पिकांवर फवारणी करताना औरंगाबाद जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांना बाधा; पिके वाचविण्यासाठी बळीराजाचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2018 01:31 PM2018-09-07T13:31:21+5:302018-09-07T13:38:40+5:30

पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तब्बल ३७ शेतकऱ्यांना बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

37 farmers in Aurangabad district affected by crop spray; In order to save crops, the risk of farmers alive | पिकांवर फवारणी करताना औरंगाबाद जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांना बाधा; पिके वाचविण्यासाठी बळीराजाचा जीव धोक्यात

पिकांवर फवारणी करताना औरंगाबाद जिल्ह्यात ३७ शेतकऱ्यांना बाधा; पिके वाचविण्यासाठी बळीराजाचा जीव धोक्यात

ठळक मुद्देपावसाअभावी आणि अन्य कारणांमुळे पिकांवर कि डींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशके फवारली जातात.फवारणी करताना जहाल कीटकनाशकांची बळीराजालाच बाधा होत आहे

औरंगाबाद : दुष्काळ, कर्जाचा डोंगर आणि पावसाचा लहरीपणा अशा अनेक संकटांना सामोरे जाणाऱ्या शेतकऱ्यांचा जीव शेतातील पिके वाचविण्याच्या प्रयत्नात धोक्यात येत आहे. औरंगाबाद जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना तब्बल ३७ शेतकऱ्यांना बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पावसाअभावी आणि अन्य कारणांमुळे पिकांवर कि डींचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे शेतकऱ्यांकडून कीटकनाशके फवारली जातात. पिक ांवरील अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकरी नवनवीन कीटकनाशके वापरात. ही फवारणी शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ठरू पाहत आहे. फवारणी करताना जहाल कीटकनाशकांची बळीराजालाच बाधा होत असल्याचा प्रकार समोर येत आहे. पिकांवरील फवारणीनंतर अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात धाव घेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. फवारणी करताना श्वासाद्वारे कीटकनाशक शरीरात जाते; परंतु ते वेळीच लक्षात येत नाही. उलटी, मळमळ अशा त्रासानंतर कीटकनाशकाची बाधा झाल्याचे निदर्शनास येत आहे.

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत तब्बल ३७ शेतकऱ्यांना फवारणीदरम्यान कीटकनाशकाची बाधा झाली. या सर्वांवर उपजिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयांत उपचार करण्यात आले. सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात सर्वाधिक १२ शेतकऱ्यांवर उपचार करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनातर्फे देण्यात आली. ही सर्व आकडेवारी सरकारी रुग्णालयांमधील आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही अनेकांनी उपचार घेतल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कीटकनाशकाची बाधा झाल्यानंतर उलटी, मळमळ, चक्कर येणे, डोळ्यांना जळजळ हा त्रास सुरू होतो. फवारणी करताना तोंडाला कापड लावले तर श्वास घेता येत नाही. बूट घातले, तर वजन घेऊन चालत येत नाही, त्यामुळे अशी काळजी घेण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

राज्यातील शेती पिकावर कीटकनाशक फवारणी करणाऱ्या शेतकऱ्यांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात विशेष तपासणी अभियान राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांची आरोग्य तपासणी करून आरोग्य प्रमाणपत्र देण्याची सूचना करण्यात आली आहे. आरोग्य विभागाकडून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आरोग्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न केले जात आहेत.
जिल्ह्यातील परिस्थिती जिल्ह्यात फवारणीदरम्यान कीटकनाशकाची बाधा झाल्यानंतर उपचार घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या अशी आहे. गंगापूर उपजिल्हा रुग्णालय-३, वैजापूर उपजिल्हा रुग्णालय-१, सिल्लोड उपजिल्हा रुग्णालय-१२, ग्रामीण रुग्णालय कन्नड-३,  फुलंब्री-१, पिशोर-३, अजिंठा-३, सोयगाव-६, पाचोड-२, करमाड-२, बिडकीन-१.

अशी घ्यावी खबरदारी
पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना वाऱ्याची दिशा पाहावी. कीटकनाशक जमिनीवर आणि गवतावर सांडू देऊ नये, फवारणी केल्यानंतर हात-पाय स्वच्छ धुवावेत. हातमोजे, टोपी, डोळ्यांसाठी गॉगल, तोंडाला मास्क अथवा रुमाल या साहित्यांचा वापर करावा.  फवारणी करताना कीटकनाशकाची मात्रा नेमून दिलेल्या मापानुसार घ्यावी. कीटकनाशकाचे डबे सुरक्षितरीत्या नष्ट केले पाहिजेत.

काळजी घ्यावी
पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे. वाऱ्याची दिशा पाहून कीटकनाशक श्वासाद्वारे शरीरात जाणार नाही, याची काळजी घेण्यावर भर द्यावा. कीटकनाशकाची बाधा झाल्यास तात्काळ ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयात उपचार घ्यावेत.
-एस. व्ही. कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक.
 

Web Title: 37 farmers in Aurangabad district affected by crop spray; In order to save crops, the risk of farmers alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.