ठळक मुद्देऑलिम्पिक इतिहासात असा एक अॅथलीट आहे ज्याने 1912मध्ये एक नव्हे तर दोन- दोन सुवर्ण पदकं जिंकली. पण त्याला त्याच्या हयातीत ती कधीच मिळाली नाहीत. मिळाली ती मरणोत्तर...!

- ललित झांबरे

ऑलिम्पिक इतिहासात असा एक अॅथलीट आहे ज्याने 1912मध्ये एक नव्हे तर दोन- दोन सुवर्ण पदकं जिंकली. पण त्याला त्याच्या हयातीत ती कधीच मिळाली नाहीत. मिळाली ती मरणोत्तर...! जिंकल्यापासून तब्बल 70 वर्षानंतर. आणि तो दिवस होता आजचा. 13 ऑक्टोबर!

आजपासून बरोब्बर 35 वर्षांपूर्वी म्हणजे 13 ऑक्टोबर 1982 रोजी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने या खेळाडूची ही दोन्ही पदके पुन्हा बहाल करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे ज्या स्टॉकहोमला 1912 चे ऑलिम्पिक झाले तेथील राजे गुस्ताव्ह यांनी या अॅथलीटचा "सर, यु आर दी ग्रेटेस्ट अॅथलीट इन दी वर्ल्ड" अशा शब्दात गौरव केला होता. असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेने या अॅथलिटचा 'विसाव्या दशकाच्या पूर्वार्धातील सर्वोत्तम अॅथलीट' असा गौरव केला होता. अशा महान अॅथलीटवर अशी वेळ का आली? का त्याला पदकं दिली गेली नाहीत? त्याने काय असा गुन्हा केला होता? आणि कोण होता हा अॅथलीट? 

तर हा दुर्देवी अॅथलीट होता अमेरिकेचा जीम थोर्प. 1912 च्या स्टॉकहोम ऑलिम्पिकमधील पेंटाथलॉन (पाच स्पर्धांचा एकत्रित क्रीडाप्रकार) आणि डिकॅथलॉन (10 स्पर्धांचा एकत्रित क्रीडाप्रकार) या स्पर्धांचा सुवर्णविजेता. यापैकी डिकॅथलॉनमध्ये तर त्याचा 8412 गुणांचा विश्वविक्रम पुढील दोन दशके टिकला आणि 36 वर्षानंतरही त्याला ऑलिम्पिक रौप्यपदक जिंकून देण्यास पुरेसा होता. स्वीडनचे राजे गुस्ताव यांच्या हस्ते थोर्पने सुवर्णपदक स्विकारली. जगातील सर्वोत्तम अॅथलीट, अशा शब्दात राजेंनी त्याचा गौरव केला. मायदेशी अमेरिकेतही जीमचे भव्य दिव्य स्वागत झाले. परंतु सहा महिन्यातच सारे होत्याचे नव्हते झाले. 

जीम हा अॅथलेटिक्सच्या विविध प्रकारांसोबतच अमेरिकेत बेसबॉल आणि अमेरिकन फुटबॉल सातत्याने खेळायचा. या खेळांनीच जीमच्या ऑलिम्पिक  यशावर पाणी फेरले. जीम थोर्प हा ऑलिम्पिकआधी पैशांसाठी खेळल्याचे  रॉय जॉन्सन नावाच्या माणसाने शोधून काढले. तो 1909 आणि 1910 मध्ये मायनर लीग बेसबॉलमध्ये पैसे घेऊन खेळल्याचे पुरावे सादर करण्यात आले. प्रती सामना दोन डॉलर आणि आठवड्याला त्याने 35 डॉलर मानधन जीमने घेतल्याची माहिती देण्यात आली. तो हौशी नाही तर व्यावसायिक खेळाडू असल्याची तक्रार झाली.  त्या काळी ऑलिम्पिक फक्त हौशी खेळाडूंसाठीच होते. व्यावसायिक खेळाडूंना त्यात स्थान नव्हते. या कारणामुळे जानेवारी 1913 मध्ये जीम थोर्पची दोन्ही ऑलिम्पिक पदकं काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जुलै 1912 ते जानेवारी 1913 एवढाच काळ सुवर्णपदकं जीम थोर्पकडे राहिली. त्यानंतर भरपूर प्रयत्न झाले. 28 मार्च 1953 रोजी जीमचे निधनसुध्दा झाले तरीही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने त्याची ही सुवर्ण पदके पुन्हा बहाल केली नाहीत. 

तसे पाहिले तर जीम थोर्पला ही प्रामाणिकपणाची शिक्षा होती  कारण त्याच्या काळातही व्यावसायिकरित्या खेळून ऑलिम्पिक खेळणारे खेळाडू होतेच. व्यावसायिकरित्या खेळताना टोपणनाव किंवा वेगळे नाव वापरुन ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची दिशाभूल करायचे. जीम थोर्पने मात्र असे केले नाही. अजाणतेपणी तो आपल्या मूळ नावानेच व्यावसायिक मायनर बेसबॉल लीगचे सामने खेळला आणि त्याची जबर किंमत त्याला चुकवावी लागली. 
जीम थोर्पची पदके पुन्हा बहाल केली जावीत यासाठी बरेच प्रयत्न झाले परंतु 30 दिवसांतच दाद मागायला हवी होती या नियमाचा आधार घेत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हे सर्व प्रयत्न धुडकावून लावले. अखेर 13 ऑक्टोबर 1982 रोजी ही विनंती मान्य करण्यात आली आणि जानेवारी 1983 मध्ये जीम थोर्पच्या वारसांना या ऑलिम्पिक सुवर्ण पदकांच्या प्रतिकृती देण्यात आल्या.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.