पर्णगळीने उन्हाळ्याचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 01:14 AM2019-02-24T01:14:23+5:302019-02-24T01:15:03+5:30

पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो.

Summer greetings | पर्णगळीने उन्हाळ्याचे स्वागत

पर्णगळीने उन्हाळ्याचे स्वागत

Next
ठळक मुद्देउष्ण कटिबंधात हवामान शुष्क : वनस्पतींचा भार कमी होण्याची क्रिया

इंदल चव्हाण।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पानगळ ही वृक्षांच्या जीवनातील एक अवस्था आहे. यामध्ये भरपूर पाने असलेला वृक्ष ठरावीक ऋतुमध्ये वठलेला दिसतो. त्यानंतर त्याला नवे कपोल फुटतात. जगाच्या निरनिराळ्या भागात हा कालावधी वेगवेगळा आढळून येतो. समशीतोष्ण प्रदेशात हा कालावधी शरद ऋतूचा असतो, तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते. पानगळीमुळे वनस्पतीमधील पानांद्वारे होणारे बाष्पीभवन थांबण्यास मदत होते, हे विशेष.
आला शिशिर संपत।
पाने गळत चालली।।
या ओवीतून कवी निसर्गाचे छान विश्लेषण करतात. शांत निवांत शिशिर सरला. सळसळता हिरवा वसंत आला, असे कोकिळा गाणे गात असते. पर्यावरणाच्या दृष्टीने वर्षभरात सहा ऋतू येतात. प्रत्येक ऋतू वैशिष्ट्यपूर्णच. वर्षा ऋतूत पावसाच्या सरी कोसळतात.
शिशिर ऋतूत थंडीचा कडाका असतो. शरद, हेमंत ऋतू व वसंत ऋतूत शुष्क वातावरणामुळे वनस्पतींना उन्हाळ्याची चाहूल लागते. फेब्रुवारी महिन्यात जवळपास ९५ टक्के झाडांची पाने गळून पडतात. याचे कारणच हे की, प्रत्येक वनस्पती हवा, पाणी व सूर्यप्रकाशावर जगतात. शिशिर ऋतूपर्यंत झाडांना पाणी मुबलक राहत असल्याने प्रत्येक मुळातून पानापर्यंत पाणी पोहचते. मात्र, शुष्क वातावरणात पाण्याची पातळी खालावत असल्याने झाडे मुळात पाणी साठवितात. पानांना पाण्याचा पुरवठा बंद होतो. परिणामी पान गळाली तरी झाड मात्र ओलसरच राहते, अशी माहिती भारतीय महाविद्यालयाचे प्राध्यापक यू.एस. पाटील यांनी दिली.

आम्रवृक्षावर परिणाम नाही
विदर्भात वनस्पतींच्या अनेक प्रजाती आहेत. त्यापैकी पाच टक्के प्रजाती अशा आहेत, ज्यांची पाने वर्षभर गळत नाहीत. आम्रवृक्षाचीही पाने गळतात. मात्र, एकाच वेळी पूर्णत: गळत नसल्याने दिसून पडत नाही. कारण त्याची मुळे जमिनीत अत्यंत खोलवर गेलेल्या असतात. फांद्यांना पाणी मुबलक प्रमाणात मिळत असल्याने एकाच वेळी पूर्णत: पानगळ होत नसल्याची माहिती प्रा. डॉ. संजय गुल्हाने यांनी दिली.

पानगळीनंतर फुलांचा बहर
काही वनस्पतींना पानगळ झाल्यावर फुले येतात. पानगळ झालेली अशी झाडे पक्षी, कीटक वा इतर सस्तन प्राण्यांकडून परागीभवन करून घेतात. पाने नसल्याने फुलांवर थेट प्रवेश होऊन रस शोषण करण्यात मिळत असल्याने कीटक त्यात सामावतात. काही काळातच फुलांच्या पाकळ्या बंद होऊन कीटक त्यात अडकतो, अशी निसर्गनिर्मित किमया विदर्भात फेब्रुवारी महिन्यात अनुभवास येते.

Web Title: Summer greetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.