होणार का ‘सर्जिकल स्ट्राइक’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 01:17 AM2019-04-26T01:17:56+5:302019-04-26T01:18:16+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पटलावर शांत झालेली अमरावती अचानक पुन्हा ढवळून निघाली. एका आॅडिओ क्लिपने हे सारे घडले. ती क्लिप लीक झालेली असो वा कुणी लीक केलेली - त्यातून आता निर्माण झालेला चक्रव्यूह ध्वनिफितीतील पात्रांना किती आत ओढतो ......

Will 'Surgical Strike' be? | होणार का ‘सर्जिकल स्ट्राइक’?

होणार का ‘सर्जिकल स्ट्राइक’?

Next

अमरावती : लोकसभा निवडणुकीनंतर राजकीय पटलावर शांत झालेली अमरावती अचानक पुन्हा ढवळून निघाली. एका आॅडिओ क्लिपने हे सारे घडले. ती क्लिप लीक झालेली असो वा कुणी लीक केलेली - त्यातून आता निर्माण झालेला चक्रव्यूह ध्वनिफितीतील पात्रांना किती आत ओढतो आणि ओढले जाणाऱ्यांना तो कितपत भेदता येतो, याचा रंजक संघर्ष येणाऱ्या काही दिवसांमध्ये अमरावतीकरांना बघता येणार आहे.
आॅडिओ क्लिपची चर्चा सामान्यजनांत आणि राजकारण्यांमध्ये उत्सुकतेने होण्याची कारणे दोन- त्यातील आवाजातून एकमेकांविरुद्ध दंड थोपटणाऱ्या भाजप आणि काँग्रेस पक्षांमधील मैत्रीचे बंध जाहीर होणे आणि दुसरे- दोन्ही पक्षांच्या निर्णायक नेत्यांनी या मुद्याची अंतर्गत पातळीवर दखल घेणे.
वादळी चर्चा होत असलेल्या आॅडिओ क्लिपच्या राजकीय प्रयोगात बुधवारी सायंकाळी अनपेक्षित वळणबिंदू आला. सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांनी तो आवाज माझाच असल्याची कबुली स्वत:हून दिली नि ध्वनिफितीच्या खरेपणाविषयी एका बाजूने शिक्कामोर्तब झाले.
दुसरा आवाज अमरावती शहराचे आमदार राहिलेल्या रावसाहेब शेखावत यांच्या आवाजासम आहे. तो आवाज रावसाहेब शेखावत यांचा नाही, असे स्पष्टीकरण पहिल्यांदा भाजपच्या दिनेश सूर्यवंशी यांनी दिले. त्यानंतर चर्चेतील सहभागाचा इन्कार करणारे प्रसिद्धी पत्रक रावसाहेबांकडून आले.
अनुभवाप्रमाणे, सहसा पत्रपरिषदेत स्वत:बाबत बोलले जाते. सूर्यवंशी यांची पत्रपरिषद जितकी स्वत:ला फोकस करणारी होती, तितकीच ती रावसाहेबांचा बचाव करणारीही होती. विरोधातूनही मैत्रीचा सुगंध दरवळला, अशी टीका राजकीय विश्लेषकांना करता यावी, असा तो प्रसंग ठरला.
जनतेचा अपमान की बौद्धिक असामर्थ्य?
बोलणारा मीच, आवाजही माझाच, साल २०१७ - इतके मुद्दे ठळकपणे सांगणाºया दिनेश सूर्यवंशी यांना मात्र चर्चा कुणासोबत झाली, हे आठवत नव्हते. सत्ताधारी पक्षाच्या ग्रामीण जिल्हाप्रमुखांचा हा दावा सामान्यजनांना निर्बुद्ध समजणारा तरी आहे किंवा सूर्यवंशींचे बौद्धिक असामर्थ्य तरी दर्शविणारा आहे.
स्वत: निवडणूक लढण्यासाठीच्या तयारीचे मुद्दे आणि पाच कोटी रुपयांच्या बजेटची मांडणी अशी महत्त्वपूर्ण चर्चा आपण कुणाशी केली, हे सूर्यवंशी विसरत असतील, ताण देऊनही त्यांना ते आठवत नसेल, तर पक्षाने भविष्यात खरेच आमदारकीसाठीचे तिकीट त्यांना द्यावे काय?
राजकारणातील पुरुषसत्ताकपणा
ध्वनिफितीच्या चर्चेतील एक मुद्दा विचारशील मंडळींनी दखल घ्यावा असा आहे. तो मुद्दा होय - राजकारणातील पुरुषसत्ताकपणा!
महिलांचा सन्मान करणारी अमरावतीची भूषणावह परंपरा विदर्भकन्या देवी रुक्मिणीपासून तर देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपतींपर्यंत चालत आली असताना, एका महिला नेत्याला पराभूत करण्यासाठी दोन पुरुष नेत्यांनी योजलेली रणनीती, चर्चेदरम्यान वापरलेली भाषा आणि भाषाशैलीतून व्यक्त होत असलेला भाव हे सारेच स्त्रियांना 'हीन' लेखणारे आहे.
वरिष्ठ पातळीवर दखल
व्हायरल ध्वनिफितीची चर्चा दोन्ही पक्षांमध्ये मुंबई आणि दिल्ली पातळीपर्यंत पोहोचली आहे. दोन्ही पक्षांनी प्रसिद्धी माध्यमांची कात्रणे गुरुवारी सकाळीच मागवून घेतली. काही नेत्यांना त्रयस्थपणे चौकशी करण्याचे निर्देशही प्राप्त झाले आहेत. घटनेवर दोन्ही पक्षांचा शांतपणे ‘वॉच’ आहे.
आगामी काळ निवडणुकांचा असल्यामुळे सामान्यजनांच्या मनात निर्माण होणाºया भावना पक्षप्रतिमेला मारक ठरू नये, हा मुद्दा पक्षाच्या लेखी महत्त्वाचा. त्यामुळे इतर कुणावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्याचा इरादा ठेवून जरी क्लिप व्हायरल केली गेली असेल तरी आता क्लिपचीच 'सर्जरी' आणि गरज भासल्यास त्यातील सहभागी व्यक्तींवर 'सर्जिकल स्ट्राईक' होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Web Title: Will 'Surgical Strike' be?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.