मित्रत्वासाठी त्यांनी केली मोहम्मद शोएबची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 01:34 AM2018-08-22T01:34:08+5:302018-08-22T01:34:30+5:30

दुसऱ्या परिसरातील मुले आपल्या परिसरात येऊन मित्रासोबत दादागिरी करीत असल्याचे पाहून मित्रत्व निभावण्यासाठी मोहम्मद शोएबची हत्या करण्यात आली. पाचशे रुपये वसूल करण्याच्या क्षणिक वादानंतर अल्पवयीन मो. शोएब गुंडगिरी प्रवृत्तीच्या तरुणांच्या तावडीत सापडून जिवाने गेला.

For the sake of friendliness, he killed Kali Mohammad Shoaib | मित्रत्वासाठी त्यांनी केली मोहम्मद शोएबची हत्या

मित्रत्वासाठी त्यांनी केली मोहम्मद शोएबची हत्या

Next
ठळक मुद्देक्षणिक वाद : गुंडगिरीच्या तावडीत सापडला अल्पवयीन

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : दुसऱ्या परिसरातील मुले आपल्या परिसरात येऊन मित्रासोबत दादागिरी करीत असल्याचे पाहून मित्रत्व निभावण्यासाठी मोहम्मद शोएबची हत्या करण्यात आली. पाचशे रुपये वसूल करण्याच्या क्षणिक वादानंतर अल्पवयीन मो. शोएब गुंडगिरी प्रवृत्तीच्या तरुणांच्या तावडीत सापडून जिवाने गेला.
जमजम कॉलनीतील रहिवासी मो. शोएब मो. इस्माईल व आरोपींपैकी विशाल यादव हे दोघेही मित्र होते. पाचशे रुपये उधारीवरून दोघांमध्ये खटका उडाला. शनिवारी दुपारी शोएब पाचशे रुपये परत देण्यासाठी विशालजवळ गेला. दरम्यान, याच कारणावरून दोघांत वाद झाला. शोऐबने विशालला शिवीगाळ केली. त्यावेळी तेथे उपस्थित विशालच्या अन्य मित्रांना हे खटकले. विशालचा मित्र निकू राजेंद्र कचरे (२२, रा. खरय्यानगर) याने शोएबच्या कानशिलात लगावून त्याला हाकलून लावले. रागाने फणफणत शोएब तेथून निघून गेला. मात्र, ही बाब त्याला जिव्हारी लागली होती.
शोएबने त्याच्या सवंगड्यांना घडलेला प्रकार सांगितला. ते शोएबसोबत हॉकी स्टिक व लाठ्या घेऊन पोहोचले तेव्हा विशालचे अन्य मित्र तेथून निघून गेले होते. शोएबने विशालकडे निकू कचरेचा मोबाइल क्रमांक मागितला. विशालने निकूला कॉल करून शोऐब मोबाइल क्रमांक मागत असल्याचे सांगितले. त्यानंतर शोएबने निकूला फोन करून प्रवीणनगरात भेटण्यास बोलावले. यावेळी त्याचा सूर धमकावणीचा होता. मित्राच्या वाढदिवसाला दारू पित बसलेले निकू व त्याचे मित्र चाकू घेऊनच प्रवीणनगरात धडकले. निकू कचरेसह विशाल व स्वप्निल भामुद्रे यांनी थेट शोएबवर चाकुहल्ला केला. केवळ लाठी हाती असलेल्या त्याचे मित्र भयभित झाले होते.
शोएब रक्तबंबाळ अवस्थेत कोसळल्यानंतर आरोपींनीही पळ काढला. शोएबला मित्रांनी इर्विन रुग्णालयात आणले. डॉक्टरांना त्याला मृत घोषित केले. अवघ्या पाचशे रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून आणि वर्चस्वाच्या तकलादू कारणावरून झालेला क्षणिक वाद शोऐबच्या जिवावर बेतला.
शोएबच्या मृत्यूनंतर तणाव
अल्पवयीन मो. शोएबची हत्या झाल्यानंतर प्रवीणनगरात तणावाचे वातावरण होते. शोएबचे मित्र व नातेवाइकांनी रोष व्यक्त करीत परिसरात गोंधळ घातल्याने नागरिकांमध्ये भीती दाटली होती. तणावाची स्थिती पाहता तत्काळ पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. चौकाचौकात फिक्स पॉइंट लावून पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले.
गुन्ह्यात वापरलेला चाकू, दुचाकी जप्त
हत्याप्रकरणात गाडगेनगर पोलिसांनी नीलेश चंद्रशेखर नखाते (२३), चैतन्य ऊर्फ निकू राजेंद्र कचरे (२२, दोघेही रा.खरय्यानगर), अभिनव ऊर्फ कन्नू ओमप्रकाश निखार (२३, रा. सहकारनगर), विशाल श्यामबहादूर यादव (१९), अजय ऊर्फ अज्जू श्यामबहादूर यादव (२१), गिरीधर प्रेमराव खंडारे (२२) मंदार संतोष नेवारे (२०) व सूरज ऊर्फ आप्पा अशोकआप्पा श्रीखंडे (२४, पाचही रा. अमरनगर) यांना अटक केली. पोलिसांनी दोन आरोपींच्या घरातून चाकू व दुचाकी जप्त केल्या. पोलीस स्वप्निल भामुद्रे याचा शोध घेत आहेत. अटकेतील आरोपींना २८ आॅगस्टपर्यंतची पोलीस कोठडी मिळाली.
पोलीस चौकीची मागणी
गाडगेनगर हद्दीतील चौकाचौकांत गुंडगिरी प्रवृत्तीचे तरुण वर्चस्व निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. अधूनमधून गुन्हेगारी घटना पुढे येत आहेत. त्यामुळे प्रवीणनगर परिसरात पोलीस चौकी व्हावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

निकू कचरेने शोएबला थापडा लगावल्याने त्याचा अहम् दुखावला. तो साथीदारासह मारहाणीच्या बेताने घटनास्थळी आला. दोन्ही गट आमनसामने आल्यानंतर हत्येचा थरार घडला.
- मनीष ठाकरे
पोलीस निरीक्षक, गाडगेनगर.

Web Title: For the sake of friendliness, he killed Kali Mohammad Shoaib

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.