जालना : शहरातील अंबड मार्गावर असलेल्या यशवंत नगर येथील रावसाहेब वाघ यांचे बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील ३० तोळे सोने, अर्धा किलो चांदी आणि रोख ४८ हजार रूपये असा ८ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी मध्यरात्रीनंतर घडली. श्रीराम पांडुरंग हुसे यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी तालुका जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रावसाहेब वाघ यांच्या मुलाचे गुरूवारी आकस्मिक निधन झाले आहे. त्याचा अंत्यविधी करण्यासाठी ते घनसावंगी तालुक्यातील मानेपूर येथे घराला कुलूप लावून गेले होते. चोरट्यांनी हीच संधी साधून गुरूवारी मध्यरात्री घराचा समोरील दरवाजाला लावलेले कुलूप तोडून घरात प्रवेश केला. दुसऱ्या मजल्यावरील कपाट तोडून त्यातील ३० तोळे सोन्याचे विविध दागिने, अर्धा किलो चांदी, आणि रोख ४८ हजार रूपये असा ८ लाख १७ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेले. शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती राहत असलेल्या यशवंत नगरात एवढी मोठी घरफोडी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (प्रतिनिधी)