‘आम आदमी’ कासवगतीने

By Admin | Published: November 16, 2014 11:36 PM2014-11-16T23:36:37+5:302014-11-16T23:38:18+5:30

उस्मानाबाद : शासनाने २००७ मध्ये सुरु केलेल्या आम आदमी विद्यार्थी योजना जिल्ह्यामध्ये कासवगतीने सुरु आहे. जिल्ह्यासाठी ४७ हजार ३७६ इतके उद्दीष्ट दिले असता,

Aam Aadmi | ‘आम आदमी’ कासवगतीने

‘आम आदमी’ कासवगतीने

googlenewsNext



उस्मानाबाद : शासनाने २००७ मध्ये सुरु केलेल्या आम आदमी विद्यार्थी योजना जिल्ह्यामध्ये कासवगतीने सुरु आहे. जिल्ह्यासाठी ४७ हजार ३७६ इतके उद्दीष्ट दिले असता, आजवर अवघ्या ८ हजार ९४७ विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरली आहेत. तर १० हजाराच्या आसपास आवेदनपत्रही महा आॅनलाईनकडे पडून आहे. त्यामुळे उद्दीष्ट प्राप्तीसाठी आणखी ३० हजार ३२५ विद्यार्थ्यांचा शोध संबंधित यंत्रणेला घ्यावा लागणार आहे.
ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन, एक हेक्टर बागायती व दोन हेक्टर कोरडवाहू जमीनधारक कुटुंबप्रमुखांना विमा संरक्षण देण्याच्या उद्देशाने आम आदमी विमा योजना हाती घेण्यात आली. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लाभार्थ्यांचा विमा उतरविण्यात येतो. या योजनेच्या माध्यमातून विमाधारक कुटुंब प्रमुखाचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्यास ३० हजार रुपये. अपघाती मृत्यू झाल्यास ७५ हजार रुपये, कायमचे अपंगत्व आल्यास ३७ हजार ५०० तर दोन्ही हातपाय निकामी झाल्यास ७५ हजार रुपये दिले जातात. त्याचप्रमाणे विमाधारकाच्या इ. ९ वी ते १२ पर्यंत शिक्षण घेणाऱ्या दोन आपत्यास प्रतिमहा १०० रुपयाप्रमाणे शिष्यवृत्ती दिली जाते. इतर योजनांचा लाभ घेत असला तरी संबंधित लाभार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून ही योजना महत्वाची असली तरी याकडे स्थानिक प्रशासनाकडून फारसे लक्ष दिले जात नसल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यासाठी ४७ हजार ३७६ विद्यार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दीष्ट दिले होते. त्यापैकी प्रशासनाकडून १७ हजार ५१ विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे महा-आॅनलाईनकडे सादर केली होती. मात्र येथून अवघी ८ हजार ९४७ विद्यार्थ्यांची आवेदनपत्र भरण्यात आली आहेत. आजही ९ ते १० हजाराच्या आसपास आवेदनपत्र महा-आॅनलाईनकडे पडून आहेत. त्यामुळे आणखी ३० हजार ३२५ विद्यार्थ्यांचा प्रशासनाला शोध घेवून त्यांना या योजनेत समाविष्ट करायचे आहे. यासाठी डिसेंबर अखेर ही डेडलाईन आहे. दरम्यान, यापुढे विशेष घटक योजनेचा लाभ मिळाला किंवा नाही, हे पाहण्यासाठी थेट लाभार्थ्यांचे मेळावे घेणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
योजनेची कासवगती लक्षात घेता महसूल विभाग, समाज कल्याण आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या वतीने एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सहसचिव ग.कि.वाघ यांनी मुख्याध्यापक, तहसीलदार, नायब तहसीलदार, गटशिक्षणाधिकारी, तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आम आदमी योजनेचा लाभ गरजुंपर्यंत पर्यंत पोहचवा, असे आवाहन करतानाच या योजनेची जनजागृती करण्याची जबाबदारी महसूल, शिक्षण आणि समाजकल्याण विभागाची असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. योजना राबविताना येणाऱ्या अडचणींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी जे.टी. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीरंग तांबे, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे, तहसीलदार राजश्री मुळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी औदुंबर उकीरडे, समाजकल्याण अधिकारी मिनगिरे, नायब तहसीलदार राजेश जाधव यांची उपस्थिती होती.
आम आदमी योजनेचा लाभ घेण्यासाठी भूमिहीन असल्याचा पुरावा (पाच एकरापेक्षा कमी जिरायती आणि अडीच एकरपेक्षा कमी बागायती जमीनधारक), मुले इयत्ता ९ वी ते १२ वी इयत्तेत शिकत असल्याचा पुरावा (बोनाफाईड दाखला, किंवा गुणपत्रिका) गरजेचा आहे.
४याबाबतच्या अधिक माहितीसाठी संबंधितांनी शाळेचे मुख्याध्यापक, गावचे तलाठी अथवा तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन कार्यशाळेत करण्यात आले.

Web Title: Aam Aadmi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.