लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने शहरातील ३१ रस्त्यांच्या कामांना तांत्रिक मान्यता दिल्यानंतरही मनपा प्रशासनाकडून अद्याप निविदा प्रकाशित करण्यात आल्या नाहीत. निविदेत अटी व शर्थी कोणत्या ठेवाव्यात यावर महापालिकेतील काही ‘तज्ज्ञ’अधिकारी जोरदार खल करीत आहेत. अधिकाºयांच्या या कासवगतीमुळे विद्यमान महापौर भगवान घडामोडे हवालदिल झाले आहेत. महापौरांचा कार्यकाल ३१ आॅक्टोबर रोजी संपत आहे. निविदा प्रसिद्ध केल्यानंतर किमान २५ दिवस कंत्राटदारांना मुभा द्यावी लागते.
यापूर्वी २४ कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करताना महापालिकेतील तज्ज्ञ अधिकाºयांनी विशिष्ट कंत्राटदाराला डोळ्यासमोर ठेवून नियमावली तयार केली होती. आता तर १०० कोटींचे काम म्हटल्यावर निविदेतील अटी व शर्थी अत्यंत जाचक ठेवण्यात येणार आहेत. कंत्राटदाराकडे स्वत:चे हॉटमिक्स प्लँट असावे, ते शहरातच असावे, यापूर्वी शहरात काम केल्याचा कंत्राटदारांना अनुभव असावा, अशा अनेक अटी, शर्थी ठेवण्यात येणार आहेत. काही अटींमध्ये बाहेरचे कंत्राटदार आपोआप बाद होतात. ५० कोटींच्या दोनच निविदा काढा, असा महापौर आग्रह धरून आहेत. मनपा प्रशासन २५ कोटींच्या चार निविदा काढण्याच्या बाजूने आहे.निविदा प्रसिद्ध केल्यानंतर कंत्राटदारांना त्या भरण्यासाठी किमान २५ दिवसांचा अवधी द्यावा लागतो. बापू घडमोडे यांच्याकडे एवढा अवधी नाही. लकरात लवकर त्यांना कामांचे ‘भूमिपूजन’करायचे आहे. अल्प मुदतीच्या निविदा काढता येऊ शकतात का...? यावरही चिंतन सुरू आहे. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल. मागील काही दिवसांमध्ये खंडपीठाने मनपाला वेळोवेळी रस्त्यांसंदर्भात आदेश दिले आहेत. खंडपीठाचे हे आदेश शासनाकडे सादर करून अल्प मुदतीची परवानगी मिळविण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.