आकांक्षा देशमुखचा मारेकरी पकडला,मध्यप्रदेशात रेल्वेतून घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 12:01 AM2018-12-19T00:01:26+5:302018-12-19T00:01:38+5:30

औरंगाबादेतील महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) गंगा वसतिगृहातील डॉ. आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा उलगडा सहा दिवसांनंतर झाला. खून करून पळून गेलेल्या संशयित आरोपी मजुरास वाराणसी-मुंबई महानगरी एक्स्प्रेस रेल्वेतून मध्यप्रदेशातील कटनी, रेल्वेस्थानकावर पकडण्यात सिडको पोलिसांना यश आले.

Aakanksha was caught by the train from Madhya Pradesh | आकांक्षा देशमुखचा मारेकरी पकडला,मध्यप्रदेशात रेल्वेतून घेतले ताब्यात

आकांक्षा देशमुखचा मारेकरी पकडला,मध्यप्रदेशात रेल्वेतून घेतले ताब्यात

googlenewsNext
ठळक मुद्देसिडको पोलिसांनी सहा दिवसांत उलगडले खुनाचे गूढ

औरंगाबाद : औरंगाबादेतील महात्मा गांधी मिशनच्या (एमजीएम) गंगा वसतिगृहातील डॉ. आकांक्षा देशमुख खून प्रकरणाचा उलगडा सहा दिवसांनंतर झाला. खून करून पळून गेलेल्या संशयित आरोपी मजुरास वाराणसी-मुंबई महानगरी एक्स्प्रेस रेल्वेतून मध्यप्रदेशातील कटनी, रेल्वेस्थानकावर पकडण्यात सिडको पोलिसांना यश आले. राहुल सुरेंद्रसिंग शर्मा (२५, रा. दुधनी, मध्यप्रदेश), असे आरोपीचे नाव आहे. आकांक्षाचा खून केल्याची त्याने कबुली दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आरोपी राहुल हा कामानिमित्त औरंगाबादेत सहा महिन्यांपूर्वी वडिलांसोबत आला होता. गंगा वसतिगृहाला लागूनच सुरू असलेल्या बांधकामावर तो मजूर होता. सोमवारी (दि.१०) रात्री इतरही चार-पाच दरवाजे त्याने हलवून पाहिले; परंतु आकांक्षाचे दार त्याला उघडे दिसले. चोरीनंतर त्याने बलात्काराचा प्रयत्न केला. त्या झटापटीत त्याने तिचा गळा आवळून खून केल्याचे समोर आले. फिजिओथेरपीच्या एम.डी. प्रथम वर्षात शिकणाऱ्या आकांक्षाचा खून झाल्याचा प्रकार ११ डिसेंबरला रात्री उघडकीस आला होता.
वसतिगृहाच्या गच्चीवर तो थांबला
वसतिगृहानजीक राहुल काम करीत होता. तेथून दिसणाºया आकांक्षाच्या खोलीकडे त्याचे सारखे लक्ष होते. मनात चलबिचल असायची. त्याने चोरी आणि बलात्काराच्या उद्देशाने १० डिसेंबरच्या रात्री गुपचूप वसतिगृहाच्या गच्चीवर उडी घेतली व तेथेच थांबला. रात्री नेहमीप्रमाणे ९.३० वा. वसतिगृहाची हजेरी झाली. त्यानंतर आकांक्षा वसतिगृहातील खोलीत आली. यादरम्यान वसतिगृहाच्या छतावर लपलेला राहुल रात्री १२.३० वाजेच्या सुमारास आकांक्षाच्या खोलीत चोरीच्या उद्देशाने घुसला. गळ्यातील सोन्याची चेन ओढल्याने तिला जाग आली. त्याची आकांक्षासोबत झटापट झाली. तिने त्याचा प्रतिकार. दरम्यान, आरसा खाली आला व झटापटीत टेबलही पडला. त्याने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्नही केला; पण आकांक्षाकडून झालेल्या प्रतिकारामुळे त्याने तोंड व गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर बराच वेळ तो खोलीत होता. मग पहाटे ३ वाजेनंतर तो सीसीटीव्ही कॅमेºयापासून लपतछपत वसतिगृहापासून जवळच असलेल्या खोलीकडे गेला.
आई आजारी असल्याचे सांगून पसार
