आद्यशिक्षिकेच्या अध्यासन केंद्रासाठी निधी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 03:31 PM2019-07-13T15:31:39+5:302019-07-13T15:43:37+5:30

देशातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे निधी नसल्याची विदारक स्थिती आहे.

There is no funding for the instructor's teaching center in sant gadge baba amravati university | आद्यशिक्षिकेच्या अध्यासन केंद्रासाठी निधी नाही

आद्यशिक्षिकेच्या अध्यासन केंद्रासाठी निधी नाही

Next
ठळक मुद्देआद्यशिक्षिकेच्या अध्यासन केंद्रासाठी निधी नाही संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची दैनावस्थादानशूर व्यक्तींचा शोध सुरू; व्यवस्थापन परिषदेचा निर्णय

गणेश वासनिक

अमरावती - देशातील पहिल्या शिक्षिका, स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडे निधी नसल्याची विदारक स्थिती आहे. मात्र, हे केंद्र सुरू करता यावे, यासाठी विद्यापीठाने निधी उभारणीची तयारी केली असून, दाननिधी, दानशूर व्यक्तींचा शोध चालविला आहे.

विद्यापीठात दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या व्यवस्थापन परिषदेने ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय झाला. परंतु, हे केंद्र सुरू करताना विद्यापीठाच्या तिजोरीवर ताण पडणार नाही, या हेतूनेच विद्यापीठाने सामाजिक संघटना, दाननिधी, दानशूर व्यक्तींना निधी देण्याबाबत आवाहन केले आहे. खरे तर विद्यापीठात अनेक अध्यासन केंद्रे यूजीसी, सामान्य निधी व अन्य खर्चातून सुरू आहेत. तथापि, एकोणविसाव्या शतकाच्या मध्यात देशात रूढीवादी परंपरा असलेल्या समाजात, स्त्रिला ‘चूल आणि मुला’ पुरतेच महत्त्व असलेल्या त्या काळात महिलांना शिक्षण मिळावे, यासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध लढा उभारणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या अध्यासन केंद्रासाठी निधीची तरतूद होऊ नये, ही बाब संत गाडगेबाबा यांचे नाव असलेल्या संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासाठी लाजिरवाणी ठरणारी आहे. 

फुले विचारधारा समाजात पोहोचेल

विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र सुरू झाल्यास फुले दाम्पत्याची विचारधारा समाजात पोहोचेल. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या विचारकार्यांच्या व्याख्यानमाला, सेमिनारच्या माध्यमातून प्रचार व प्रसार, सत्यशोधक समाजाच्या साहित्यावर संशोधन, संशोधनकर्त्यांना शिष्यवृत्ती, फुलेंच्या वैचारिक व संशोधनपर लेखांचे संकलन, संपादन व प्रकाशन, सत्यशोधक चळवळीच्या इतिहासाचे लेखन, संपादन याशिवाय फुले दाम्पत्याचे कलादालन आदी उपक्रम राबविता येतील.

विद्यापीठातील केंद्रे

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात श्री संत गाडगेबाबा अध्यासन केंद्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास केंद्र, स्वामी विवेकानंद स्टडीज सेंटर, बुद्धिस्ट स्टडीज सेंटर, विद्यापीठ महानुभाव पंथ केंद्र, डॉ. पंजाबराव देशमुख विभागीय अर्थव्यवस्था अध्यासन व नियमन, डायट कौन्सिलिंग सेंटर, वूमेन स्टडीज सेंटर, स्टुडंड अ‍ॅक्सेस सेंटर, रेमेडिअल कोचींग सेंटर, स्टुडंट्स कौन्सिलिंग सेल, इक्वल अपॉर्च्युनिटीज सेल आदी केंद्रे सुरू आहेत.

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र सुरू करण्यासाठी प्रारंभी एक कोटींचा निधी लागणार आहे. हा निधीवर बँकेतील ठेवस्वरूपात मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून अध्यासन केंद्र सुरू करता येईल. तसा प्रस्ताव विद्यापीठाने तयार केला आहे.

 - तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अध्यासन केंद्र सुरू करावे, यासाठी दोन वर्षांपूर्वी ओबीसी महासंघ, दलितमित्र संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले होते. कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांचीसुद्धा भेट घेतली. हे केंद्र नव्या पिढीला प्रेरणा देणारे ठरावे, अशी यामागील भावना आहे. 

- श्रीकृष्ण बनसोड, दलितमित्र, अमरावती.

 

Web Title: There is no funding for the instructor's teaching center in sant gadge baba amravati university

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.