उस्मानाबाद : केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद केल्या. या नोटा बँकेत जमा करण्यासाठी पन्नास दिवसांची मुदत देण्यात आली होती. या कालावधतील जिल्हाभरातील राष्ट्रीयकृत बँकामध्ये मिळून थोडेथोडके नव्हे तर तब्बल साडेचौदाशे कोटी रूपये किंमतीच्या नोटा जमा केल्या. नोटबंदीनंतर पंचेवीस ते तीस दिवसानंतर नोटा जमा करण्याचा ‘फ्लो’ मंदावल्याचे दिसून येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी म्हणजेच ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री पाचशे तसेच हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या. केंद्र शासनाच्या वतीने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वच क्षेत्रामध्ये खळबळ निर्माण झाली. हा निर्णय घेताना जुन्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बँकेत जमा करण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. दरम्यान, या निर्णयानंतर नोटा जमा करण्यासाठी तसेच बदलून घेण्यासाठी जिल्हाभरातील सर्वच राष्ट्रीयकृत बँकांसमोर रांगा लागल्या होत्या. बँकांमध्ये येणाऱ्या नोटांचा फ्लो साधारणपणे डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अधिक होता. त्यानंतर हा फ्लो कमी-कमी होत गेला.
दरम्यान, ८ नाव्हेंबर ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत स्टेट बँक आॅफ हैद्राबाद, स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँकेसोबतच एच.डी. एफ.सी. बँक, आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक आदी सोळा बँकांच्या विविध शाखामध्ये मिळून मिळून १४५७ कोटी ८८ लाख रूपये जमा झाले आहेत. यामध्ये सुमारे ६७ लाखापेक्षा अधिक हजार रूपयांच्या नोटा जामा झाल्या आहेत. या नोटांचे सुमारे ६७५ कोटी रूपयांपेक्षा अधिक मुल्य असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. तर दुसरीकडे पाचशे रूपयांच्या सुमारे १ कोटी ५६ लाखापेक्षा अधिक नोटा ग्राहकांनी बँकांमध्ये जमा केल्या आहेत. या नोटांचे मुल्य ७८२ कोटीपेक्षा अधिक आहे. अक्षरश: लोकांनी रांगा लावून बँकेत पैसे जमा केले. परंतु, याच ग्राहकांना आता गरजेनुसार पैसे उपलब्ध होत नसल्याचे चित्र सर्वच पहावयास मिळत आहे. विशेषत: ग्रामीण भागात अत्यंत विदारक स्थिती निर्माण झाली. याचा सर्वाधिक फटका शेतकरी, शेतमजुरांसह तळागळातील घटकाला बसताना दिसत आहे. बाजारपेठेत शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण पूर्णत: कोलमडले आहेत. व्यापाऱ्याला शेतीमाल देवूनही दहा ते पंधरा दिवस पैसे खात्यावर पडत नाहीत. एकूणच बँकामध्ये साडेचौदाशे कोटीवर जुन्या नोटा जमा झाल्या. परंतु, दुसरीकडे गरजेनुसार पैसे मिळत नाहीत.