खोलीत येताच राहुलने आई आजारी असल्याचे नाटक करीत येथून पलायन करीत रेल्वेस्थानक गाठले. तेथून त्याने उत्तर प्रदेशकडे पळ काढला. त्यानंतर तो दुधणी या मूळगावी गेला. पोलिसांनी पकडू नये म्हणून त्याने केस कापून वेशांतरही केले होते, असे पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांनी सांगितले. पोलीस लागले कामाला
घटनास्थळ व मृतदेहाच्या पाहणीनंतर अनेक बाबी स्पष्ट झाल्या होत्या. कुणीही बाहेरून ये-जा करणे शक्य नव्हते. आकांक्षाच्या खोलीतील दोन विद्यार्थिनी सुटीवर असल्याने ती एकटीच होती. गळा आवळलेला, बॅग विस्कटलेल्या होत्या. गळ्यातील सोन्याची चेन गायब असल्याचे आढळून आले. बाजूलाच बांधकाम सुरू असून, एका ठिकाणी लोखंडी पत्रा थोडा वाकलेला होता. डॉक्टरांनी दिलेल्या अहवालानुसार पोलिसांतील डॉक्टरांनीसुद्धा फॉरेन्सिकला संपर्क साधला व खुनाविषयी माहिती जाणून घेतली. सिडको पोलीस ठाण्याच्या निरीक्षक निर्मला परदेशी यांनी बांधकामावरील कर्मचाºयांचे मस्टर तपासले अन् घटना घडली त्या दिवसापासून राहुल शर्मा बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. सिडको पोलीस ठाण्याने स्वत:हून खुनाचा गुन्हा नोंद करून घेत विविध पथके आरोपीच्या मागावर पाठविली. एका पथकाने उत्तर प्रदेश व मध्यप्रदेशाच्या सीमेवर त्यास जेरबंद केले, असे पोलीस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांनी सांगितले.
मोबाईल लोकेशनमुळे अटक
आरोपी राहुल शर्मा त्याचा मोबाईल काही काळासाठी सुरू करायचा अन् बंद करायचा. त्यामुळे पोलिसांना लोकेशननुसार त्याचा माग काढणे सोयीचे झाले. मिर्झापूरहून (यूपी), कटनीकडे (मध्यप्रदेश) येणारी रेल्वेगाडी तीन तास लेट असल्यामुळे राहुल पोलिसांच्या हाती लागला. हाती लाल रंगाची रेक्झिनची पिशवी अन् डोक्यावरचे, दाढीचे केस कापून पेहराव बदललेला राहुल कटनी स्थानकावर मुंबईला जाणाºया महानगर रेल्वेत बसण्याच्या तयारीत होता. तोच पोलिसांनी त्याला पकडले. त्याला ताब्यात घेऊन सिडको पोलिसांची टीम औरंगाबादला आली.
आरोपीच्या अटकेची कागदोपत्री प्रक्रिया मंगळवारी दिवसभर सुरू होती. बुधवारी त्यास कोर्टासमोर उभे केले जाईल. आरोपीने चोरी केलेली सोन्याची साखळी, तसेच इतर कोणी साथीदार त्याच्या मदतीला होते काय, खून का केला आदी बाबी तपासात स्पष्ट होतील, असे पोलिसांनी सांगितले.
परप्रांतीयांची ठाण्यात नोंद हवी
कामानिमित्त आलेल्या परप्रांतीय नागरिकांची सदरील पोलीस ठाण्यात नोंद असणे गरजेचे असून, ठेकेदारानेदेखील कामगारांची संपूर्ण माहिती देणे आवश्यक असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते.


पोलिसांनी टोचले कान
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, राजेंद्र जंजाळ कार्यकर्त्यांसह एमजीएम परिसरात आले व त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. पोलीस अधिकाºयांनी त्यांना ‘राजकीय रंगबाजी देऊ नका. आरोपी अटकेत असून, त्याने खुनाची कबुली दिली आहे. तुम्ही वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करू नका’, असा दम दिल्याने आंदोलकांनी परिसरातून काढता पाय घेतला.

Web Title: Aakanksha was caught by the train from Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.