मतदान आज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 11:06 PM2018-05-20T23:06:22+5:302018-05-20T23:06:53+5:30

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था अमरावती मतदारसंघातून सदस्य निवडीसाठी सोमवार, २१ मे रोजी मतदान होणार आहे. भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल माधोगडीया यांच्यात थेट लढत असून, ४८९ मतदारांच्या हाती या दोन्ही उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे.

Voting today | मतदान आज

मतदान आज

Next
ठळक मुद्दे४८९ मतदार निवडणार आमदार : पोटे-माधोगडीया यांच्या राजकीय भवितव्याचा होणार फैसला

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था अमरावती मतदारसंघातून सदस्य निवडीसाठी सोमवार, २१ मे रोजी मतदान होणार आहे. भाजपचे प्रवीण पोटे आणि काँग्रेसचे अनिल माधोगडीया यांच्यात थेट लढत असून, ४८९ मतदारांच्या हाती या दोन्ही उमेदवारांच्या राजकीय भवितव्याचा फैसला होणार आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिजित बांगर यांच्या मार्गदर्शनात विधानपरिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. कायदा व सुवव्यस्थेच्या अनुषंगाने प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. अमरावती व भातकुली या दोन तहसीलमध्ये मतदान होणार आहे. ग्रामीण भागात १२ तहसील केंद्रांवर मतदान केंद्रे राहतील. प्रत्येक केंद्रावर पाच असे एकूण ७० कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात केले आहे. ही निवडणूक थेट पोटे आणि माधोगडीया यांच्यात होत आहे. गत १५ दिवसांपासून कोणताही गाजावाजा न करता भाजप आणि काँग्रेसने छुप्या पद्धतीने प्रचार केल्याचे दिसून आले. थेट मतदारांशी संवाद, भेटीगाठी हेच सूत्र या निवडणुकीचे वैशिष्ट्य ठरले आहे. अगदी मतदानाच्या शेवटच्या दोन दिवसांपूर्वी भाजप आणि काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखली आहे. त्यामुळे रविवारी मध्यरात्रीनंतर घोडेबाजार जोरात होईल, असे राजकीय जाणकाराचे मत आहे. या निवडणुकीत महापालिकेतून ८७ नगरसेवक, जिल्हा परिषदचे ७२ सदस्य, नगरपालिका व नगरपरिषदेचे सदस्य असे एकूण ४८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील तहसीलमध्ये मतदारांना सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान मतदान करता येणार आहे.
२४ मे रोजी होणार मतमोजणी
२१ मे रोजी मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर मतमोजणी गुरूवार, २४ मे रोजी सकाळी ८ वाजता पासून येथील जिल्हा नियोजन भवनात सुरू केली जाणार आहे. मतमोजणीसाठी आवश्यकतेनुसार अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जांभळ्या रंगाच्या मार्कर पेनने मतदान
विधानपरिषद निवडणुकीत मतदारांना पसंती क्रमांकानुसार उमेदवारांना मतदान करावे लागणार आहे. त्याकरिता निवडणूक आयोगामार्फत पुरविल्या जाणाऱ्या जांभळ्या रंगाचा मार्कर पेनचा वापर अनिवार्य आहे. मतदारांना केंद्रांमध्ये कोणत्याही प्रकारचे मोबाईल, टॅब, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिक सयंत्र घेऊन जाण्यास प्रतिबंध असून या बाबींचे उल्लंघन केल्यास १८८ प्रमाणे शिक्षेस पात्र ठरतील व मुद्देमाल जप्त करण्यात येईल.

Web Title: Voting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.