धक्कादायक; भूजल पातळीत दोन मीटरने तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 12:01 AM2017-11-18T00:01:47+5:302017-11-18T00:02:41+5:30

यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा ३२.६१ टक्के पाऊस कमी झाल्याचे साइड इफेक्ट आता जाणवायला लागले आहे.

Shocking Groundwater level deficit of two meters | धक्कादायक; भूजल पातळीत दोन मीटरने तूट

धक्कादायक; भूजल पातळीत दोन मीटरने तूट

Next
ठळक मुद्देधोक्याची घंटा : अचलपुरात सर्वाधिक ५.६६, चांदूर बाजारात ४.१० मीटरने कमी

गजानन मोहोड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा ३२.६१ टक्के पाऊस कमी झाल्याचे साइड इफेक्ट आता जाणवायला लागले आहे. जिल्ह्यातील १४४ निरीक्षण विहिरींच्या सर्वेक्षणाअंती भूजल सर्वेक्षण विभागाचे निरीक्षण धक्कादायक आहे. पावसाळ्यानंतर सर्वच तालुक्यातील पाच वर्षांची सरासरी भूजल पातळी ५.१० मीटर होती. यंदा मात्र ही पातळी ६.९८ मीटर आढळून आली. म्हणजेच यंदा जिल्ह्यातील भूजल पातळीत १.८६ मीटरची तूट आहे. यामध्ये सर्वाधिक अचलपूर तालुक्यात ५.६६, तर चांदूर बाजार तालुक्यात ४.१० मीटरपर्यंत तूट आढळून आली. आगामी काळासाठी ही धोक्याची घंटाच आहे.
जिल्ह्याचा ७५ टक्के भूभाग बसॉल्ट खडकाचा व २५ टक्के पूर्णा नदीच्या गाळाने व्यापला असल्याने सरासरी १० ते १२ मीटरपर्यंतची खोली भूजल पुनर्भरणास योग्य आहे. यंदा जिल्ह्यात ३२.६१ टक्क्यांनी पाऊस कमी झाल्याने अपेक्षित पुनर्भरण झालेले नाही. चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, वरूड, मोर्शी व तिवसा या पाणलोट क्षेत्रात ७५ ते ७८ टक्के पाऊस झाला. उर्वरित लघुपाणलोट क्षेत्रातील (रनआॅफ झोन मधील) निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीत मोठी तूट दिसून आली. येथे आगामी काळात पाणीटंचाईचे सावट आहे. या गावांत महाराष्ट्र भूजल (विकास व व्यवस्थापन) अधिनियम २००९ मधील ८ (१) च्या तरतुदीनुसार पिण्याचे पाण्याचे स्रोत संरक्षित करण्यासाठी कार्यवाही होणे आवश्यक असल्याचा अहवाल भूजल विभागाने जिल्हाधिकाºयांना दिला आहे.
चिखलदरा व धारणी तालुक्यात डोंगराळ भागात गावे आहेत. भूस्तर जलग्रहण क्षमता कमी असल्याने येथील भूजल पातळीत झपाट्याने घट होत आहे. वरूड-मोर्शी अतिविकसित पाणलोट क्षेत्रात समाविष्ट असल्याने व बारमाही सिंचन जास्त असल्याने विहिरी व विंधन विहिरीद्वारे भूजलाचा उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे. या तालुक्यांतील उपशावर निर्बंध आणावे लागणार असल्याचे विभागाने जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.
उन्हाळ्यात १२९ गावांत पाणीटंचाई
भूजल पातळीमधील तूट दिवसेंदिवस वाढत असल्याने जिल्ह्यातील ८४ गावांना आॅक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत, ८० गावांना जानेवारी ते मार्च २०१८ दरम्यान, तर एप्रिल ते जून २०१८ या कालावधीत ११ तालुक्यांमधील १२९ गावांना पाणीटंचाईचे चटके जाणवणार आहेत. उपाययोजनांसाठी आताच नियोजन करावयास हवे.
पाणलोट क्षेत्रात नव्या विहिरीस ना!
वरूड व मोर्शी तालुका हा अतिविकसित पाणलोट क्षेत्र आहे. या तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या भूजल उपशावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. या पाणलोट क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास महाराष्ट्र भूजल (विकास आणि व्यवस्थापन) अधिनियम २००८ मधील आठ (१) तरतुदीनुसार बंदी घालणे आवश्यक असल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आलेला आहे.

जिल्ह्यात सरासरीच्या ३६ टक्के प्रमाणात पाऊस कमी झाल्यानेच भूजलातील पाण्याची पातळी सरासरी १.८६ मीटरने कमी झाली आहे. रबीचे सिंचन सुरू झाल्यानंतर ही तूट आणखी वाढणार आहे.
- विजय खरड, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण विभाग

Web Title: Shocking Groundwater level deficit of two meters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.