Woman dies of swine flu; Treatment delayed | महिलेचा मृत्यू स्वाइन फ्ल्यूने; उपचारात दिरंगाई 

टाकरखेडा संभू - वैद्यकीय अहवाल अप्राप्त असल्याचे कारण देत उपचारात दिरंगाई झाल्याने भातकुली तालुक्यातील रुग्णाचा स्वाइन फ्लूने मृत्यू ओढवला. या प्रकरणाच्या चौकशीचे विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिका-यांना आदेश दिले आहेत. 

प्राप्त माहितीनुसार, भातकुली तालुक्यातील कामनापूर येथील प्रभा बाबूलाल कांबळे या महिलेचा स्वाइन फ्लूने १४ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. त्यापूर्वी ४ आॅक्टोबर रोजी या महिलेची स्वाइन फ्लूसंशयित म्हणून तपासणी केली आणि पाच दिवसांनी ९ ऑक्टोबरला अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात व तेथून नागपूर येथील इंदिरा गांधी शासकीय रुग्णालय व महाविद्यालयात  तपासणीसाठी रक्तनमुने पाठविले़ नागपूर येथून पाच दिवसांनी १३ ऑक्टोबरला अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाला  अहवाल प्राप्त झाला. 

मात्र, त्याच्या एक दिवसापूर्वीच १२ ऑक्टोबर रोजी प्रभा कांबळे यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मात्र तत्काळ त्याच दिवशी प्रभा कांबळे यांना उपचाराकरिता पुन्हा दाखल करून घेण्यात आले. तथापि, तोपर्यंत बराच उशीर झाला होता. वेळेवर उपचार मिळाले नसल्याने दुसºयाच दिवशी १४ ऑक्टोबरला त्यांचा मृत्यू झाला. 

विभागीय आयुक्तांनी निवेदनाची घेतली दखल
प्रभा कांबळे यांचे रक्तनमुने एकत्र केल्यानंतर लगेच ते पाठविले असते, तर त्यांचे प्राण वाचले असते, असा दावा तक्रारकर्ता विजय मुंडाले यांनी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्यासह विभागीय आयुक्त, संचालक आणि आरोग्य सहसंचालकांकडे केला. संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी  मागणी त्यांनी निवेदनात केली आहे़  निवेदनाची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाºयांना या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.