Revenue and police department competition for topping the bribe! | लाचखोरीत अव्वल राहण्यासाठी महसूल व पोलीस विभागात स्पर्धा! 
लाचखोरीत अव्वल राहण्यासाठी महसूल व पोलीस विभागात स्पर्धा! 

संदीप मानकर 
अमरावती : लाचखोरीमध्ये अव्वल राहण्यासाठी महसूल विभाग व पोलीस प्रशासनामध्ये नेहमीच स्पर्धा असते. २०१० पासून या दोन विभागांची त्यासाठी चढओढ राहिली आहे. महापालिका व पंचायत समित्यांनीदेखील यादीत तिसरा-चौथा क्रमांक पटकावत ‘हम भी कुछ कम नही’ हे दाखवून देत आहेत. दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) कडून मिळालेल्या राज्यस्तरीय आकडेवारीवरून २०१० च्या तुलनेत २०१७ मध्ये सापळ्यांच्या प्रमाणात दुपटीने वाढ झाल्याचे निदर्शनास येत आहे. 
 १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१० या वर्षभराच्या कालावधीत एसीबीने लाचखोरीविरोधात ४८६ सापळे यशस्वी केले. यामध्ये ६०८ आरोपींना अटक करण्यात आली. या वर्षात लाचखोरीत पहिल्या क्रमांकावर १०९ ट्रॅपसह पोलीस प्रशासन होते. दुसरे स्थान महसूल विभागाने (९५ ट्रॅप) राखले. महापालिका (३९) व पंचायत समिती (३८) चौथ्या स्थानी होती. २०१२ या वर्षात २०१० च्या तुलनेत ट्रॅपमध्ये किंचित वाढ झाली. या वर्षात एकूण ४८९ सापळ्यांमध्ये ६३३ जणांना ताब्यात घेतले. या वर्षातही पोलीस प्रशासन १२७ ट्रॅपसह अव्वल स्थानी होते. पाठोपाठ महसूल (९९) विभाग होता. यावेळी मात्र महापालिका विभागाने (३१) तिसरा व पंचायत समिती विभागाने (२४) चौथा क्रमांक घेतला. 
२०१७ च्या आकडेवारीनुसार ८७५ सापळ्यांची या वर्षात राज्यात नोंद झाली. यामध्ये ११४७ जणांना अटक करण्यात आली. यावर्षी महसूल (२०७) पहिल्या स्थानी, तर पोलीस विभाग (१६९) दुसºया क्रमांकावर आहे. पंचायत समित्यांमध्ये ९७, तर मनपा क्षेत्रात ६५ ट्रॅप करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग व जलसंपदा विभागात भ्रष्टाचाराची अनेकानेक प्रकरणे उघडकीस येत असतानाही हा विभाग मात्र लाचखोरीची प्रकरणे दाखल होण्याच्या विषयात माघारला आहे, हे  विशेष!
२०१५ मध्ये हजारांवर ट्रॅप
१ आॅक्टोबर २०१३ रोजी प्रवीण दीक्षित यांनी पोलीस महासंचालक (एसीबी) या पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर लाचखोरीची सर्वाधिक प्रकरणे नोंदविण्यात आले. २०१५ मध्ये तब्बल १२३४ ट्रॅप यशस्वी झाले. यामध्ये १५९३ जणांना ताब्यात घेण्यात आले होते. यामध्ये  महसूलचे ३०८ व पोलिसांचे २७६ ट्रॅप झाले. तिसºया क्रमाकांवर पंचायत समिती विभाग (१३९) होता. महापालिकांमध्ये ७२ सापळे यशस्वी झाले. 

जानेवारी २०१८ मध्ये ७९  सापळे-
१ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०१८  दरम्यान एकूण ७९ सापळे राज्यातील एसीबीच्या पथकांनी यशस्वी केले असून, यामध्ये १०० जणांना आरोपी करण्यात आले आहे. लाचखोरांकडून १९ लाख १७ हजार १०० रुपये जप्त करण्यात आले आहेत.


Web Title: Revenue and police department competition for topping the bribe!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.