The sanctity of the backwaters is being sanctified, destroyed | परतवाड्याच्या जयस्तंभाचे पावित्र्य होत आहे नष्ट

ठळक मुद्देप्रशासन गप्प : मोठा अनर्थ घडण्यापूर्वी दखल घेणे गरजेचे

आॅनलाईन लोकमत
परतवाडा : स्वातंत्र्याचे प्रतीक असलेल्या शहरातील जयस्तंभाला जातीयतेसह धार्मिक रंग चढू लागल्याचे चित्र आहे. भविष्यात मोठ्या अनुचित घटनेला ही बाब बळ देणारी ठरणार असल्याची भीती व्यक्त होत असताना प्रशासन गप्प आहे. ही चुप्पी संतापजनक ठरली आहे.
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाºयांच्या आठवणी तेवत राहाव्या, यासाठी स्वातंत्र्यानंतर गावागावांत जयस्तंभ उभारण्यात आले. जयस्तंभ हा त्यामुळेच सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. शहराच्या अस्मितेशी या विषयाला जोडले जाते. स्वातंत्र्यदिनासोबत गणराज्य दिन, शहीद दिन साजरा होण्यासोबतच महापुरुषांना आदरांजली येथे दिली जाते.
परतवाडा शहरातील जयस्तंभाबाबत मात्र धार्मिक एकतेचा संदेश देण्याऐवजी त्यावर जातीयतेचा रंग चढू लागल्याचे चित्र आणि प्रशासनाची मूकदर्शक भूमिका नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.
कुणीही यावे अन्...
जयस्तंभ शासकीय मालमत्ता असून सर्व जाती-धर्मांसाठी आदराचे स्थान आहे. तिरंगा ध्वज वगळता जयस्तंभवर कुठल्याच धर्माचे बॅनर, झेंडे त्यावर लावता येत नाही. असे असताना परतवाडा शहरातील जयस्तंभावर ज्याला वाटेल तो रंगीबेरंगी झेंडे, तोरण, बोर्ड लावतो आहे. अशाप्रकारे कायदाभंग होत असताना प्रशासनाने कुठलीच दखल घेऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कधी हलविणार जयस्तंभ ?
परतवाडा-धारणी मार्गावर मध्यवस्तीत असलेला जयस्तंभ हलविण्याचा प्रस्ताव गत पाच वर्षांपासून कागदावरच थांबला आहे. रस्ता चौपदरीकरणात जयस्तंभच खुद्द अडथळा ठरत आहे. नजीकच्या छत्रपती उद्यानाच्या टोकावर ‘जयस्तंभ’ उभारण्याचा प्रस्ताव असताना पालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग त्यावर कुठल्याच हालचाली झाल्या नाहीत.

जयस्तंभावर कुठल्याच जाती-धर्माचे बॅनर, झेंडे, फलक लावण्यावर बंदी आहे. तसे एक सूचना फलक लावण्याचे आदेश अचलपूर न. प. मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
- व्यंकट राठोड,
उपविभागीय अधिकारी


Web Title: The sanctity of the backwaters is being sanctified, destroyed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.