50th Anniversary of Moon Landing : तिमिरामधल्या शतावधी तारका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:58 PM2019-07-20T12:58:51+5:302019-07-20T13:01:56+5:30

घर, मूलबाळ सांभाळत अंगणवाडी ते अंतराळ भरारी घेत महिला पारंपरिक वहिवाट सोडून विविध क्षेत्रांत पाऊल टाकत आहेत.

50th Anniversary of Moon Landing: Womens in spaceship ! | 50th Anniversary of Moon Landing : तिमिरामधल्या शतावधी तारका !

50th Anniversary of Moon Landing : तिमिरामधल्या शतावधी तारका !

googlenewsNext

- सुधाकर त्रिभुवन

घर, मूलबाळ सांभाळत अंगणवाडी ते अंतराळ भरारी घेत महिला पारंपरिक वहिवाट सोडून विविध क्षेत्रांत पाऊल टाकत आहेत. ‘कोई न रोको दिल की उडान को...’ अशी साद घालत त्या हरेक क्षेत्रात मोठ्या आत्मविश्वासाने वावरत आहेत.  नारी तू नारायणी... माता, भगिनी, कन्या अशी विविध रुपे असलेली स्त्री ही तप आणि त्यागाची तेजस्वी मूर्ती म्हणजे तिमिरामधल्या शतावधी तारका !

रशियाची पहिली अंतराळपरी व्हॅलेन्टिना तेरेश्खोवा हिने आपल्या पावलांनी मळवटलेल्या अंतराळमार्गाने विविध देशांतील महिलांनीही ही वाट धरली.  सॅली रॅड (जून १९८३) ही नासाची पहिली अमेरिकन अंतराळपरी. व्हॅलेन्टिना तेरेश्खोवा, स्वेतलाना सव्हित्सकाया (रशिया) यांच्यानंतरची सॅली रॅड ही अंतराळ प्रवास करणारी तिसरी महिला होती. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्राची पहिली महिला संचालक पेगी व्हिटस्न. वयाच्या ५७ व्या वर्षी शेवटची मोहीम फत्ते करून पृथ्वीवर परतणारी पहिली सर्वात वयस्क महिला होय. अंतराळात शतपावली करणारी स्वेतलाना सव्हित्सकाया (रशिया-जुलै १९८४) ही पहिली महिला. अंतराळात शतपावली करणारी अमेरिकेची पहिली अंतराळपरी कॅथरीन डी. सुलीवॅन (११ आॅक्टोबर १९८४). १९९१ मध्ये मीर अंतराळ केंद्राला भेट देणारी हेलन शर्मन पहिली ब्रिटिश महिला असून, मे जेमिसन (सप्टेंबर १९९२)ची अंतराळ भ्रमण करणारी पहिली आफ्रिकन-अमेरिकन महिला म्हणून नोंद आहे.

कॅनडाच्या रॉबर्ट बॉन्डटला अंतराळ प्रवास करण्याचे (१९९२) भाग्य लाभले. जपानच्या शायकी मुकाईने तर सर्वात लांब पल्ल्याचा अंतराळ प्रवास (जुलै  १९९४) केला. अंतराळवीरांच्या वैद्यकीय चिकित्सक म्हणून फ्रेंचच्या क्लाऊडी हैगनर हिने पहिल्यांदा १९९६ मध्ये रशियाच्या मीर अंतराळ केंद्राला भेट दिली. त्यानंतर २००१ मध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रावर जाणारी ती पहिली युरोपियन अंतराळपरी. अंतराळयानाचे सारथ्य करणारी पहिली महिला म्हणून एलीन कॉजलन्स (नासा) हिची नोंद आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रातील चमूत सहभागी अमेरिकेची पहिली महिला सूसॅन हेम्सची नोंद आहे. इरानियन-अमेरिकन अनॉशेश हिने पहिली महिला अंतराळ पर्यटक म्हणून ओळख निर्माण केली. 

कल्पना चावला
‘हे विश्वचि माझे घर...’ असे मानणारी भारतीय वशांची कल्पना चावला १९८८ मध्ये ‘नासा’त सामील झाली. अंतराळयान अभियंता या विषयात पीएच.डी. मिळविणाऱ्या कल्पना चावलाने १९९४ मध्ये पहिली अंतराळ भरारी घेतली. या मोहिमेत कल्पना आणि तिच्या सहकाऱ्यांनी स्पार्टन उपग्रह अंतराळात तैनात केला. २००३ मध्ये पुन्हा त्यांच्याकडे एसटीएस-१०७ या मोहिमेसाठी विशेषज्ञ म्हणून कामगिरी सोपविण्यात आली. या मोहिमेदरम्यान कल्पनाने अवकाशात ३७६ तास व ३४ मिनिटे प्रवास केला. १ फेब्रुवारी २००३ रोजी परतताना पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना कोलंबिया यानाचा स्फोट झाला. कल्पना चावला आणि यानातील तिचे सहकारी अनंतात विलीन झाले.

सुनीता विल्यम्स
सुनीता विल्यम्स भारतीय वंशाची दुसरी अंतराळपरी. ३२२ दिवस अंतराळात मुक्काम करणारी सुनीता विल्यम्सच्या नावे अंतराळात ५०० तास ४० मिनिटे चालण्याचा विक्रम आहे. तिने आतापर्यंत ३२२ दिवस अंतराळात मुक्काम केलेला आहे.

Web Title: 50th Anniversary of Moon Landing: Womens in spaceship !

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.