याची आई पार्वतीबाई यांच्या छळास कंटाळून गंगासागरबाईने ४ सप्टेंबर १९९३ रोजी आत्महत्या केली़ अशी तक्रार बालाजी शिंदे यांनी दिली़ त्यावरुन अर्धापूर ठाण्यात हुंडाबळीचा गुन्हा तिघांविरूद्ध दाखल झाला़ याप्रकरणी न्यायालयात आठ साक्षीदार तपासले़ शेवटी न्यायालयाने तिन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्या वतीने अ‍ॅड़ पी. एन. शिंदे, अ‍ॅड़ विक्रमराजे शिंदे यांनी काम पाहिले.