उमरगा : फेक कॉलद्वारे एटीएमकार्डचा पासवर्ड माहिती करून घेत चोरट्यांनी एका ग्राहकाच्या खात्यावरून तब्बल ४९ हजार ३६० रूपये लंपास केले़ उमरगा तालुक्यातील बेळंब येथील ग्राहकाची ही लूट ६ जानेवारी रोजी दुपारी झाली असून, या प्रकरणी सोमवारी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील बेळंब येथील प्रकाश शिवण्णा बंदीछोडे यांच्या मोबाईलवर ६ जानेवारी रोजी दुपारी अनोळखी इसमाचा फोन आला़ तुमचे एटीएम बंद पडले असून, ते चालू करण्यासाठी एटीएम कार्डच्या शेवटच्या भागावरील १८ अंकी नंबर व एटीएमचा पासवर्डही विचारून घेतला़ काही वेळानंतर प्रकाश बंदीछोडे यांना संशय आल्यानंतर त्यांनी बँकेत जावून चौकशी केली़ मात्र, तोपर्यंत चोरट्यांनी बंदीछोडे यांच्या खात्यावरील ४९ हजार ३६० रूपये लंपास केले़ याबाबत प्रकाश बंदीछोडे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास सपोनि कदम या करीत आहेत़