मेळघाटातील आदिवासी शेतकरी छतावर घेतात पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2019 11:39 AM2019-07-09T11:39:34+5:302019-07-09T11:42:34+5:30

मेळघाटातील आदिवासी शेतकरी आता घराच्या छतावरच गावात पाऊस किती झाला, याची नोंद घेऊ लागले आहेत.

Tribal farmers of Melghat took measurements of rain water on roofs | मेळघाटातील आदिवासी शेतकरी छतावर घेतात पावसाची नोंद

मेळघाटातील आदिवासी शेतकरी छतावर घेतात पावसाची नोंद

googlenewsNext
ठळक मुद्देमेळघाटातील ११ गावांत प्रयोग घरी बनविले पर्जन्यमापक यंत्र

नरेंद्र जावरे
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मेळघाटातील आदिवासी शेतकरी आता घराच्या छतावरच गावात पाऊस किती झाला, याची नोंद घेऊ लागले आहेत. धारणी व चिखलदरा तालुक्यातील ११ गावांमध्ये हा प्रयोग सुरू झाला असून, यातून पिण्याच्या पाण्यासह पिके कोणती घ्यावी, या महत्त्वपूर्ण बाबीवर चर्चा करीत भविष्यातील पाणीटंचाईवर मात करता येणार आहे.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यात भीषण पाणीटंचाईचा सामना उन्हाळ्यात आदिवासींना करावा लागला. त्या उन्हाच्या गुन्ह्याच्या चटक्यात पाण्याचे महत्त्व चांगल्या प्रकारे शंभरपेक्षा अधिक गावांना कळले आहे. त्यामुळे कालपर्यंत श्रमदानासाठी नकार देणाऱ्या आदिवासी आता स्वत:हूनच पाण्यासाठी पुढाकार घेतला. वॉटर कप स्पर्धा अंतर्गत अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात कामे करण्यात आली. एवढ्यावरच न थांबता थेट आपल्या गावात पाऊस किती झाला, त्याचे नियोजन कसे करायचे, या सर्व गोष्टी त्यांना वॉटर कप स्पर्धेच्या चमूने समजावून सांगताच त्यावर अंमलबजावणीही झाली.

कमी खर्चात पर्जन्यमापक यंत्र
टाकाऊ वस्तूंपासून अगदी कमी खर्चात पर्जन्यमापक यंत्र तयार करण्यात आले आहे. उंच भागासह घरावरील छतावर ते ठेवण्यात आले असून, त्यात पावसाची नोंद घेतली जात आहे. पर्जन्यमापक यंत्रासाठी समान व्यास असलेली काचेची किंवा प्लास्टिकची बरणी आणि एक स्केलपट्टी घेतल्यानंतर उंच भागावर ती पडू किंवा हलू नये, यासाठी चार विटांच्या मधात वाळू व त्यात वाईट सिमेंट टाकून घट्ट करण्यात येते. उन्हाळ्यात असे यंत्र लावण्यात आले असून, त्यात एका वही व दररोज पर्जन्यमानाचे नोंद घेतली जात आहे.

पिण्याचे पाणी ते पेरणीपर्यंत फायदा
आपल्या गावात पाऊस किती झाला, याची नोंद मेळघाटात कुठल्या गावात आजपर्यंत नव्हती. तालुकास्तरावर होणारी पावसाची नोंद ही त्या गावातली असल्याने उन्हाळ्याच्या नियोजनासह कुठले पीक घ्यावे, हे परंपरागत अनुभवावरून ठरत होते. आता गावात पावसाची नोंद होऊ लागल्याने पिण्यासाठी किती आवश्यक, गहू घ्यायचा की हरभरा, खरीप-रबीत कुठले पीक घ्यायचे आदी नियोजन करता येणार असल्याचे वाटर कप स्पर्धेचे स्वयंसेवक मनोज कुयटे यांनी ‘लोकमत’ला सांगितले

गावात वॉटर बजेट
गावात पडणाऱ्या पावसाचा ताळेबंद मेळघाटात आता होणार आहे. पर्जन्यमापक यंत्रातून गावात एकूण पाऊस किती झाला, याची नोंद चिखलदरा तालुक्यात शेतकरी चार ठिकाणी होते. कुलंगणा येथे साधुराम खडके, मोथा येथे तेजु शेळके, बामादेही येथे राणू बेठेकर, आवागड येथे भानू चिमोटे ही नोंद घेतात. धारणी तालुक्यात बेरदाबल्डा, दहेंडा, बोथरा, चुटिया, घुटी, मान्सुवडी, बोबदो या गावांमध्ये नोंदी घेतल्या जात आहेत.
 

Web Title: Tribal farmers of Melghat took measurements of rain water on roofs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Melghatमेळघाट